मुंबई किनवट : शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सुधारि...
मुंबई किनवट : शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी लागू करण्यात आलेल्या सुधारित नियमावलीसंदर्भातील १४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयाला स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो आदिवासी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील लोहगड शासकीय निवासस्थानी सर्वपक्षीय आदिवासी लोकप्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह राज्यातील विविध पक्षांचे आदिवासी आमदार व खासदार उपस्थित होते. किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांनीही बैठकीत सहभागी होत आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडली.
शासकीय आदिवासी वसतिगृहांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला कोणतीही बाधा येऊ नये, त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा कायम राहाव्यात आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा सर्वंकष विचार करूनच नियमावली लागू करण्यात यावी, अशी भूमिका बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मांडली. सुधारित नियमावलीबाबत पुनर्विचार करण्याची मागणीही करण्यात आली.
बैठकीनंतर आदिवासी विकास विभागाने २५ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृत पत्र काढून १४ ऑगस्ट २०२६ च्या शासन निर्णयास स्थगिती दिली. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सुविधा आणि शैक्षणिक हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे.
“आदिवासी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि त्यांना शासनाच्या सुविधा सन्मानाने मिळाव्यात, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू,” अशी भूमिका आमदार भीमराव केराम यांनी व्यक्त केली.
आदिवासी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
सुधारित नियमावलीवरील शासन निर्णयाला स्थगिती मिळाल्याने राज्यातील शासकीय आदिवासी वसतिगृहांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण होणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र आल्याने आणि त्यानंतर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतल्याने या निर्णयाचे स्वागत होत आहे.

COMMENTS