राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांचे आदेशानुसार स्थानिक जि.प.के.प्रा.शाळेच्या प्रांगणात शनिवार दि.30 जाने.रोजी दु.1वा. प्रशासन आपल्या गावी हा उपक्रम तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांचे अध्यक्षतेत राबविल्या गेला .
प्रशासन लोकाभिमुख व्हावे, तशी ओळख निर्माण व्हावी आणि शासनाच्या विविध योजनेचा लाभ सामान्य जनतेला व्हावा म्हणून प्रशासन आपल्या गावी हा उपक्रम प्रत्येक मंडळात राबविण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले. त्यानुसार माहूर येथे राबविलेल्या उपक्रमात उपस्थित असलेल्या मोजक्याच विभाग प्रमुखांनी आपापल्या योजनांची माहिती व त्याचा लाभ घेण्याच्या पद्धती विषयी मार्गदर्शन केले.सदर उपक्रमाकडे वीज वितरण कंपनी, भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक,नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेसह अनेक विभागाच्या अधिकारी/ कर्मचा-यांनी पाठ फिरवली तर काहींनी आपले प्रतिनिधी पाठवून घरीच रहाणे पसंत केले.या सर्व अनुपस्थित अधिकारी -कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटिस बजावून कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.यावेळी माहूर शहराच्या नगराध्यक्षा शीतल जाधव,पं.स.चे माजी सभापती वसंत कपाटे, परिविक्षाधीन तहसीलदार राजेश गिद्दे, गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे,एकात्मिक बाल विकास अधिकारी विशालसिंह चौहान,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.साहेबराव भिसे, वनपरीक्षेत्र अधिकारी भगवान आड़े, नायब तहसीलदार व्यंकटेश गोविंदवार यांचेसह पत्रकार,लाभार्थी व नागरीक बंधु -भगिनीं उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महसूल कर्मचारी संतोष पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी पंचायत समिती यांनी केले.

COMMENTS