*"यशवंत कीर्तीमाला
"* 'शब्दसुता कविराज विजय यशवंत' यांनी शब्दबद्ध केलेले आपल्या जन्मदात्याचे चित्रण, जो जो आपण वाचत जातो, तो तो ते आपल्याच वडिलांचे चित्रण आहे, असे वाटू लागते, हेच या लेखाचे, लेखनायकाचे आणि लेखकाचे यश, महत्व आणि जिवंतपणाचे लक्षण आहे. मुळातच एखाद्या विषयी चरित्र लेख लिहिणे किंवा व्यक्तिचित्रण करणे अवघड. त्यातून आई विषयी भरपूर लिहिले गेले, पण बापाच्या जगण्याचा पट मांडणे दुर्मिळच. राजकारणी, पुढारी, नेते, उद्योगपती विविध सेलिब्रिटी, शिक्षण सम्राट, साखर सम्राट, लोकनेते, लोकनायक, कर्मवीर, अशा विविध उपाधीने भूषविलेले समाजधुरीण यांच्याविषयी चरित्र लेख आपण नेहमीच वाचतो किंबहुना त्यांच्याच विषयी जास्त लिहिले जाते. समाजातला असला कुठलाही तथाकथित मोठेपणा नसतानासुद्धा एक अत्यंत सामान्य माणूस स्वतःच्या असामान्यत्व कर्तृत्वाने आपले जीवन एका दीपस्तंभाप्रत कसे सिद्ध करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कै. यशवंत लक्ष्मण सातपुते. *"यशवंत जगण्यासाठी, धनवंत असण्याची गरज नाही. पण, जो ज्ञानवंत आहे, तो नक्कीच यशवंत होतो,"* हा वास्तुपाठ ज्या व्यक्तीने आपल्या आदर्श जीवनातून समाजासमोर उभा केला, अशा या असामान्य व्यक्तिमत्त्वाबद्दल मनामध्ये केवळ आदरच निर्माण होतो. स्वातंत्र्यपूर्वकाळात जन्मलेली सगळी पिढीच जणू मेहनतीचं कष्टाचे, सचोटीचे, प्रामाणिकतेचे प्रतीक बनून आपल्या तत्वांशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता आयुष्यभर तत्वनिष्ठ राहिली. प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेत, सामना करत, प्रसंगी संघर्ष करत स्वतःच्या जीवनाचा उत्कर्ष कसा करावा, हे शिकवणारे 'पुस्तकवाले बाबा' अनेकांच्या जीवनामध्ये वाचनानंद पसरवतात. जमीनजुमला नसताना, भाड्याच्या खोलीत आयुष्याची सुरुवात करून, कालांतराने स्वतःची हक्काची आणि आपल्या पुढील पिढ्यांची भक्कम इमारत उभी करण्यासाठी आपली अख्खी हयात कष्टाने, इज्जतीने पण प्रामाणिकपणाने लोकांचा विश्वास संपादन करून घेत झिजवणारा हा खरा कर्मयोगी. उपजीविकेसाठी अनेक व्यवसाय करतानाच आपल्या आजूबाजूच्या परिसरात, समाजात आणि लोकांच्या मनात आनंदाचे मळे फुलवणारा आणि त्यालाच आपली जीविका मानणारा हा आनंदयोगी, जीवनतपस्वी. कै. यशवंत लक्ष्मण सातपुते यांचा जीवन प्रवास जितका खडतर, तितकाच मार्गदर्शक. विषयसुखांच्या गराड्यात आणि समाजमाध्यमांच्या विळख्यात सापडलेल्या तरुण-भावी पिढीला अशा व्यक्तिमत्वांची ओळख होणे, ही केवळ काळाची गरजच नव्हे, तर आपली सामाजिक बांधिलकीही आहे. या समाज भावनेने आयोजित केलेल्या या व्यक्तिमत्व वरच्या सारांश लेखनाच्या स्पर्धेत प्रत्येकाने आपापली प्रतिक्रिया साहित्यिक, सारांश आणि समीक्षा पद्धतीने लिहून अर्पण करावी. म्हणजे, आपणही या सत्कार्यात सहभागी झाल्याचे समाधान प्रत्येकाला वाटेल. धन्यवाद. श्री. गुरुराज गणेश गर्दे. शैक्षणिक समुपदेशक, पुणे. संपर्क :- 9422058288 / 8459822424 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏*
