अतितटीच्या लढतीत बुलढाणा, अमरावती प्रथम तर परभणीचा संघ द्वितीय
सेलू: येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, परभणी जिल्हा आट्यापाट्या असोसिएशन, कावलगाव ता. पूर्णा व महाराष्ट्र आट्यापाट्या महामंडळ,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामजी भांगडिया शतकोत्तर रजंतजयंती निमित्त ३३ वी मुले व २६ वी मुली राज्यस्तरीय सबज्युनिअर दोन दिवसीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा तालुका क्रीडा संकुलात रविवार ( दि.२७) रोजी संपन्न झाली. ठाणे, पुणे , वाशिम, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, अमरावती, जळगाव, भंडारा, परभणी, बुलढाणा,बीड, सोलापूर या १६ जिल्ह्यातील २५० मुले आणि २५० मुली असे ५०० खेळाडू आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेत सहभागी झाले होते. तर मुख्य पंच म्हणून प्रवीण महाले,धर्मेंद्र काळे,अंकुश घाटे, सुनील पांडे यांनी काम पाहिले. नूतन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक बाबासाहेब हेलसकर यांच्या दुःखद निधनामुळे क्रीडा स्पर्धेवर दुःखाचे सावट पसरले. त्यामुळे आट्यापाट्या स्पर्धेचे उद्घाटन आणि समारोप औपचारिकपणे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे अध्यक्ष केशव दुधाटे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी उदय जाधव ( सेलू), डॅा. दिपक कवीश्वर (महाराज्य सचिव आट्यापाट्या महासंघ, इंडीया), अमरकांत चकोले (राज्य सचिव आट्यापाट्या महासंघ, नागपूर), बालाजी मगर (सहाय्यक दुय्यम निबंधक ,सेलू), विवेक क्षीरसागर (सहाय्यक दुय्यम निबंधक , नागपूर), माजी मुख्याध्यापक चंद्रशेखर नावाडे यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन सुभाष मोहकरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन हनुमंत हंबीरे यांनी केले. क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी श्रीरामजी भांगडिया शतकोत्तर रजतजयंती उपक्रम समितीचे संयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात परभणी जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे सचिव मधुकर क्षीरसागर, क्रीडा स्पर्धा प्रमुख मुख्याध्यापक किरण देशपांडे, क्रीडा स्पर्धा संयोजक गणेश माळवे,प्रशांत नाईक,योग शिक्षक देविदास सोन्नेकर, डॉ.सुरेश हिवाळे, बाळू बुधवंत, डॉ.काशिनाथ पल्लेवाड, डॉ.शरद ठाकर आणि नूतन विद्यालय शिक्षण संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.
राज्यस्तरीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेचा अंतिम निकाल
सेलू येथे २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी तालुका क्रीडा संकुलात राज्यस्तरीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. या क्रीडा स्पर्धेत अंतिम सामन्यात मुलांमध्ये बुलढाणा - प्रथम, परभणी -व्दितीय, जळगाव आणि अमरावती तृतीय, अमरावती, तर अंतिम सामन्यात मुलींमध्ये अमरावती- प्रथम, परभणी-व्दितीय, जळगाव आणि
धाराशिव संघाने अतितटीच्या लढतीत तृतीय क्रमांक पटकावला.
फोटो ओळी
सेलू: येथील तालुका क्रीडा संकुलात राज्यस्तरीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. त्या क्रीडा स्पर्धेतील काही प्रसंग.

COMMENTS