नांदेड, दि. १२ ऑक्टोबर (प्रतिनिधी) : अध्यात्म, इतिहास, संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि पर्यटनाचा अनोखा संगम घडविणारी नानक साई फाऊंडेशनची १२ वी ‘संत नामदेव घुमान यात्रा’ दि. १५ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या माध्यमातून भाविकांना पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली येथील महत्त्वाच्या धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटनस्थळांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
संत नामदेव महाराजांची पवित्र कर्मभूमी असलेल्या घुमान (पंजाब) येथे नतमस्तक होण्याबरोबरच अमृतसर येथील सुवर्ण मंदिर, जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डर या महत्त्वाच्या स्थळांना यात्रेकरू भेट देणार आहेत. यासोबतच आनंदपूर साहिब,, चंदिगड, भटिंडा, पानिपत, कुरुक्षेत्र आणि दिल्ली येथील विविध ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचाही यात्रेत समावेश आहे.
हिमाचल प्रदेशातील नैना देवी शक्तिपीठ आणि भाक्रा नांगल धरण, कुरुक्षेत्र येथील भद्रकाली माता मंदिर, तसेच रामतीर्थ येथील लव-कुश जन्मस्थळ, वाल्मिकी आश्रम आणि कार्तिक स्वामी मंदिर अशा विविध स्थळांना भेट देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे भाविकांना धार्मिक श्रद्धेसोबतच भारतीय इतिहास, परंपरा आणि निसर्गसौंदर्याचा अनुभव घेता येणार आहे.
या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पंजाबमधील पर्जिया कलान या खेडेगावात मुक्काम करण्याची संधी. या माध्यमातून पंजाबमधील ग्रामीण जीवनशैली, स्थानिक संस्कृती आणि प्रसिद्ध पंजाबी पाहुणचाराचा जवळून अनुभव यात्रेकरूंना घेता येणार आहे. यात्रेच्या विविध टप्प्यांवर पंजाबमधील सामाजिक संस्था, संत-महंत आणि स्थानिक नागरिकांकडून स्वागत केले जाते.
भक्ती, संस्कृती आणि सद्भावनेचा संदेश
‘संत नामदेव घुमान यात्रा’ ही केवळ धार्मिक स्थळांच्या दर्शनापुरती मर्यादित नसून महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील सांस्कृतिक व आध्यात्मिक नाते अधिक दृढ करणारा उपक्रम आहे. संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रसार, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सद्भावना आणि विविध संस्कृतींची ओळख करून देण्याच्या दृष्टीने या यात्रेला विशेष महत्त्व आहे. परिवारासह सहभागी होण्यासाठी योग्य असलेल्या या यात्रेत दरवर्षी शेकडो भाविक उत्साहाने सहभागी होतात.
ही यात्रा ना नफा, ना तोटा या तत्त्वावर आयोजित करण्यात येत असून, इच्छुक भाविकांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी नानक साई फाऊंडेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे (संपर्क : ९८२३२६००७३) आणि आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क : ९८२३२६००७३

COMMENTS