वडीलांच्या स्मरणार्थ पुत्राकडून ग्रंथदान


सोनपेठ (प्रतिनिधी)


मुंबई स्थित असलेले थडीउक्कडगाव येथील व गोदाकाठ प्रतिष्ठान थडीउक्कडगाव या सेवाभावी संस्थेचे संस्थापक सदस्य अशोक वासुंबे यांनी त्यांचे वडील स्वर्गिय गंगाधर नारायण वासुंबे यांच्या स्मरणार्थ शहरातील महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ग्रंथालयास ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदींसह इतर महापुरुषांची पुस्तके भेट दिली.


थडीउक्कडगावचे अनेक तरुण शिक्षण व व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई सारख्या महानगरात वास्तव्यात आहेत. मात्र गावाची ओढ त्यांच्यात कायम आहे. गाव व गावकऱ्यांसाठी नित्य विविध उपक्रम राबविण्यात ही मंडळी पुढाकार घेऊन कार्य करीत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी बाहेरगावी वास्तव्यास गेलेल्या तरूणांनी व्हॉट्सॲप वर ग्रुप तयार करून विचारांची देवाणघेवाण सूरू केली. यामाध्यमातून त्यांनी गावातील शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने हजारो रूपयांची पुस्तके भेट स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. अशोक वासुंबे यांच्या वडीलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी वासुंबे यांनी नुकतेच सोनपेठ शहरातील शहरातील महालिंगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ग्रंथालयासही पुस्तके भेट दिली आहेत. यावेळी थडीउक्कडगावचे पोलीस पाटील रंजीत भंडारे, सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश्वर खेडकर, सदस्य,पत्रकार तथा विद्यालयाचे लिपिक मल्लीकार्जुन सौंदळे, बसवराज टेकाळे, नागनाथ स्वामी, रमेश शिंदे, चन्नवीर मठ आदींची उपस्थिती होती.


टिप्पण्या