यशवंत. . एक आदर्श जीवनप्रवास.
. !* *दुनिया कळली पाहिजे*. *कष्ट करायला लाजू नको*. *पैशाची किंमत कळली* *तरच माणूस ओळखायला शिकशील* *आणि जोडलेला माणूसच* *तुझी खरी कमाई असेल* अशी प्रेरणा दायी शिकवण देणारे माझे वडील , कै. यशवंत लक्ष्मण सातपुते, यांचा 17/6/2020 रोजी एक्काऐंशीवा जन्म दिन. सहस्र चंद्र दर्शन सोहळा .जरी अनुभवता आला नाही तरी त्यांचा एकसष्टी सोहळा साजरा करता आला . भाऊ, बहीण, आप्त, स्वकीय, आणि कुटुंबीय यांच्या मदतीला धावून जाणारा हा मदतीचा हात एकवीस वर्षोपूर्वी फाल्गुन वद्य एकादशीला परलोक वासी झाला. जीवन कसे जगायचे याचा प्रत्यक्ष वस्तुपाठ घालून देणारे हे व्यक्ती मत्व *पुस्तक वाले बाबा* , *बाळासाहेब* या नावाने प्रचलित होते. सहकारनगर परीसरात *गोळीवाले बाबा* म्हणून लहान मुलांचे लाडके आजोबा सर्वांना परिचित होते. हसतमुख चेहर्याने प्रत्येकाचे स्वागत करताना, प्रसंगी परखडपणे कटू सत्य सांगणारे बाबा आज हयात नाहीत. पण त्यांचे कार्य, शिकवण आणि आठवणींचा चांदवा आजही अंतरात मनांगणी लखलखत आहे. तोरणा किल्लाच्या पायथ्याला असलेले, वेल्हा हे मूळ गाव. राजगड च्या पायथ्याशी शेतजमीन. पण आजोबा, पणजोबांनी मुलींच्या लग्न कार्याच्या निमित्ताने ती विकल्याने प्रतिकुल परीस्थितीत पुण्यात कसबा पेठेत वडिलांचे बालपण गेले. रमण बाग प्रशालेत शालेय शिक्षण पूर्ण करता करताच गुरूजनांचे घरी काम करून अर्थाजन करणारा हा *यशवंत* बालपणातच जगरहाटीला सामोरे गेला. दशग्रंथी ब्राह्मणाचे घर असल्याने, दोन वेळेच्या जेवणाची ददात नव्हती पण केवळ पौरोहित्य करून कुटुंबाचे पालन पोषण करणे आजोबांना शक्य नव्हते. सर्व भावंडात मोठे असल्याने कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी सर्वात आधी जबाबदारी अंगावर येऊन पडली. पाठी पाच भावंडे असल्याने पडेल ते काम करून पैसा कमावण्याची जिद्द वडिलांकडे होती. तीच त्यांनी आमच्यातही रूजवली. पुण्यातील अप्पा बळवंत चौकात पुस्तकाच्या दुकानात, गुरूजनांच्या ओळखीने कामाला लागले. काऊंटर स्वच्छता, पुस्तक साफसफाई करता करता, पुस्तक वाचनाची ओढ लागली. सत्तावन्न साली मॅट्रिक झालेला हा यशवंत तुटपुंज्या पगारात समाधान मानीत कुटुंबास हातभार लावित होता. आठ, नऊ वर्षे पुस्तकांच्या दुकानात काम केल्याने साहित्यिक, वाचक यांच्या ओळखी झाल्या. आणि दिवसभर पुस्तकांच्या दुकानात काम करताना एक दिवस ती संधी चालून आली. पुस्तक खरेदी करणाऱ्या एका ग्राहकाने मालेगावला सरकारी नोकर भरती चालू असल्याचे सांगितले. पत्ता दिला. शिफारस करण्याचे आश्वासन दिले. घरापासून दूर जाण्याची पहीलीच वेळ. घरातून विरोध झाला. "जा तुला जायचे तर, इथलं खाणारं एक तोंड तरी कमी होईल!" अशा कर्मठ विचारसरणीत परवानगी मिळाली. घरच्यांचा विरोध पत्करून दूर मालेगावला गेलेला हा नवयुवक वर्षभरातच कायम स्वरूपी सरकारी नोकरदार बनला. सरकारी नियमानुसार दोन तीन वर्षे बदल्या होत होत पुण्यात स्थायिक झाला. यथावकाश घरच्यांचा विरोध मावळला. सरकारी नोकरदार म्हणून समाजात पत वाढली. एकशे पंचवीस रूपये पगार मिळत असल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली. 