-------------------------------------------------------------
केज दि.८(प्रतिनिधी) माजी मंत्री अशोक पाटील तसेच मा.खासदार रजनी पाटील यांचे निकटवर्तीय तथा पाटील परिवारात मागच्या कित्येक वर्षांपासून घरातील एक सदस्य म्हणून वावरलेले माजी प्राचार्य तथा माऊली विद्यापीठाचे प्रशासक लक्ष्मण बन्सीधर डोईफोडे (६२) यांचे लातूर येथील दवाखान्यात दि.७ रोजी रात्री ११:३० वाजता उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
रामराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य तथा माऊली विद्यापीठाचे प्रशासक म्हणून जरी ते कार्यरत होते तरी त्यांची एवढीच ओळख नव्हती. पाटील परिवारातील एक सदस्य म्हणून त्यांची ओळख होती. प्रत्येक निर्णयात मग तो कौटुंबिक असो वा राजकीय डोईफोडे सरांचे मत विचारात घेतल्या जात असे. कुठल्याही परिस्थितीतुन मार्ग काढण्याचे त्यांचे कौशल्य कौतुकास्पद होते.
विशेषतः शैक्षणिक कामात त्यांचा हातखंडा एवढा होता की तालुक्यातील कोणीही शिक्षक अथवा मुख्याध्यापक डोईफोडे सरांचा सल्ला घेण्यासाठी यायचे व ते देखील त्यामध्ये मार्ग काढून यशस्वी सल्ला देत. सरांची कामाची चिकाटी, पद्धत व
शिस्त त्यामुळे पाटील कुटुंबीय डोईफोडे सरांवर सर्व गोष्टी सोपवून निर्धास्त होत असत. पाटील कुटुंबाला तसेच माऊली विद्यापीठाला हा मोठा धक्का आहे. केज तालुक्यात त्यांची सर्वांना आदरयुक्त भीती असायची.
कुठल्याही वयाच्या माणसांबरोबर मिळून मिसळून राहण्याचा त्यांचा स्वभाव समोरच्याला आपलेसे करून जाणारा होता. पाटील घराण्याशी जेवढा जिव्हाळा होता तेवढीच जवळीकता राहुल सोनवणे व त्यांचा पूर्ण परिवार, पशुपतीनाथ दांगट, प्रविण शेप यांच्या कुटुंबाशी होती. प्रेमाने अण्णा म्हणून हाक मारणारे राहुल सोनवणे हे सरांना कायम मार्गदर्शकाच्या भूमिकेत पाहत असत. वयाचे अंतर विसरून डोईफोडे सर आणि राहुल सोनवने यांची गट्टी सर्वपरिचित होती. कुठलाही सुख दुःखाचा कार्यक्रम असो एकमेकाना कायम साथ असायची. त्यामुळे राहुल सोनवणे यांनाही हे दुःख अनावर झाले व त्यांनी आपल्या अश्रूंना आज वाट मोकळी करून दिली. त्यांना कुठल्या शब्दात भावना व्यक्त कराव्यात? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
डोईफोडे सरांची नुकतीच त्यांची केज रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र नियतीपुढे कुणाचे चालत नाही त्याप्रमाणे अश्या अजातशत्रू व्यक्तिमत्वाचे निधन झाल्याने सर्वच क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अतिशय शोकाकुल वातावरणात कासारी या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डोईफोडे सरांच्या या अकाली जाण्याने केज शहरावर शोककळा पसरली असून अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत सरांविषयी मत प्रदर्शित केले.
-----------------------------------------------------------
माझ्या कुटुंबातील व्यक्ती गेली ही पोकळी भरून निघणं अशक्य - रजनीताई पाटील
डोईफोडे सर हे आमच्या कुटुंबातील एक जबाबदार व्यक्ती होते आम्ही अगदी छोट्या मोठ्या गोष्टीत देखील सरांचा सल्ला घेत होतो व त्यांच्यावर एखाद काम सोपवलं तर ते कधी नाही म्हणत नसायचे उलट ते काम कस होईल यासाठी ते सतत प्रयत्नशील असायचे त्यांच्या जाण्याने केवळ त्यांच्या कुटूंबाची नव्हे तर आमच्या सर्व माऊली परिवाराची मोठी हानी झाली असून सतत सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या या व्यक्तीने अतिशय मेहनतीने व सर्वांचे प्रेम मिळवत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. कोरोनाच्या या परिस्थितीत आम्ही या क्षणी त्यांना निरोप देण्यासाठी हजर राहू शकलो नाहीत याच दुःख आयुष्यभर मनात राहील. दोन वर्षांपूर्वी ते प्राचार्य पदावरून निवृत्त झाले मात्र आम्ही त्यांना निरोप दिला नाही कारण त्यांना निरोप देणं हे देखील आमच्या पाटील कुटुंबाला पटत नव्हतं मात्र आज त्यांना कायमचा निरोप देताना फार वेदना होत आहेत.
--------------------------------------------------------------
अशा शब्दात माजी खासदार रजनीताई पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मात्र यावेळी त्यांचा कंठ दाटून आला व त्यांना रडू आवरले नाही त्यामुळे त्या जास्त काही बोलू शकल्या नाहीत.
सोबत फोटो
COMMENTS