कोरोनाचा मुकाबला करण्याचे बळ द्यावे; मुख्यमंत्र्यांची अंबाबाईचरणी प्रार्थना
कोल्हापूर : करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य सुविधा वाढविण्यावर शासनाने अधिक भर दिला आहे. कोरोनाचे संकट महाराष्ट्रासमोर उभे आहे. कोल्हापुरातही सीपीआरमध्ये सुसज्ज करोना वॉर्ड उपलब्ध झाला आहे, ही चांगली बाब आहे. मात्र, या आरोग्य सुविधा वापरण्याची वेळ महाराष्ट्रावर येऊ नये. करोनाचे हे संकट समूळ नष्ट होवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री महालक्ष्मीच्या चरणी केली.
सीपीआरमधील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे अत्याधुनिक साधनसामग्रीसह 14 बेडचा करोना वॉर्ड क्रोम क्लिनिकल रिसर्च ऍण्ड मेडिकल टुरीझम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने देणगी रूपाने तयार करून दिला आहे. मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी याचे ‘ऑनलाईन’ लोकार्पण केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, करोनाचे संकट कदाचित गंभीर झाल्यास आरोग्य सुविधा कमी पडू नये, यादृष्टीने अत्याधुनिक आरोग्य सुविधा उभ्या केल्या जात आहेत. मुंबईत तर देशातील सर्वात मोठे कोव्हिड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. श्री अंबाबाईकडे एकच मागतो, या हॉस्पिटलमध्ये कोणालाही जाण्याची वेळ येऊ देऊ नको. महाराष्ट्रापुढील कोरोनाचे संकट दूर करण्याचे साकडे घातले.
याबरोबरच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यांत आणि तालुक्यांतही आरोग्य सुविधा सक्षम आणि सुसज्ज केल्या जात आहेत. यापुढील काळात करोनाचे संकट अधिक वाढण्याची शक्यता गृहित धरून शासन आरोग्याच्या बाबतीत अधिक दक्ष आणि सजग आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. शासन पूर्ण ताकतीने जनतेच्या पाठिशी उभे आहे, असेही ते म्हणाले.
COMMENTS