1968 साली दोनाचे चार हात झाले. राजगुरू नगर खेड येथील विनायक पांडुरंग खेडकर यांची ज्येष्ठ कन्या चि. . प्रमिला विनायक खेडकर हिच्याशी या यशवंताचा विवाह झाला. प्रमिला खेडकर हिला 1967 सालातील , संस्कृत भाषाभ्यास साठी कवडे शास्त्री पारीतोषिक मिळाले होते. पुढे शिकायची इच्छा असतानाही लग्न झाले. प्रमिला विनायक ची भाग्यश्री यशवंत झाली. आपल्या पत्नीची शिक्षण आवड लक्षात घेऊन, वडिलांनी तिच्या मदतीने *भाग्यश्री वाचनालय होम सर्व्हिस वाचनालय* सुरू केले. दर महिन्याला प्रकाशित होणारी नियतकालिके, साप्ताहिके, पाक्षिके,दिवाळी अंक, कथा, कादंबऱ्या, डिटेक्टीव्ह कथा संग्रह, महाविद्यालयीन विद्यार्थीसाठी रेफरन्स बुक हळूहळू विस्तार वाढत गेला. वैचारिक मेजवानी देणारा हा यशवंत अखंड परीश्रमाने यश मिळवीत गेला. पाचशे सहाशे सभासद या फिरत्या वाचनालयाचे झाले. केवळ पंधरा रूपये महिना. पण वाचन संस्कृती टिकवण्यासाठी घरोघरी पुस्तके पोचवून वाचून झालेली पुस्तके परत घेऊन लोकांची वाचनाची आवड पुरवणारा हा अवलिया माणूस वाचत गेला. माणूस जोडत गेला. नाकासमोर चालणारा हा यशवंत प्रचंड स्वाभिमानी आणि शिस्त प्रिय होता. स्वतः पडेल ते काम करून , *शो मस्ट गो ऑन* चे ब्रीदवाक्य धारण केलेला हा पिता आठवांनी जितका वाचू तितका कमीच आहे. प्रवास, नाटक, सिनेमा यांची प्रचंड आवड. एक कुटुंब वत्सल व्यक्तीमत्व. आम्हा मुलांवर अतोनात प्रेम केले पण ते प्रेम फाजील लाड नव्हते. कर्तव्य, जबाबदारी यांची परीपूर्णता होती. पेपर टाकणे, दूध टाकणे अंगमेहनत करणे, चार पैसे कमवणे याची शिकवण देणारे वडील प्रसंगी कठोर भासले. पण पैशाची किंमत कळण्यासाठी पैसा कमवायला हवा हा कमावताना माणूस जोडायला शिकलो ते या यशवंत कृपेमुळेच. माझा मोठा भाऊ पपुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आज प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. वडिलांनी उभारलेली यशश्री वास्तू आजमितीस तीन मजल्यात विस्तारीत झाली आहे. भाऊ देखील याच वास्तूत रहातो. पेपरलाईन टाकणे, दुधाची लाईन टाकणे, राख्या, मेणबत्त्या स्वतः तयार करून विकणे, दिवाळी ग्रीटिंग कार्ड, कॅलेंडर, पंचांग, डायरी, उदबत्ती विकणे असे उद्योग करीत अतोनात कष्ट केले. माझे वडील या सर्वात हिरिरीने सहभाग घ्यायचे. वडिलांच्या ओळखीतून असे किरकोळ व्यवसाय सहज करता आले. पैसा मिळत गेला. पण हा पैसा मिळवताना केलेले कष्ट आठवले की आपोआपच खर्च करताना नियंत्रण यायचे. आम्ही मुलांनी कमावलेल्या पैशाचा वडिलांनी कधीही हिशोब विचारला नाही. कारण आम्ही करत असलेले कष्ट वडील पहात होते. एक आठवण आवर्जून सांगाविशी वाटते. आम्ही तीन भावंडे. मोठा हेमंत, पाठचा मी विजय आणि माझ्या पेक्षा दहा वर्षांनी लहान असलेली माझी बहिण कु. शिल्पा. रक्षाबंधनाचा सण होता. राखीचा व्यवसाय उत्तम झाला होता. अंगात