----------------------------------------
*केज /*प्रतिनिधी*:- केज तालुक्यातील शिंदी येथील दलित कुटुंबियांना केलेल्या मारहाणीतील आरोपीवर अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक झालेली नव्हती. आरोपींना अटक करण्यात यावी. या मागणीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालया समोर फिर्यादीने उपोषणाचा ईशारा देताच पोलीसांनी एका आरोपीस अटक केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २ सप्टेंबर रोजी केज तालुक्यातील शिंदी येथील दलित कुटुंबातील प्रशांत काळे व त्यांच्या कुटुंबातील इतरांना सवर्ण समाजातील वसंत जाधव, श्रीराम जाधव, दिपक कदम, निलेश जाधव, निलेश पटाईत, दिपाली जाधव, मोनाली जाधव, सोनाली जाधव व संजीवनी जाधव सर्वांनी मिळून संगनमत करून काठी व दगडांनी गंभीर मारहाण केली होती.
सदर प्रकरणी दि. २ सप्टेंबर रोजी केज पोलीस स्टेशनला गु.र.नं. ३४६/२०२० भा.दं.वि. ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ यासह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३(१), (आर), (एस) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेला तीन आठवडे लोटले तरी यातील आरोपी पोलीसांनी अटक झालेली नव्हती. त्यांच्या पासून जीविताला धोका असल्याचे एक निवेदन प्रशांत काळे यांनी दि.२१ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक याना दिले होते. निवेदनात दि. २६ सप्टेंबर पर्यंत जर अँट्रोसिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक झाली नाही तर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.
उपोषणाचा ईशारा देताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून गुप्त खबऱ्या मार्फत आरोपीचा माग काढला आणि आरोपी वसंत जाधव हा बेसावध असताना त्याला अटक केली. आरोपी अटक करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, अशोक नामदास, शेख मतीन, हनुमंत चादर, अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील वैभव राऊत, विकास चोपणे यांनी त्याला ताब्यात घेतले.
आरोपी वसंत जाधव यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान आरोपींच्या वतीने सत्र न्यायालाय अंबाजोगाई येथे अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. परंतु त्यावर निर्णय झालेला नाही.
-------------------------------------------------
COMMENTS