- महावितरणचा तुघलकी कारभार; ग्राहकांच्या डोक्याला ताप
- -- ग्राहकांची चूक नसतांना नाहक त्रास
- --बिले दुरुस्त करून देण्याची दबाव गटाची मागणी
- सेलू(प्रतिनिधी)दि 01
सेलू तालुक्यात वीज महावितरण कंपनीच्या तुघलकी कारभाराने कळस गाठला आहे.याचा नाहक त्रास मात्र ग्राहकांना होत आहे.तरी देखील या गोंधळाकडे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.असंख्य ग्राहकांना चुकीची वीजबिल देण्यात आली आहेत.या प्रकाराविरुद्ध दबाव गटाच्या वतीने निबंदन देऊन वीजबिल दुरुस्तीची मागणी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन 29 जून रोजी केली आहे.
कोरोनामुळे ग्राहकांना दर महिन्याचे बिल न देता एकदम तीन महिन्याचे बिल एकत्र बिल देण्यात आले.यामुळे ग्राहकांना जास्त वीजबिल आल्याची सगळीकडे ओरड आहे.विशेष म्हणजे ज्या ग्राहकांना दर महिन्याला कमी रिडींग नुसार बिल येते त्या ग्राहकांना देखील जास्त रिडींग आल्याने जास्त वीजबिल आले आहे.
महावितरणच्या नियमानुसार 100 युनिट पर्यंत 3 रु.46 पैसे वीज आकार आहे.101 ते 300 युनिट पर्यंत 7 रु 43 पैसे वीज आकार आहे. 301 ते 500 युनिट पर्यंत 10 रु 32 पैसे वीज दर आकारले जातात तर 500 युनिटच्या पुढे 11 रु 71 पैसे वीज दर आकारला जातो.ज्या ग्राहकांना दर महिन्याला 300 युनिटच्या आत वापर होतो त्यांना साधारणपणे 3 रु 46 पैशांपासून 7 रु 43 पैशांपर्यंत युनिटचा दर लागतो परंतु महावितरणने एकदम तीन महिन्याचे वीजबिल दिल्याने 500 युनिटच्या पुढेच वीजबिल आल्याने ग्राहकांना अतिरिक्त वीज दराचा फटका बसला आहे अशी चर्चा आहे.
विशेष म्हणजे ज्या ग्राहकांनी मे महिन्याची वीज देयके भरली आहेत त्यांना जून महिण्याचेच वीजबिल येणे अपेक्षित होते परंतु त्यांनाही जास्त वीजबिल आल्याचेही समजते.खरे तर सध्या जनता लॉक डाऊन मुळे अनेक छोटेमोठे व्यवसाय डबघाईला आल्याने व ज्यांच्या रोजीरोटी वर पोट आहे अशा शेकडो लोकांना आर्थिक फटका बसलेला असतांना महावितरण मात्र एकदम वीजबिल देऊन एक प्रकारे ग्राहकांना शॉकच देत आहे.यामुळे तीन महिन्याचे वीज बिल एकत्र देणे हे चुकीचे आहे.ग्राहकांना चूक नसतांना त्यांच्या माथी जास्तीची बिले मारली जात आहेत.यामुळे तातडीने दर महिन्याप्रमाणे वीज युनिट पाहून ग्राहकांना महिनेवारी बिले दुरुस्त करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर दबाव गटाचे निमंत्रक ऍड.श्रीकांत वाईकर,ओमप्रकाश चव्हाळ,विलास रोडगे,पंकज सोनी,इसाक पटेल, रामचंद्र आघाव,मधुकर सोळंके,लक्ष्मण प्रधान, गुलाबराव पौळ,सामाजिक कार्यकर्ते सोनू शेवाळे,राजेंद्र केवारे,ऍड.शिवाजी चौरे,शिवाजी खेडकर,अजित मंडलिक,ऍड.देवराव दळवे,सतीश काकडे,सदाशिव निकम,डॉ गणेश थोरे,राधाकिशन डोईफोडे,दिलीप शेवाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
COMMENTS