बीड / जिल्हा प्रतिनिधी :-
माजलगाव तालुक्यातील सादोळा येथील शेतकरी हरिराम काशिनाथ शिंदे यांनी रविवारीच्या पडलेल्या संततधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी साचून झालेले नुकसान सोमवारी सकाळी शेतात जावून पाहताच त्यांना मोठा धक्का बसला व ते जागीच कोसळून खाली पडले. त्यांना कुटुंबियांनी देशपांडे हाॅस्पीटलमध्ये अॅडमिट केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सादोळा(ता.माजलगाव) येथील शेतकरी हरिराम काशिनाथ शिंदे (वय 60) हे नेहमी प्रमाणे सोमवारी सकाळी शेतात गेले असता तेथील सोयाबीन आणि कापूस या पिकात पावसाच्या पाण्याने साचून झालेले नुकसान पाहून त्यांना मोठा धक्काच बसला ते जागीच कोसळले. शेतकरी शिंदे यांना एकूण बारा एकर जमीन असून त्यात त्यांनी कर्ज काढून शेतीला खर्च केला होता. त्यांना सोयाबीनची साडेसहा एकर पेरणी तर कापसाची साडेतीन एकर लागवड केली होती. काढणीला आलेले सोयाबीनचे मोठे नुकसान झाले तर कापसाची बोंडे जमीनदोस्त झालेले पाहुन शेतकरी हरिराम शिंदे यांना मोठा धक्काच बसला ते शेतात सोमवारी नऊ वाजता कोसळले. शेजारील काही प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी बैलगाडीत बसस्थानकावर आणून वाहनाने माजलगाव येथे देशपांडे हाॅस्पीटलमध्ये त्यांना अॅडमीट केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
माजलगाव तालुक्यातील तसेच वडवणी व धारूर भागातील शेतकरी या परतीच्या पावसाच्या अस्मानी संकटाने पूर्ण पणे कोलमडून गेला आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीन हे पिक पण पूर्ण पणे पाण्यात गेले आहे . तर कापसाचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच कोरोना व लाॅकडावून मुळे त्रस्त जनतेला निसर्गाने पण भांबावून सोडले आहे.
====
शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी
प्रयत्न करणार : रमेश आडसकर
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे मिळण्यासाठी भाजपाच्या वतीने वेळोवेळी सरकारला जागे करण्यासाठी आंदोलने केली, निवेदने दिले आहेत. तरीही काही फरक पडत नाहीये. माजी मंत्री पंकजाताई मुंडे, खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपा नेते रमेश आडसकर यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. हा झालेला प्रकार गंभीर असून या निसर्गाच्या प्रकोपात शेतकऱ्यांनी धीर सोडू नये असे आवाहन भाजप नेते रमेश आडसकर यांनी केले आहे.
COMMENTS