वृक्षलागवडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; गावातील युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
मुखेड प्रतिनिधी /
पर्यावरण संवर्धनाबरोबरच गावात निसर्गप्रेमाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने सावली फाउंडेशन बेटमोगरा यांच्या वतीने यंदाही व्यापक वृक्षलागवड चळवळ राबविण्यात येत आहे. या वर्षी ३०० झाडे लावण्याचा संकल्प सावली फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून सावली फाउंडेशनच्या माध्यमातून बेटमोगरा परिसरात वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीचे विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. मागील दोन वर्षांत फाउंडेशनच्या माध्यमातून ६०० हून अधिक झाडांची लागवड करण्यात आली असून, अनेक ठिकाणी असंख्य झाडे आता चांगली वाढली आहेत. याच कार्याला पुढे नेत यंदा ३०० नवीन झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून बऱ्याच दिवसांपासून या मोहीमेला सुरुवात करण्यात आली आहे.
या वृक्षलागवड मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ झाडे लावण्यापुरते मर्यादित न राहता, लावलेल्या रोपांचे दैनंदिन संगोपन व संवर्धन करण्यावरही या फाउंडेशनचा विशेष भर आहे. सावली उद्यानासह गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येत असून, गावातील युवक, निसर्गप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विशेष म्हणजे, गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना वृक्षलागवडीसाठी आमंत्रित करून त्यांच्या शुभहस्ते झाडे लावण्याचा उपक्रमही राबविण्यात येत आहे. त्यामुळे वृक्षलागवडीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीशी जोडण्याचे काम सावली फाउंडेशनकडून केले जात आहे.
"आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली हिरवीगार भेट" या भावनेतून प्रत्येकाने वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन सावली फाउंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे.
यंदाच्या ३०० वृक्षलागवडीच्या संकल्पातून बेटमोगरा परिसर अधिक हिरवागार करण्याबरोबरच निसर्गप्रेमी युवकांची मजबूत फळी उभी करण्याचा प्रयत्न सावली फाउंडेशनकडून केला जात आहे.

COMMENTS