जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली
शेतकऱ्याला कोणतीही पूर्व सूचना न देता महावितरण कंपनीने कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केला आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यावर महावितरणने हे नवीन संकट उभे केले आहे. त्यामुळे महाविरणच्या विरोधात राज्यव्यापी लढा उभारणार असल्याचा निर्धार किसान युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी हिंगोली येथे झालेल्या बैठकीत केला.
येथील शासकीय विश्रामगृहात 24 फेबु्रवारी रोजी हिंगोलीत किसान युवा क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला सचिन भवर, शिवाजी जगताप, शिवाजी मोहळे, आकाश वानखेडे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीत मार्गदर्शन करतांना प्रा. गोसावी म्हणाले की, कोणत्याच राजकीय पक्षांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण नाही. केवळ वोट बॅंक म्हणून शेतकऱ्यांचा वापर केला जातो. त्यामुळे शेतकरी प्रश्नावर शेतकऱ्यांच्या पोरांनी बोलायला शिकले पाहिजे. अन्यायाविरुध्द लढा उभा केला पाहिजे यासाठीच किसान युवा क्रांती संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. रब्बी हंगामात महावितरणने शेतकऱ्याचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. महावितरणकडून वीजबिल भरण्यासाठी वेठीस धरण्याचा प्रकार किंवा वीजजोडणी, तोडणी यामुळे शेतकरी चिंतित आहे. कारण रब्बी हंगामातील पिकांबरोबरच फळबागा, भाजीपाला पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत. यामुळे खरिपाबरोबर रब्बीतील पीक हातचे जात असल्याने शेतकरी महावितरणच्या कारभाराविरुद्ध तीव्र रोष व्यक्त करत आहे. त्यामुळे राज्यभर महावितरणच्या विरोधात लढा उभा केला जाणार आहे असे प्रा. यशवंत गोसावी म्हणाले. दरम्यान, दुपारी 4 वाजता वसमत येथे बैठक पार पडली. यावेळी वसमत तालुकाध्यक्ष बालाजी पाटील कऱ्हाळे, प्रा. उदय कदम, वैभव जाधव आदींची उपस्थिती होती.

COMMENTS