राम दातीर
माहूर (प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी मुळपीठ असलेल्या माहूर गडावरिल श्री रेणुकादेवीच्या मंदीरात मंगळवारी(ता.२०) रात्री ललीता पंचमी साजरी करण्यात आली. मोजक्याच स्थानिक गायकांनी रात्री उशिरापर्यंत श्री रेणुकादेवीचा जागर केला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे भाविकांसाठी मंदिर बंद असल्याने श्री रेणुकादेवीचा नवरात्र उत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात येत आहे. मंगळवारी (ता.२०) चौथी माळ देवीला चढविण्यात आली. दुपारनंतर पंचमी सुरू झाल्याने गडावर रात्री ललीता पंचमी साजरी करण्यात आली. रात्री नऊ वाजता संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन संगीत सेवेस प्रारंभ करण्यात आला.यावेळी संस्थानचे विश्वस्त अरविंद देव, विश्वस्त आशिष जोशी, विश्वस्त राजे दुर्गादास भोपी,व्यवस्थापक योगेश साबळे,नितीन गेडाम,पुजारी भवाणीदास भोपी,शुभम भोपी,पुजारी अनिल कान्नव, सतिष कान्नव आदि पुजारी उपस्थित होते.
माहूर शहरातील देवदत्त भजनी मंडळाचे शंकर भालेराव यांनी 'आई रेणुके भव भय तारिणी जय अंबे माहूरगडवासीनी ',रणधीर पाटील यांनी 'पाहिली पाहिली श्री कृपेची सावली 'विनोद भारती यांनी ,'ॐ कार स्वरूपा,सद्गुरू समर्था ', दिलीप पाटील यांनी ' दत्त नाम घेता ' व वेदशास्त्री निलेश केदार गुरुजी यांनी माझी ' रेणुका माऊली,कल्पवृक्षाची साऊली 'असे अनेक भजन,जोगवा, गोंधळ,भक्तीगीते, पद व अभंग श्री च्या दरबारात सादर केले. त्यांना मयुर पाटील(तबला), वैभव कांबळे(तबला), तेजस खरे (खंजीरी वादक), यश मुडानकर( तबला) यांनी साथ संगत केली.
पहाटे दोन वाजता भैरविने संगीत सेवेची सांगता करण्यात आली. त्यानंतर श्री रेणुकादेवीची महाआरती करण्यात आली. संस्थानचे वतीने विश्वस्त चंद्रकांत भोपी व विश्वस्त अरविंद देव यांनी शाल, श्रीफळ व प्रसाद देऊन कलावंतांचा सन्मान केला.
COMMENTS