सोनपेठ दि.९(बातमीदार)सोनपेठ तालुक्यातील बँकां शेतकऱ्यांची पिक कर्जासाठी अडवणूक करत असल्याने त्यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार व सहाय्यक निबंधक यांच्या कडे केली आहे.
सोनपेठ तालुक्यातील बँका शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असुन. सामान्य शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी विनाकारण अनावश्यक कागदपत्रांची मागणी करत आहेत. अनेक वर्षांपासून बँकेचे ग्राहक असणाऱ्या शेतकऱ्यांना गाव दत्तक नसल्याचे सांगुन कर्ज नाकारण्यात येत आहे. तसेच दुसऱ्या लोकांच्या ,बचत गटांच्या थकीत कर्जासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरल्या जात आहे तसेच दलालां मार्फत बँकेत कर्ज मागणी करणाऱ्यांना तात्काळ कर्ज भेटत आहे.त्याच बरोबर शेतकऱ्यांना बँक कर्मचाऱ्यांच्या अरेरावीस तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिक कर्जासाठी जाणीवपूर्वक छळ करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांविरुध्द तातडीने फौजदारी कारवाई करावी अन्यथा तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्याचा ईशारा शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आला आहे.
सर्व शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळावे अन्यथा बँकाच्या विरुद्ध फौजदारी कारवाई करावी .
तालुक्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांना ३० जुलै पर्यंत पिक कर्ज मिळावे तसेच शासकीय सुचनांचे पालन बँकांनी करावे ,फेरफार व बे बाकी प्रमाणपत्र मागु नये तसेच क्रेडीट रेटींग तसेच अनावश्यक जाचक अटी शेतकऱ्यावर लादुन त्यांना पिककर्ज नाकारुन त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बँक अधिकाऱ्या विरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदू यांनी दिली आहे.
सोमवार पासुन प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या पिककर्जाचा आढावा शेतकरी संघटनेच्या वतीने घेण्यात येणार असुन पिक कर्जा संबधी अडचण असणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
COMMENTS