किनवट, प्रतिनिधी :
किनवट–नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१-अ (NH-161A) वरील धानोरा ते माळकोलारी दरम्यान रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी रस्त्याचे काँक्रीट उखडून रस्त्याचा पृष्ठभाग धोकादायक बनला आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक वाहनांचे टायर फुटल्याच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
या गंभीर समस्येची शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दखल घेतली. महामार्गावरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य प्रवासी, वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
या संदर्भात रमेश कदम पाटील यांनी संबंधित विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर एस. एस. देशपांडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून महामार्गाची सद्यस्थिती आणि निर्माण झालेल्या धोक्याची सविस्तर माहिती दिली. यावर देशपांडे यांनी तात्काळ दखल घेत लवकरच या मार्गावरील खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
महामार्गावरील खड्डे ही केवळ रस्त्याच्या दुरवस्थेची बाब नसून ती नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर समस्या आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी तसेच वेगाने येणाऱ्या वाहनांसाठी हे खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरू शकतात. त्यामुळे संबंधित विभागाने केवळ आश्वासनापुरती कार्यवाही न ठेवता तातडीने प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी केली आहे.
आता संबंधित विभागाने दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्यक्षात खड्डे बुजविण्याचे काम किती लवकर सुरू होते, याकडे वाहनचालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जनतेच्या प्रश्नांसाठी शेतकरी संघटनेचा पाठपुरावा सुरूच राहणार!

COMMENTS