ताप असल्याने सणाच्या दिवशी राखी विक्री न करण्याचा निर्णय घेतला. या व्यवसायात फायदा झाला होता. भांडवल देखील वसूल झाले. पाचशे रुपये भांडलावर सुरवात करायची. संध्याकाळ पर्यंत राख्या संपून जायच्या. मी घरोघरी जाऊन त्या विकायचो. आलेले पैसे फायद्यासह पुन्हा गुंतवायचो असा व्यवसाय पंधरा दिवस जोरात चालायचा. वडिलांनी माझी तापानं फणफणलेली अवस्था पाहिली आणि स्वतः राख्या विकण्याचा निर्णय घेतला. *घरोघरी जायचे नाही. एका ठिकाणी बसून विका* या अटीवर त्यांना आईने परवानगी दिली. प्रत्येक बाॅक्सच्या मागे प्रती नग, आणि प्रती डझन चे रेट वडिलांनी लिहून ठेवले होते. खरेदी किमती नुसार वडिलांनी प्रत्येक बाॅक्सला नंबर दिले. दुपारी दोन वाजेपर्यंत वडील आले नाहीत म्हणून मी अंगात ताप असूनही वडिलांना शोधायला बाहेर पडलो. नव्या पुलावरून वडील शनिवार वाड्याकडे येत होते. मुजुमदार बोळ , कसबा पेठ येथे आम्ही रहात होतो. वडिलांनी सर्व राख्या विकल्या होत्या. मिळालेले सर्व पैसे मला द्यायची त्यांना प्रचंड घाई झाली. राख्या त्यांनी विकल्या तरीही, "माझ्या मुलाने पैसा कमावला. दसपट भांडवल केले पाचशे रुपयांचे पाच हजार केले" हा आनंद त्यांच्यासाठी अवर्ण नीय होता. पैसा बचत करण्याची सवय वडिलांनी लावली. बॅकेत बरोबर येऊन खाते उघडून दिले. घराबाहेर पडा. काम करा. पण घरात यायची वेळ निश्चित हवी. अशी त्यांची शिस्त होती. रात्रीचे भोजन सर्व कुटुंबाने एकत्रीत घ्यायचे हा अलिखित नियम कुटुंबाने कसोशीने पाळला. साहित्य लेखनाची गोडी मला या भाग्यश्री वाचनालयामुळेच लागली. नियतकालिकातून साहित्य प्रकाशित होऊ लागले. वाचनालयाचे सदस्य वडिलांजवळ आवर्जून कौतुक करायचे. पण कवितेला मानधन मिळायचे नाही कार्यक्रम असला की वेळ मात्र भरपूर जायचा. मी घरी येईपर्यंत वडील अंगणात जागे असायचे. मी आल्यावर काही न बोलता झोपी जायचे. पण ती निःशब्द नजरानजर अस्वस्थ करून जायची. वाचन, प्रवास आणि भरपूर खाद्य पदार्थ, फळ फळावळ यांची रेलचेल होती. काही पदार्थ वडील स्वतः बनवून आम्हाला खाऊ घालायचे. बापाला आई होऊन वावरताना पहाण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. आवडीचा पदार्थ पानात पडला की वडील आज खूप खूष आहेत असं समजल जायचं. अतोनात कष्ट करताना स्वतःच्या तब्येतीकडे या यशवंताचे नेहमीच दुर्लक्ष झाले. तीन ह्रदय विकाराचे तीव्र झटके येऊनही यांची कार्यप्रवणता कधी खंडित झाली नाही. जेव्हा वसंत बापटांनी मला कविराज ही पदवी बहाल केली तेव्हा आई, वडील दोघेही त्या कार्क्रमाला उद्यानप्रसाद कार्यालय येथे उपस्थित होते. वसंत बापटांनी चारशे पाचशे लोकांच्या समुदायातून वडिलांना व्यासपीठावर बोलावून घेतले. त्यांच्या हाती हार देऊन त्यांनी वडिलांचे हातून माझा सत्कार केला. तेव्हा वडिलांच्या डोळ्यात आलेलं पाणी. . . . वडिलांनी व्यासपीठ मान्यवरांना आणि रसिकांना केलेले अभिवादन आणि नंतर एक कलाकार म्हणून मला दिलेली गळाभेट. . . माझ्यातला कलाकाराला सालंकृत करून गेली. तो प्रसंग आठवला की आजही निःशब्द. . . ! 