तृतीयपंथी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, रोजगार, कौशल्यविकास तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्य करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी डॉ. सान्वी जेठवाणी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल डॉ. सान्वी जेठवाणी यांनी प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण, मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, मा. चंद्रशेखर बावनकुळे, संजय कौडगे, चैतन्य बापू देशमुख, माजी मुख्यमंत्री मा. अशोकराव चव्हाण, पालकमंत्री मा. अतुल सावे तसेच भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
“पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि सोपविलेली जबाबदारी ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तृतीयपंथी समाजाच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी, सामाजिक समावेशनासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा माझा प्रयत्न राहील. महाराष्ट्रातील तृतीयपंथी समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या शासन व प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे,” असे डॉ. सान्वी जेठवाणी यांनी सांगितले.
या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील तृतीयपंथी समाजाच्या प्रश्नांना अधिक व्यापक संघटनात्मक व्यासपीठ मिळणार असून, समाजाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना व उपक्रमांचा प्रभावीपणे लाभ मिळवून देण्यासाठी नव्या उमेदीने कार्य करण्यास बळ मिळणार आहे.
डॉ. सान्वी जेठवाणी यांच्या नियुक्तीबद्दल तृतीयपंथी समाज, सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

COMMENTS