ग्रामपंचायत निवडणुकीत धमकावणाऱ्या लोकांना मत देऊ नका अँड. अजित देशमुख


         बीड ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले आहे. गुंडगिरी करणारे आणि सातत्याने ग्रामपंचायत मध्ये ठाण मांडणारे अनेक लोक अनेक नवख्या उमेदवारांना धमकावत असल्याचे दिसत आहे. ग्रामस्थांनी चांगल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभे राहावे. जे लोक सातत्याने ग्रामपंचायत मध्ये आहेत, ते विकास करतात का ? हे पहावे. अशा लोकांना जनतेने जागेवर आणावे, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.


              जिल्हात ग्राम पंचायत निवडणुकांचे वातावरण सध्या तापले आहे. चांगले उमेदवार निवडून यावेत आणि आपल्या गावाचा विकास व्हावा, ही सामान्य मतदारांची आणि ग्रामस्थांची इच्छा आहे. मात्र भरकटलेल्या निवडणूक वातावरणामध्ये हे शक्य होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे सामान्य जनतेने निवडणुकीत सामंजस्याचे आणि पारदर्शक तेचे वातावरण आणण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.


                निवडणुकीमध्ये राजकीय पुढाऱ्यांच्या बगलेला राहून अनेक जण गाव पातळीवर दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा जनतेमध्ये आहे. या लोकांनी आपल्या गावात सुख शांती आणि समृद्धी कशी राहील, या बाबीचा विचार करणे आवश्यक आहे. मात्र हा विचार होताना दिसत नाही


             गावातील काही लोकांमुळे गावातील शांतता भंग होते. यामुळे गावातील सामाजिक वातावरण प्रदूषित होते. लोकांमध्ये ऐक्य राहत नाही. दहशतीच्या वातावरणामध्ये लोकांना धमकवणारी भाषा निवडणूक काळात वापरली जाते. हे सर्व प्रकार गावतील काही लोकांमुळे निर्माण होते असे चित्र असले तरी देखील त्याला जनताच जबाबदार आहे. दहा - पाच लोक गुंडगिरी करून आपल्या गावाला वेठीस धरत असतील तर त्याला दहशत सहन करणारे गावचं जबाबदार असते.


                चालू असलेल्या निवडणुकांमध्ये जनतेने अशा गुंडगिरी करणाऱ्या लोकांना बाजूला करणे आवश्यक आहे. सर्वसमावेशक, भ्रष्टाचार मुक्त असा कारभार कोण करेल, यावर विचार करून जनतेने उमेदवार निवडून देणे आवश्यक आहे. दारूच्या पार्ट्या देणारे आणि जेवणाच्या पंक्ती उठावणारे यांना लोकांनी मत देऊ नये.


               त्याचप्रमाणे दारू आणि पंगतीच्या नादी लागुन जर एखाद्या घरातील कारभारी ठराविक उमेदवाराला मत द्या, असे घरातील मतदारांना सांगत असेल तर हा देखील मतदारांवर अन्याय आहे. त्यामुळे अशा लोकांचे ऐकणे अन्य मतदारांना बंधनकारक नाही. त्यामुळे मतदारांना दारू पाजणाऱ्यांना या निवडणुकीत अवश्य रोखाने, असे आवाहन अँड. देशमुख यांनी केले आहे.

टिप्पण्या