1993 साली वडीलांच्या ओळखीने डिफेन्स अकौंटन्स क्लाॅथ शाॅप मध्ये मी नोकरीला लागलो आणि वडिल आणि मी एकमेकांचे जीवलग मीत्र झालो. एखादी गोष्ट करायची नाही हा प्रतिबंधक आदेश आम्हाला जाचक वाटायचा. किरकोळ वाद व्हायचे पण शेलक्या शिव्या हासडून वडिल संताप व्यक्त करायचे. वडिलांची पुण्याई अशी वडिलांच्या इच्छेविरूद्ध एखादी गोष्ट करताच पुढील काही दिवसात त्याचा जोरदार फटका नियती कडून बसायचा. पैसा खर्च करताना त्याच्या दुप्पट कमावला गेला पाहिजे हे तत्व अंगीकारल्याने कष्टाची सवय लागली. बारा गावचे पाणी प्यायची, पचवायची आणि माणसात रहायची शिकवण या यशवंतांची मला मिळालेली मौलिक ठेव आहे. वडिलांचा जीवनप्रवास आज जेव्हा तटस्थ पणे अनुभवला जातो तेव्हा जाणवत समाजात कसं जगायचं हे वडिलांनी प्रत्यक्ष जगून दाखवलं. अध्यात्माची आवड, लोककला, लोकसंगीत, नाटक चित्रपट हे वडिलांचे जिव्हाळ्याचे विषय. चित्रपटाचे अतोनात वेड होते. प्रत्येक वेळी आई आणि वडील दोघेही एकत्र चित्रपट पहायला जायचे. आम्ही भावंडे एकत्र आणि नंतर आपापल्या मित्रपरीवारासोबत नाटक, चित्रपट आणि प्रवास यांचा अनुभव घेऊ लागलो. पैसा पैसा जोडताना प्रसंगी काटकसरीचे महत्त्व शिकवणारे वडील कधी कधी कंजूष वाटायचे. "मला कुणीही हिशेब विचारायचा नाही, माझ्या माघारी तुम्ही उपाशी मरणार नाही इतकं मी निश्चित कमावले आहे "असं ठणकावून सांगणारे माझे वडील , अगदीच प्रतिकूल परीस्थितीत , "दोन वेळचं गिळायला मिळतय ,नशीब समजा" असं म्हणणारे वडील मुदत ठेवेची पावती मोडून घराचं घरपण राखताना आम्ही अनुभवले आहे. यशवंत हा केवळ शब्द नाही. हा अनुभूती वारा आहे. माझ्या वडिलांनी माझ्या तला माणूस घडवला आणि त्याच माणसान कवितेला जन्म दिला. आज ही *शब्दसुता* *कविराज विजय यशवंत* हे बिरुद घेऊन अत्यंत मानानं सन्मानानं समाजात वावरते आहे. वडिलांनी मला काय दिल यापेक्षा मी वडिलांना काय दिल याचा विचार केला तर उत्तर मिळत... *वा-याला पहायचं नसत त्याला अनुभवायचं असतं. हे प्रसादिक वारं अंतरात साठवायचं. आणि द्यायचच असेल काही तर त्यानं दिलेलं अनमोल जीवन सतत फुलवत ठेवायचं* तसं पाहिलं तर एकसष्ट वर्षाचं आयुष्य. . . जीवनप्रवासाची सहा दशके सतत काही ना काही देत गेली. जोपर्यंत वडील होते तोपर्यंत इलेक्ट्रिक किरकोळ दुरुस्ती, बागकाम, किरकोळ सुतार काम, गवंडी, प्लंबर , ड्रेनेज अशा कामात कधी अडून रहावे लागले नाही. घराबाहेर राह्यची वेळ आल्यावर मित्रांकडून अनेक गोष्टी त्यांनी शिकून घेतल्या होत्या. *लाजू नको, मागू नको, पोटभर खा* या त्यांच्या वाक्यातला *मागू नको* हा शब्द खूप उशिरा समजला. *भीक मागू नको* असा अर्थ होता. कष्टाची रंगीत तालीम इतकी कसून झाली होती की भीक मागायची वेळ येणार नाही याची तजवीज त्यांनी द्रष्टेपणाने खूप आधीच केलेली होती. होम सर्व्हिस लायब्ररी व्यवसायातून सहकार नगर येथील यशश्री वास्तू साकार झाली. आई वडिलांनी अतोनात कष्ट केले. आई अजूनही या यशवंत वाटचालीची साक्षीदार बनून आजही खबीरपणे आमच्या पाठीशी उभी आहे. घरात आलेला प्रत्येक साहित्यिक, रसिक, वाचक पुस्तक रूपाने या दोघांनी समाजाभिमुख केला. 