नांदेड /प्रतिनिधी - येथील प्रतिष्ठित नागरिक डॉ. गंगाधरराव सोंडारे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचा नामांकित महाराष्ट्र शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर कांबळे व माता रमाई आंबेडकर यांच्या वंशज शुभांगी धोत्रे यांनी दिले आहे. मुंबई येथे होणाऱ्या दिमाखदार कार्यक्रमांमध्ये अँड. अजय तापकीर, गौतम पगारे ॲड. कीर्ती हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन तर्फे राज्यभरातील नामांकित लोकांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शैक्षणिक सामाजिक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती असलेले डॉक्टर गंगाधर रावजी सोंडारे यांची वर्ष 2026 साठी निवड करण्यात आली आहे.
डॉ. सोंडारे यांना यापूर्वी सत्यशोधक विचार मंच, महात्मा फुले सत्यशोधक, सामाजिक प्रेरणा पुरस्कार, इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कार तसेच राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. यासह विविध सामाजिक संघटनांनी महान विभूतींच्या नावाने अनेक पुरस्कार प्रदान केले आहेत. डॉ. गंगाधररावजी सोंडारे यांना युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा मेक्सिको अमेरिकेने 2023 मध्ये मानद डॉक्टरेट पदवी देवून गौरव केलेला आहे. नांदेड जिल्हा काँग्रेस आय कमिटीचे कार्याध्यक्ष गंगाधर सटवाजीराव सोंडारे बोरगावकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

COMMENTS