नांदेड :- रविवारी दिवसभर एकही करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही म्हणून थोडेसे हायसे वाटत असतानांच रात्री साडे आठ वाजता १४ अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये माजी महपौर व विद्यमान नगरसेवकांसह आणखी दोन व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. शहरातील देगलूर नाक्याजवळील बिलाल नगर येथील ५७ वर्षीय पुरुष व ३७ वर्षीय पुरुष, रहेमत नगर येथील २२ वर्षीय तरुण आणि गाडीपुरा परिसरातील धोत्री गल्ली येथील ४० वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. माजी महपौर व विद्यमान नगरसेवक हे पॉझिटिव्ह आढळल्याने करोनाने आता महापालीकेत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे.
समाधानाची बाब म्हणजे रविवारी दहा व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील सहा व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील चार असे एकुण दहा व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण २१९ व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. जिल्ह्यातील एकुण करोना बाधित व्यक्तीची संख्या ३०८ एवढी झाली आहे.
आतापर्यंत ३०८ बाधितांपैकी २१९ बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत ७५ रुग्णांवर औषधोपचार चालू आहेत. यातील चार बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. ५० व ५२ वर्षाच्या दोन स्त्री रुग्ण व ५२ व ५४ वर्षाचे दोन पुरुष यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात ७५ बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १८, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४६, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे ५ बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून ६ बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. रविवार २१ जून रोजी ७९ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- १ लाख ४५ हजार ८३०,
घेतलेले स्वॅब- ५ हजार ७०८,
निगेटिव्ह स्वॅब- ४ हजार ९९४,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- ०४,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ३०८,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- ०१,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- १४,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- २१९,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ७५,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची ६५ एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
COMMENTS