1992 मध्ये सहकार नगरला स्वतःच्या वास्तूत रहायला गेल्या नंतर काही वर्षे भाग्यश्री वाचनालय सुरू राहिले. 1997 लागेल वडील रिटायर झाल्यावर ही अनमोल ग्रंथ संपदा वडिलांनी काही अंशी दान केली आणि उर्वरित विकून टाकली. तोपर्यंत भाऊ, आणि मी नोकरी करून आयुष्यात स्थिरावलो होतो. सुखाचे दिवस अनुभवायला ही व्यक्ती जास्त दिवस थांबलीच नाही. भावासाठी वधू संशोधन सुरू होते. मुलगी भावाने, वडिलांनी पसंत केली. आता लवकरच साखर पुडा आणि लग्न. असे आनंदी वातावरण असतानाच वडिलांनी जगाचा निरोप घेतला. ह्रदय विकाराशी खंबीरपणे लढणारी ही व्यक्ती अंत्य समयी *ब्रेन हॅमरेज* ने अचानक निधन पावली. आयुष्य भर कष्ट करणारे हे व्यक्ती मत्व जीवनाचा आनंद घेत जगले. स्वतः प्रत्येक क्षणाला उत्साहाने सामोरे गेले. सुख, आनंद जल्लोषात आणि संकट, दुःख संयमान हाताळताना तब्येतीकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. सण समारंभ , नातेवाईक, मित्र परीवार , सण समारंभ उत्सव यात सक्रीय सहभाग, घेताना चंदनाचे खोड बनून झिजत राहिले. शब्दांना भावना नसतात पण भावना शब्दांकित असतात. वडिल परलोक वासी होताना जे देणं आम्हाला देऊन गेले ते शब्दातीत आहे. एक प्रचंड मोठा आघात वडिलांच्या जाण्यानं झाला होता. वडिलांच्या दुःखद निधनानंतर त्यांचा परीवार मोठ्या संख्येने समाचारासाठी त्या दहा दिवसात येत होता. यावेळी आलेला अनुभव सांगितल्या शिवाय हा यशवंत प्रवास पूर्ण होणार नाही. वडिलांचा फोटो घरात हाॅलमध्ये ठेवला होता. वडिल नेहमी ज्या खुर्चीवर बसायचे ती खुर्ची शेजारी च होती. येणारा प्रत्येक जण देवळात आल्या प्रमाणे भक्ती भावाने दर्शन करीत होता. हळू हळू फोटो समोर पैसे दिसू लागले. मग मात्र आम्ही सावध झालो. कसले पैसे ठेवताय. . . ?काय करताय? असे खडसावून विचारल्यावर उत्तर मिळाले," पुस्तक बाबा, देवमाणूस. . मुलाच्या आजारपणात मदत केली. . हात उसने पैसे दिले. . अगदी लग्नात मदत केली. . . मुलाची फी भरायला पैसे दिले. . असे एक ना दोन. . . कारणांनी लोकांनी पैसे प्रामाणिक पणाने परत केले. कित्येक जण वडिलांच्या मृत्यूनंतर चार पाच वर्षे नियमितपणे दरमहा थोडी थोडी रक्कम देऊन घेतलेले ऋण फेडत होते. अनेकांना वडिलांनी मदत केली होती. बरीचशी रक्कम त्या दहा दिवसात फोटो पुढे जमा झाली. एखाद्या चित्रपटात शोभेल अशी कथा. पण ही सत्यकथा आहे. जीवंत असताना ज्यानं भरभरुन जीवन जगायला शिकवल त्यान मेल्यानंतर लवकरात लवकर सावरायला देखील शिकवलं. आज एकविस वर्षे झाली. बाबा आमच्यात नाही. पण हा यशवंत आईच्या रूपाने अजूनही आमच्यात वावरतो आहे. . .. . . यशवंत. . . हा फक्त शब्द नाही. . . ही मूर्ती मंत अक्षरे आहेत. . . कधीही नष्ट न होणारी. प्रेरणादायी आदर्शवत वाटचाल आहे. .. . यशस्वी जीवनाची. इति लेखन सिमा . . . . चरैवेति चरैवेति. *कविराज विजय यशवंत सातपुते, पुणे*
COMMENTS