नायगांव / प्रतिनिधी
येथिल नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव यांच्या कॅबिनमध्ये विनापरवानगी घुसून त्यांना शिव्या देत,त्यांच्यावर दबाव आणून त्यांच्यासमोरील शासकीय फाईल फेकून शासकीय कामकाजात अडथळा आणून गोंधळ घालणे सौ.मंगल उर्फ सोनाली प्रकाश हंबर्डे यांना चांगलेच भोवले असून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतरही त्याचेवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी एकवटले असून त्यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.
सविस्तर वृत्त असे की,नायगांव येथिल नगरपंचायतमध्ये दि. २ मार्च रोजी कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव हे आपले कार्यालयीन कामकाज करत असतांना त्यांच्या कॅबिनमध्ये सौ.मंगल उर्फ सोनाली प्रकाश हंबर्डे ह्या विनापरवानगी आत आल्या व त्यांनी माझे कामाचे काय झाले तुला कश्याची मस्ती चढली आहे अशी विचारणा केल्यानंतर जाधव यांनी त्यांना आपले चालू असलेले सद्याचे शासकीय काम संपू द्या आपण थोडावेळ बाहेर थांबा असे सांगितल्यावर आपल्या समोरील शासकीय फाईल फेकून देत पहिले माझे कर म्हणून सौ.हंबर्डे यांनी शासकीय कामकाजात अडथळा आणल्याने त्यांचेविरोधात जाधव यांच्या फिर्यादीवरून नायगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान सौ.हंबर्डे यांच्यावर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी नगरपंचायतीत सर्वच अधिकारी व कर्मचारी एकवटले असून प्रभारी मुख्याधिकारी नंदकिशोर भोसीकर यांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी याबाबत सविस्तर निवेदन दिले आहे.त्यात त्यांनी सौ.मंगल उर्फ सोनाली प्रकाश हंबर्डे यांनी दि.२ रोजी कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव व अन्य कर्मचाऱ्यांना केलेली शिविगाळ व दमदाटी तसेच, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा उल्लेख करून यापूर्वीही त्यांनी असेच प्रकार केलेले असून त्या शासकीय कामकाजाचे मोबाईल रेकॉर्डिंग करून आम्हाला दमदाटी करतात त्यामुळे आमच्यात त्यांची दहशत निर्माण झाल्याने संबंधितांवर कारवाई करुन आम्हास संरक्षण द्यावे व कामकाजात सुलभता निर्माण करुन द्यावी असे नमूद केले आहे.

COMMENTS