...!
सदरक्षणाय खलनिग्रहणाय या उक्तीप्रमाणे संबंध महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेकरिता सदैव तत्पर असणारा विभाग म्हणजे पोलीस प्रशासन आहे. पोलिसांनी केलेल्या जनसेवेला एक वसा आहे, आणि तो वारसा आजचे पोलिस बांधव प्रामाणिक पणे पुढे चालवत आहेत. त्याचा स्वार्थ अभिमान आम्हा सर्वांना आहे. माणसांच्या संकट समयी धावून येणारे पोलीस बांधव आहेत. एरवी कोणाला त्यांची गरज वाटत नसेल पण प्रत्येक संकटात त्यांची प्रत्येकालाच गरज लागते. हेच त्यांचे खरे अस्तित्व आहे. जागतिक महामारी कोरोना असो की महापूर परिस्थिती असो स्वतःच्या जिवाची बाजी लावून प्रत्यक्ष युद्ध भूमीवर लढणारा हा पोलीसंच असतात. संकटे आणि पोलिसांचे अतूट असे नाते आहे. खाकी वर्दीमध्ये ताकत आहे, अधिकार आहे, न्यायप्रियता आहे आणि लोकांना जीवनदान देण्याची फार मोठी शक्ती या खाकीवर्दी मध्ये आहे. म्हणूनच वर्दीचा अभिमान वाढवण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी प्राणाची आहुती देण्यासाठी तयार असतात.
महामारी असो की महापूर, वादळ, भूकंप, दहशतवादी, नक्षलवादी हल्ला, दंगली नैसर्गिक आपत्ती असो मानव निर्मित आपत्ती असो प्रत्येक संकटसमयी पोलीस बांधवच मदतीला धावून येत असतात. महामारी कोरोना काळात पोलिसांनी दाखवलेली कर्तव्य परायणतेला जोड नाही.
सणवार, सुख-दुख आणि कुटुंबाची जबाबदारी याकडे नेहमीच दुर्लक्ष करून जनसेवेसाठी पोलिस बांधवांना सदैव तत्पर राहावे लागते. पोलिसांची कामाची निश्चित वेळ नाही, आरोग्याची समस्या, सतत असणारे टेन्शन, राजकीय दबाव, पोलीसांनवर होणारे हल्ले, वेतनवाढीचा प्रश्न, महिला पोलिसांचे ही काही वेगळे प्रश्न आहेत. पोलीस स्टेशनचा इमारतीचा प्रश्न असो की पोलीस कर्मचारी - अधिकाऱ्यांचा वसाहतीचा प्रश्न गंभीर आहे. यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान, शस्त्र आणि प्रशिक्षण यांचा अभाव पोलीसांन पुढील समस्या आहेत. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळामुळे कामाचा येणारा अतिरिक्त ताण ही तर सर्वात मोठी समस्या आहे.
जनतेची सेवा करत असतांना अनेक पोलिस कर्मचारी व अधिकारी यांना वीर मरण आले आहे. अशा शहीद पोलीसांना आजच्या पोलिस स्मृती दिनानिमित्त विनम् अभिवादन...!
(प्रासंगिक लेख )
प्रा डॉ नागेश कराळे
मो ९६३७४१३९१३
COMMENTS