औरंगाबाद बलात्कार प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करा* *भाजपा उपाध्याक्ष चित्रा वाघ यांची मागणी*


औरंगाबाद येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी असलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षाला सत्ताधाऱ्यांकडून संरक्षण मिळत असल्याने पोलीस आरोपीला अटक करण्यास धजावत नाहीत. आरोपी मेहबूब शेख याला तात्काळ अटक करावी व या गुन्ह्याचा तपास करण्यात ढिलाई दाखविणाऱ्या पोलीस उपायुक्त दीपक गिरे यांना तातडीने बडतर्फ करावे, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोमवारी केली. 

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रदेश सरचिटणीस *श्रीकांत भारतीय* व माध्यम विभाग प्रमुख *विश्वास पाठक* यावेळी उपस्थित होते.

श्रीमती चित्रा वाघ म्हणाल्या की, राज्यात महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही, हे वेळोवेळी दिसून आले आहे. औरंगाबाद येथील बलात्कार घटनेतून याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. या घटनेतला आरोपी मेहबूब शेख हा राष्ट्रवादी काँग्रेस युवा शाखेचा प्रदेशाध्यक्ष असल्याने 376 सारख्या कलमाखाली गुन्हा दाखल होऊनही त्याला अजूनही अटक होऊ शकलेली नाही. कायद्यानुसार कलम 376 अन्वये गुन्हा दाखल झाल्यावर पीडितेच्या किंवा तिच्या कुटूंबियांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, कोणताही दबाव त्यांच्यावर येऊ नये व पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी आरोपीला तातडीने अटक केली जाते. औरंगाबाद येथील घटनेला 8 दिवस उलटले तरी आरोपीला अजून अटक होऊ शकलेली नाही. या घटनेचे तपास करणारे पोलिस अधिकारी दीपक गिरे यांनी तपास सुरू असतानाच बेजबाबदार वक्तव्ये करून पीडितेच्या कुटूंबियांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

दिशा कायद्याच्या धर्तीवर राज्यात शक्ती कायदा लागू करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार जर आरोपीला संरक्षण देत असेल तर कितीही कडक कायदा केला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. महिला सक्षमीकरण, सशक्तीकरणाच्या गप्पा मारणाऱ्या राज्य सरकारने 'हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे' हे कृतीतून दाखवावे आणि आरोपीच्या मुसक्या आवळाव्यात, असेही त्यांनी सांगितले. 


*(मुकुंद कुलकर्णी)

टिप्पण्या