धक्कादायक:
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना!
- दोन अतिवरिष्ठ अधिकारी पॉझिटिव्ह
- पिएंसह पाच 'स्टॉफ' बाधित
- संपर्कातील बीडच्या पत्रकारांना 'क्वारंटाईन'च्या सूचना
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे हे तिसरे मंत्री आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचप्रमाणे या अगोदर दोन अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. मंत्रिमंडळात कार्यरत असलेल्या मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची चिंता आता वाढली आहे.
धनंजय मुंडेसह त्यांच्या कार्यालयातील ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरूवारी रात्री या सगळ्यांच्या चाचणीचा अहवाल आला. धनंजय मुंडे आज शुक्रवारी रूग्णालयात दाखल होणार आहेत. धनंजय मुंडे दररोज मंत्रालयात जात होते. मंगळवारी झालेल्या बैठकीला देखील धनंजय मुंडे उपस्थित होते.
मुंडे यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक, पीए, मुंबईतील वाहन चालक, बीडचे वाहनचालक आणि स्वयंपाकी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र कोणालाही लक्षणे नाहीत. या आठवड्यात मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला मुंडे हजर होते. धनंजय मुंडे या सोमवारी बीडहून मुंबईत परतले असून ते आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नियमितपणे मंत्रालयात जात होते.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर मुंडे हे कोरोनाची लागण झालेले तिसरे मंत्री आहेत.
मंत्रालयातील काही सचिवांसह काही अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान, मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या बीड जिल्ह्यातील पत्रकारांसह शासकीय, निमशासकीय कर्मचारी, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांनी २८ दिवस घरीच विलगीकरणात राहावे. कोणाच्याही संपर्कात येऊ नये. लक्षणे दिसल्यास शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
राज्याची वाटचाल लाखाकडे!
- २४ तासात तीन हजार मृत्यू
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३६०७ नवे रुग्ण आढळले आहेत. तर १५२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मागील २४ तासांमध्ये १५६१ रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ४६ हजार ७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर करोना रुग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या ९७ हजार ६४८ झाली आहे. २४ तासांमध्ये ३६०७ रुग्ण आढळणं ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे असंही महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे.,
COMMENTS