नांदेड :
नांदेड जिल्ह्यातील अमृत भारत रेल्वे स्थानकांच्या कामांचा दर्जा सुधारावा यासह विविध समस्या आणि मागण्यांकडे लक्ष वेधत खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा दर्जा सुधारण्याबरोबरच नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसला आधुनिक एलएचबी कोच उपलब्ध करून देणे आणि निजामाबाद-तिरुपती रायळसीमा एक्स्प्रेस नांदेडपर्यंत विस्तारित करून नियमित सुरू करणे, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील विविध रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांवर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक निधी खर्च होत असताना काही ठिकाणी कामांचा दर्जा अपेक्षेप्रमाणे नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधित कामांची सक्षम तांत्रिक अधिका-यांमार्फत तपासणी करून कामांचा दर्जा निश्चित मानकांनुसार राखण्यात यावा, अशी मागणी खासदार चव्हाण यांनी केली आहे.निकृष्ट दर्जाचे काम आढळून आल्यास संबंधित कंत्राटदाराकडून ते काम दुरुस्त करून किंवा आवश्यकतेनुसार पुन्हा करून घेण्यात यावे, तसेच भविष्यातील कामांमध्ये गुणवत्ता नियंत्रण अधिक प्रभावो करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अमृत भारत योजनेचा उद्देश रेल्वे स्थानकांचा आधुनिक आणि सर्वांगीण विकास करणे हा असून, प्रवाशांना प्रत्यक्षात चांगल्या सुविधा मिळणे आवश्यक असल्याचे खासदार चकाण यांनी स्पष्ट केले.दरम्यान, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये आधुनिक एलएचबी कोच उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. नांदेड आणि मराठवाड्यातील प्रवाशांसाठी ही महत्त्वाची रेल्वे सेवा असून, सध्या वापरात असलेल्या जुन्या प्रकारच्या कोचच्या तुलनेत एलएच बी कोच उपलब्ध झाल्यास प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. वाढतो प्रवासी संख्या लक्षात घेता या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.यासोबतच निजामाबाद- तिरुपती रायळसीमा एक्स्प्रेस नांदेडपर्यंत विस्तारित करून तिचे नियमित संचालन सुरू करावे, अशी मागणीही खासदार चव्हाण यांनी केली आहे. सध्या ही रेल्वे निजामाबाद आणि तिरुपतीदरम्यान धावत असून, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी तसेच परिसरातील प्रवाशांना या सेवेचा मोठा फायदा होऊ शकतो. नांदेडपर्यंत विस्तार झाल्यास धार्मिक पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि रोजगारासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध होईल.
नांदेड हे मराठवाड्यातील महत्त्वाचे रेल्वे केंद्र असून, तख्त श्री हजूर साहिब यामुळे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक नांदेडला येतात. त्यामुळे नांदेडला जोडणाऱ्या रेल्वे सेवांचा विस्तार आणि स्थानकांचा दर्जेदार विकास होणे आवश्यक असल्याचे खासदार चव्हाण यांनी रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
"नांदेड जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा विकास हा केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात दर्जेदार आणि टिकाऊ स्वरूपाचा झाला पाहिजे. त्याचबरोबर प्रवाशांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक एलएचबी कोच आणि नवीन रेल्वे जोडण्या उपलब्ध होणे आवश्यक आहे. या सर्व मागण्यांवर रेल्वे मंत्रालयाने सकारात्मक निर्णय घ्यावा," अशी अपेक्षा खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS