क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ यांची जयंती घराघरात साजरी करा - राम कटारे. महान कार्याबद्दल भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.


माजलगांव/प्रतिनिधी

         क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे विचार समाजात अधिक रुजविण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करत विविध सामाजिक कार्यक्रमातून प्रत्येक गावागावात सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी करण्यात यावी.

महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले संपुर्ण जीवन वेचले आहे. देशातील महिलांसाठी महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर महिलांना शिकविण्यासाठी महात्मा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीमाईंना शिकविले आणि शिक्षिका केले. त्या काळात सामाजिक बहिष्कार स्वीकारून प्रसंगी शेण व दगडधोंड्यांचा मार सहन करत त्यांनी मुलींना शिकविण्याचे ऐतिहासिक कार्य केले. स्त्रियांना शिक्षण मिळाल्याने चूल आणि मूल या परंपरेत चार भिंतीत अडकलेली महिला घराबाहेर पडली. त्याचा परिणाम म्हणजे आज महिला अनेक महत्वाच्या पदांवर काम करतांना आपण बघत आहोत. त्यामुळे महिला मुक्तीच्या शिल्पकार असलेल्या सावित्रीबाईंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ३ जानेवारी हा त्यांचा जन्मदिन देशभर ' महिला शिक्षण दिन ' म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी राज्यशासनाकडे केलेली असून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच क्रांतीज्योती सावित्रीमाई यांची जयंती सावित्रीमाई फुले महिला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे, सर्व बहुजन समाजातील बांधवाना या संघटनेशी जोडून महापुरुषांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोचवावे तसेच आरक्षणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी वयाच्या १७ व्या वर्षांपासून ते ७७ व्या वर्षांपर्यंत म्हणजे जवळपास ५० वर्ष सामाजिक कार्यात सातत्याने काम केलं. सातत्याने ५० वर्ष सामाजिक कार्य करणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या. त्यांच्या विचारांचा वारसा आपण जपला पाहिजे. सद्या सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित सुरू असलेली मालिका बंद होत आहे. ही मालिका बंद होऊ नये यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता असून त्यांचे सामाजिक विचार घराघरात पोहचावे यासाठी शासनाने प्रयत्न करावे व स्त्रीशिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावीत्रीमाई फुले याच्या महान कार्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात यावा सावित्रीमाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून घरोघरी साजरी करावी असे आव्हान ओबीसी संघटन जिल्हाअध्यक्ष राम कटारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पण्या