*कोरोनापाठोपाठ मोठं संकट महाराष्ट्राच्या वाटेवर, मुंबईलाही धोका
*मुंबई* : एकीकडे महाराष्ट्र कोरोनाशी दोन हात करत असताना आता आणखी एक नैसर्गिक संकट मुंबईसह राज्यावर घोंगावू लागलं आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुढच्या २४ तासांत आणखी वाढणार असून त्यातून चक्रीवादळ निर्माण होणार आहे. ३ जून रोजी हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असून रायगडमधील हरिहरेश्वरपासून ते दमणपर्यत पट्ट्यात त्याचा परिणाम जाणवणार आहे. या तीन दिवसांत मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊसही पडण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी याबाबत सोमवारी माहिती दिली.
*मुंबईला चक्रीवादळाचा धोका*
कोरोनाशी लढणाऱ्या मुंबईत मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळ असा दुहेरी धोका आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे जाणार आहे. पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचे असतील आणि ३ जूनला संध्याकाळी किंवा रात्री चक्रीवादळ घोंगावू शकते. मुंबईत ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी याबाबत सांगितले की, कमी दाबाचं क्षेत्र पुढच्या १२ तासांत अजून तीव्र होईल आणि त्यानंतरच्या १२ तासांत वादळ निर्माण होईल. या वादळाची गती आणि दिशा उत्तर दिशेला आहे. या काळात पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडेल. ३ जून रोजी उत्तर कोकणात ठाणे, मुंबई, रायगड आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल. ३ जूनच्या संध्याकाळी किंवा रात्री दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान वादळ येण्याची शक्यता आहे
सौजन्य ✍ *अब्दुल समद शेख*
COMMENTS