नांदेड दि/प्रतिनिधी
शाळा विकसित करताना मुलांवर लक्ष केंद्रित करून त्यांना समजेल, रुचेल, आवडेल अशा पद्धतीने अध्यापन करावे व तसेच शिक्षकांनी बदलत्या काळानुसार अपडेट होऊन विद्यार्थी विकासाचे मार्ग प्रशस्त करावेत असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले .
जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामस्तरावर राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सूचित केले होते. त्यानुसार वेगवेगळ्या विभागांच्या बैठका पार पडल्या .
शिक्षण विभागाच्या बैठक समारोप सत्रात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले. दिवसभरात विषय पत्रिकेनुसार घेण्यात आलेल्या शैक्षणिक बाबींचा त्यांनी आढावा घेतला.
अनेक शाळांमध्ये अतिशय उत्तम असे उपक्रम राबविले जातात या यशकथा आपण कुठेच सादर करीत नाही. हे चांगले प्रयोग एकत्रित करून त्याचे सादरीकरण करावे. या सर्व बाबी इतर शाळांना आणि शिक्षकांना प्रेरक होतील त्यामुळे अशा यशकथा सक्सेस स्टोरी संकलित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
विभागीय आयुक्तांच्या फ्लॅगशीप कार्यक्रमाकडे त्यांनी लक्ष वेधले. शाळेमध्ये ग्रंथालय असावे, ग्रंथालयांमध्ये अद्यावत पुस्तिका असाव्यात ,शाळेतील स्वच्छता गृह चालू स्थितीमध्ये असावे, नळाच्या जोडण्या करून घ्या .अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
नांदेड जिल्ह्यात पंचतारांकित शाळा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामध्ये सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. शाळास्तरावर शाळेचा भौतिक विकास यासह मुलांच्या गुणवत्तेकडे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांनी लक्ष घालण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
शाळा विकसित करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करता येईल. माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या विकासासाठी वस्तू रूपांमध्ये मदत मागून घेता येईल. यासाठी माजी विद्यार्थ्यांना संपर्क करा .त्यांच्या मदतीने शाळेचा विकास करावा. विद्यार्थी इंग्रजी बोलण्यासाठी संकोच करतात. विद्यार्थ्यांना इंग्रजीचा सराव होईल या पद्धतीने काही मॉडेल विकसित करावे अशी सूचना त्यांनी केली.
स्काऊट आणि गाईड विभागाच्यावतीने स्काऊटचे जिल्हा संघटक दिगंबर करंडे ,गाईडच्या जिल्हा संघटक शिवकाशी तांडे व प्रलोभ कुलकर्णी यांनी पुस्तिका आणि रोपटे देऊन त्यांचे स्वागत केले. दिवसभर बैठकीत विषय पत्रिकेनुसार घेण्यात आलेल्या बाबींचा आढावा घेतला.
यावेळी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर ,उपशिक्षणाधिकारी डी.एस .मठपती, अधीक्षक बळीराम येरपूलवार,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विलास ढवळे, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष शेटकार ,बालरक्षक समन्वयक दादाराव शिरसाट, प्रोग्रॅमर के .ए. काजी यासह सर्व गटशिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती.

COMMENTS