केज/प्रतिनिधी.
केज: संपूर्ण देश व राज्यात मुलींवरील अत्याचारात वाढ होत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे पीडितेवर झालेला अत्याचार ही गंभीर बाब असून पीडिता व तिच्या परिवाराला न्याय देऊन यातील गुन्हेगारांना कठोर शासन करण्यात यावे या मागणीसाठी मंगळवार दि 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता निदर्शने करून निवेदन देण्यात येणार आहे.
गुन्हेगारी ही वृत्ती आहे. तिला जात किंवा धर्मात मोडता येत नाही. मात्र हाथरस प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पीडितेवर झालेला अत्याचार हा देशातील महिला व मुलीवर होणाऱ्या अन्यायाचे प्रतीक आहे. मात्र सर्वच राजकीय पक्ष या बाबीला राजकीय लाभाचा विषय बनवत आहेत. सध्या ज्या समाजातील महिला व मुलीवर बलात्कारासारखा अन्याय होतो तोच समाज निषेधासाठी रस्त्यावर येतो हा अत्यंत चुकीचा पायंडा समाज पाडत आहे. अशा घटनेचा मानवता व खरे राष्ट्रीयत्व या नजरेतून सर्वच समाजाने प्रामाणिकपणे विरोध करून निषेध केला पाहिजे तरच सामाजिक न्याय व समतेची मूल्ये जोपासली जाऊ शकतील.
यासाठी मंगळवार दि 6 ऑक्टोबर रोजी केज विकास संघर्ष समितीने केज शहरातील समाजप्रेमी व राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या सहभागाने हाथरस घटनेचा निःशेष करण्यासाठी केज तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्याची घोषणा हनुमंत भोसले व नासेर मुंडे यांनी केली असून नागरिकांनी स्वयंप्रेरणेने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
COMMENTS