बीड (रिपोर्टर)- नवलेनं मारलं मला, सोडू नका, मिस यू मॉम-डॅड, माझ्या आईला, बहिणीला अन् मुलीला सांभाळा, असं अंगावर लिहून एका 32 वर्षीय तरुणाने स्वत:च्या घराच्या बाहेर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी बीड तालुक्यातील कामखेडा या ठिकाणी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील तरुणाने आत्महत्या का केली? याचा शोध बीड ग्रामीण पोलिस घेत असून त्यांनी त्याच्या अंगावर लिहिलेल्या प्रत्येक वाक्याचा शब्दार्थ काढून तपास सुरू केला आहे.
याबाबत अधिक असे की, बीड तालुक्यातील कामखेडा येथील अनिल अशोक जमदाडे या 32 वर्षीय तरुणाने आज सकाळी घराच्या छताच्या हुकाला दोर लावून गळफास घेतला. आज सकाळी जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा गावात एकच खळबळ उडाली. अनिलने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या शरीराच्या हाता-पायांवर काही ना काही लिहिल्याचे दिसून येते. एका हातावर त्याने ‘मिस यू मॉम डॅड’ ‘अनिल विप्रो’, ‘नवलेनं मारलं मला’ ‘सोडू नका...’ ‘माझ्या आईला-बहिणीला अन् मुलीला सांभाळा’ असे वाक्य लिहून ठेवले आहेत. आत्महत्याची घटना उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेश माळी, पो.कॉ. रमेश दुबाले यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. अनिलने आत्महत्या का केली? याचा शोध पोलिस घेत असून आत्महत्या करण्यापूर्वी अनिलने आपल्या अंगावर लिहिलेल्या प्रत्येक वाक्याचा शोध पोलिस घेत आहेत.
COMMENTS