अर्जापूर (प्रतिनिधी)
येथील पानसरे महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला आहे. सर्वप्रथम डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून प्रास्ताविक पर मनोगत मराठी विभाग प्रमुख डॉ. सिद्धोधन कांबळे यांनी केले आहेत. त्यांनी मराठी विभागातील विविध उपक्रमांची माहिती देत वाचन संस्कृती बद्दलचे विचार व्यक्त केले आहेत. महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ. देविदास जाधव यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने हिंदी साहित्यातील साहित्य कलाकृतीचा परिचय करून दिला आहे. यानंतर महाविद्यालयातील कु. कोमल हनवटे आणि कु. शिवानी शिवशेट्टे या विद्यार्थिनींने वाचन संस्कृती व वाचनाबद्दलचे आपले विचार मांडले आहेत. मराठी विभागाचे प्रा. डॉ. नारायण शिवशेट्टे यांनी मराठी वाङ्मय इतिहासातील महानुभाव, वारकरी , नाथ,समर्थ व शैव संप्रदायातील ग्रंथाचा व आधुनिक मराठी साहित्यातील अत्यंत महत्त्वाच्या साहित्य कलाकृतींचा परिचय देत मराठी साहित्य परंपरेचा समृद्ध वारसा सांगितला आहे. तसेच विविध भाषेतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील बहुचर्चित अनुवादित साहित्याची ओळख करून देत वाचन संस्कृतीचे महत्त्व पटवून सांगितले आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव बेलखेडे यांनी अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या दुर्मिळ ग्रंथांचा परिचय करून देत विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील ग्रंथांचे वाचन करावेत ज्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल असे विचार व्यक्त केले आहेत. यावेळी कार्यक्रमात कार्यालयीन अधीक्षक राजेश्वर लाभसेटवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी व असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. वाचन प्रेरणा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. गोपाळ चौधरी यांनी केले तर प्रा. शैलेश उल्लेवार यांनी उपस्थितांचे आभार मानले आहेत.


COMMENTS