कोरोना काळात मयत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत द्या-पत्रकार संघ


बीड(प्रतिनिधी)-कोरोना काळात कर्तव्यावरील पत्रकारांचा कोरोना बाधेने मृत्यू झाल्यास पन्नास लाख रुपये विमा संरक्षण दिले जाईल अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. या पार्श्‍वभूमीवर गेवराई येथील दैनिक सामनाचे तालुका प्रतिनिधी संतोष भोसले आणि लातूर येथील पत्रकार गंगाधर सोमवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने प्रत्येकी पन्नास लाख रुपयाचे विमा संरक्षणातील आर्थिक रक्कम तात्काळ देवून श्रध्दांजली अर्पण करावी. अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा शाखेने केली आहे.


बीड जिल्ह्यातील गेवराई येथील दैनिक सामनाचे तालुका प्रतिनिधी पत्रकार संतोष भोसले हे कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले. त्यांना प्रशासनाने क्वारंटाईन केले. कोरोनाची धास्ती घेतल्याने त्यांची प्रकृती अचानक ढासळली. तात्काळ गेवराई उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. कोरोना संसर्ग महामारीच्या धास्तीने त्यांचा मृत्यू झाल्याने शासनाने त्यांच्या कुटुंबियांना विशेष बाब म्हणून विमा संरक्षण देऊन आर्थिक मदत द्यावी. तसेच लातूर येथील पत्रकार गंगाधर सोमवंशी यांना कोरोनाची लागण झाली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीतील मजकूर हृदय हेलावून टाकणारा होता. खाजगी रुग्णालयात उपचार घेणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. जिल्हा रुग्णालयात मिळत असलेले उपचार आणि प्रकृती स्वास्थ यातून मन अस्वस्थ होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला आहे. त्यामुळे सरकारने घोषणा केल्याप्रमाणे या दोन्ही पत्रकारांच्या कुटुंबियांना विमा संरक्षण अंतर्गत प्रत्येकी पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ द्यावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्रकार संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्यसंघटक संजय भोकरे, राज्यसरचिटणीस विश्‍वास आरोटे, पत्रकार संघाचे मार्गदर्शक संतोष मानूरकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे. सदरील मागणीची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने या दोन्ही मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी बीड जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांच्यासह उपाध्यक्ष नागनाथ जाधव, रईस खान, सहसंघटक शेख आयुब, पत्रकार संघाचे सदस्य नितेश उपाध्ये, संजय कुलकर्णी आदि उपस्थित होते.


टिप्पण्या