केज प्रतिनिधी.
केज : केज शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्डयामुळे वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले आहेत. क्षत्रिग्रस्त झालेल्या शहर अंतर्गत कानडी व उमरी रस्ता दुरुस्तीचे काम संबंधित विभागाने येत्या आठ दिवसात हाती घेऊन पूर्ण करावे नसता येत्या मंगळवार दि 2 मार्च रोजी समितीच्या वतीने बीड आंबेजोगाई महामार्गावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा समितीच्या वतीने हनुमंत भोसले यांनी दिला आहे.
केज शहरातील रस्त्यांची समस्या गेली अनेक दशके प्रलंबित आहे. शहरातील समता नगर, शिक्षक कॉलनी सह, धारूर रोड लगतचा भाग, बीड रोड व कळंब रोड लगतच्या नवीन विस्तारित भागात रस्त्याची समस्या कायम आहे. याशिवाय शहरातील प्रमुख रस्ते म्हणून ओळखले जाणारे शहर अंतर्गत भागात कानडी रस्ता, उमरी रस्ता व मंगळवार पेठ रस्ता इत्यादी रस्ते विकासापासून वंचित आहेत. यासाठी केज विकास संघर्ष समितीने संबंधित विभागाकडे विविध आंदोलने व उपोषणाद्वारे सतत पाठपुरावा केलेला आहे. उमरी व कानडी रस्त्याबाबत प्रत्येक वेळी प्रशासन बेफिकीर राहिले आहे. वरील रस्त्याच्या नादुरुस्त व वाईट अवस्थेमुळे नागरिकांना मणक्याचे व इतर आजार जडले आहेत. यासाठी येत्या आठ दिवसात कार्यवाही सुरू न केल्यास पुन्हा एकदा या भागातील नागरिकांच्या सहभागाने 2 मार्च रोजी सकाळी 11 वाजता बीड-आंबेजोगाई महामार्गावर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा केज विकास संघर्ष समितीच्या वतीने समन्वयक हनुमंत भोसले यांच्यासह नासेर मुंडे, महेश जाजू, रुपेश शिंदे, मुकुंद डांगे यांच्या वतीने देण्यात आला आहे.

COMMENTS