कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; विद्यापीठ परिसरात १११ वृक्षांची लागवड मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ...
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण; विद्यापीठ परिसरात १११ वृक्षांची लागवड
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठ परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने आयोजित ध्वजारोहण समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज तसेच विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. विद्यापीठाच्या ३२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ३२ झाडे, तर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त ७९ झाडे, अशी एकूण १११ झाडांची लागवड विद्यापीठ परिसरात करण्यात आली आहे.
सर्वप्रथम कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते प. पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय ध्वजारोहण आणि विद्यापीठ ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीताचे गायन करण्यात आले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि विद्यापीठाच्या ३२ व्या वर्धापन दिनानिमित्त कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी विद्यापीठाची शैक्षणिक, संशोधनात्मक व प्रशासकीय क्षेत्रातील विकासाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल यावर थोडक्यात भाष्य केले. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकजुटीने योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
ध्वजारोहण समारंभानंतर विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. विद्यापीठ परिसर अधिक हिरवाईने नटावा, पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि भावी पिढ्यांना स्वच्छ व सुंदर परिसर मिळावा, या उद्देशाने या उपक्रमाला विशेष महत्त्व देण्यात आले.
दरम्यान, विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षात केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, विद्यापीठाचे सर्व संवैधानिक अधिकारी, अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध संकुलांचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आणि विद्यापीठाच्या ३२ व्या वर्धापन दिनाचा हा सोहळा राष्ट्रभक्ती, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

COMMENTS