खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ; वनउद्यान आणि वनसरंक्षक कार्यालयांना वनमंत्री संजय राठोड यांची मंजुरी


    महेंद्र गिरी हिंगोली प्रतिनिधी 

 हिंगोली : नांदेड विभागात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असल्याने संभाजीनगर येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाप्रमाणेच नांदेड विभागासाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयास मान्यता देण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या सूचना वनमंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत. खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत मंत्री महोदयांना वारंवार पाठपुरावा करुन वनउद्यान आणि कार्यालयाची मागणी केली होती हे विशेष.

              हिंगोली लोकसभा मतदार संघात किनवट आणि माहूर तसेच इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून त्याठिकाणी पर्यटनासाठी वनउद्यान मंजूर करावेत आणि नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी या जिल्ह्यात असलेल्या मोठ्या प्रमाणात वनसंपदेचा विस्तार लक्षात घेता नांदेड विभागासाठी नांदेड येथे मुख्य वनसंरक्षक कार्यालय मंजूर करण्यात यावेत अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या कडे केल्यांनतर या मागणीला वनमंत्री संजय राठोड यांनी तत्वतः मंजूरी दिली. ते म्हणाले की, खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील व विभागातील लगतच्या जिल्ह्यातील वनविभागातील कामांना गती देण्यासाठी नांदेड येथे स्वतंत्र मुख्य वनसंरक्षक कार्यालय मंजूर करण्यात यावे, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी गेल्या अनेक दिवसापासून केली होती. आज सकाळी आढावा बैठकीसाठी आल्यानंतर त्याबाबत सविस्तर चर्चा झाली. वनमंत्री संजय राठोड यांनी यास तत्वतः मान्यता देवून ते मंजूर केले. त्याची रचना व अन्य बाबीसंदर्भात शासनादेश काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे वनविभागाच्या विकासासाठी वारंवार संभाजीनगरला जाणे वाचणार आहे. नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी या चार जिल्ह्यासाठी हे कार्यालय कार्यरत असेल. यासोबतच खासदारांनी मागणी केल्यानुसार किनवटसाठी नांदेडप्रमाणेच वेगळे उपवनसंरक्षक कार्यालय विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगून या कार्यालयाचे लवकरच उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

             हिंगोली लोकसभा मतदारसंघात विशेष बाब म्हणून वन उद्यान मंजूर करण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली होती. त्यानुसार हदगाव तालुक्यातील पळसा व शिवपुरी, हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी, माहूर येथील माहूर गड व किनवट तालुक्यातील राजगड येथे वन उद्यान विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत देखील खासदार हेमंत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. पळसा ता.हदगाव येथील वन उद्यानासाठी ३ कोटी ९८ लक्ष, शिवपुरी येथील ६ कोटी १२ लक्ष, वाळकेवाडी येथील ५ कोटी २९ लक्ष, माहूर गड येथील वन उद्यानासाठी ४ कोटी १५ लक्ष, राजगड येथील वन उद्यानासाठी ४ कोटी ७ लक्ष अशी रक्कम मंजूर करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

   यासोबतच हिंगोली जिल्ह्यातील वन पर्यटन हिंगोली, कळमनुरी तालुक्यातील वन पर्यटन येहळेगाव (तु.), सेनगाव तालुक्यातील येलदरी, औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ, कळमनुरी तालुक्यातील सिदोबा परिसर, वरुड, डोंगरकडा येथील वन पर्यटन व वन उद्यानासाठीची मंजुरीही आपण देत असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून झाल्यानंतर आज त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याने गेली चाळीस वर्ष रखडत असलेल्या मुख्य वनसंरक्षक कार्यालय व वन उद्यानाचा प्रश्न खासदार हेमंत पाटील यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे .

टिप्पण्या