विद्या सरपाते, लोणार, जि. बुलडाणा
समीक्षक हे नेहमीच आपल्या आकलनातून कवीचे अंतरंग उलगडून दाखवत असतात.
प्रा. साईनाथ पाचारणे यांनी, महाराष्ट्रातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कवी-लेखक डॉ. सुरेश सावंत यांच्या बालकवितेविषयी स्वतंत्र पुस्तक लिहिले आहे. ‘डॉ. सुरेश सावंत यांची बालकविता : आशय, शैली आणि समीक्षा’ या पुस्तकातून त्यांनी कवीचे निरागस आणि लोभसवाणे अंतरंग अत्यंत अतिशय प्रभावीपणे उलगडून दाखविले आहे. डॉ. सुरेश सावंत यांच्या कविता म्हणजे जणू टणटणीची फुलेच! प्रा. पाचारणे यांनी त्या फुलाची एक-एक पाकळी अगदी सहजतेने आणि कौशल्याने उलगडून दाखवली आहे.
वास्तविक पाहता समीक्षकाची दृष्टी ही फार वेगळी असते. ती चिकित्सक, अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्तीची असते. भाषा व संस्कृतीचे सखोल ज्ञान समीक्षकाकडे असावे लागते, आणि याचा प्रत्यय प्रा. पाचारणे यांचे हे पुस्तक वाचताना जागोजागी येतो. डॉ. सुरेश सावंत यांच्या साहित्यावर लिहिणारा समीक्षक हा तितक्याच क्षमतेचा असायला हवा. मी काही समीक्षक नाही आणि कवितेतील 'क' देखील मला पूर्णपणे समजलेला नसताना, प्रा. पाचारणे यांच्या समीक्षेवर भाष्य करण्याचा हा माझा एक नम्र प्रयत्न आहे.
या समीक्षेत पाचारणे यांनी डॉ. सावंत यांच्या बालकवितांमधील आशय, विषय आणि ग्रामीण संस्कृतीचे चित्रण अत्यंत प्रभावीपणे टिपले आहे. बालकुमारांच्या विश्वाचा परिचय करून देताना जुनी नाणी, हरवलेले संगीत, गोधडी शिवण्याची परंपरा आणि आठवड्याच्या वारांची रंजक मांडणी यांसारख्या विषयांना समीक्षकाने अत्यंत सहजतेने व संवेदनशीलतेने अधोरेखित केले आहे. समीक्षकाची भाषा अतिशय साधी, सोपी, सरळ आणि थेट मनाला भिडणारी आहे.
युद्ध नको बुद्ध हवा’ या दीर्घकाव्याची समीक्षा करताना केवळ कवितेचा वरवरचा गोषवारा न देता, तिच्या अंतरंगात डोकावणारे विश्लेषण केले आहे. हे लेखन वाचकांच्या मनात युद्धाविषयी चीड आणि शांततेविषयी आस्था निर्माण करणारे तसेच विचारप्रवर्तक आहे. डॉ. सावंत यांची आणि प्रा. पाचारणे यांचीही भूमिका ही स्पष्टपणे युद्धविरोधी आहे. डॉ. सुरेश सावंत यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून 'युद्ध नको' हा संदेश कुमारांपर्यंत कसा पोहोचवला आहे, याचे मार्मिक विश्लेषण येथे सापडते.
‘रानफुले’ या बालकवितासंग्रहाचे समीक्षण करताना प्रा. पाचारणे ‘रानफुले’ या शब्दाचे दोन सुंदर अर्थ उजागर करतात. रानफुले ही माळरानावर, कुठेही आपसूक उगवतात आणि सूर्याचा हात धरून वादळांना झेलत वर येतात. पोटासाठी गावोगावी भटकणाऱ्या कष्टकऱ्यांची मुले हीदेखील या रानफुलांसारखीच असतात. पुस्तकांच्या स्पर्शापासून कोसो दूर असणारी ही मुले अनुभवातून शहाणी आणि संस्कारक्षम होतात. ती स्वतःचे मार्ग स्वतः शोधतात, स्वत्वाचा सुगंध दूरवर पसरवतात आणि प्रतिकूलतेच्या माथ्यावर पाय देऊन फुलतात. त्यांच्या तुलनेत बागेतली फुले ही लाडात आणि निगराणीत वाढलेली असतात; तरीदेखील त्यांच्यापेक्षा रानफुले ही अधिक टवटवीत आणि आत्मविश्वासू वाटतात.
'आम्ही जगाला दिपवून टाकू
आम्ही जगाला सुखवून टाकू
आमच्या पुढती पडतील फिकी
बागेमधली फुले...'
या कवितेच्या समीक्षणातून वंचित आणि उपेक्षित मुलांची आणि त्यांच्या फुलण्यासाठीच्या धडपडीची जाणीव वाचकांना स्पष्टपणे होते. बालसाहित्यातील डॉ. सावंत यांच्या योगदानाचे उत्कृष्ट मूल्यांकन समीक्षकाने ह्या ग्रंथात केले आहे. डॉ. सावंत यांनी बालसाहित्य हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न ठेवता त्याला निसर्गाची आणि सामाजिक संवेदनांची जोड दिली आहे. मुलांची भाषा, लय आणि भावना अचूक टिपल्यामुळेच त्यांचे साहित्य अत्यंत प्रभावी ठरले आहे, हे या समीक्षणावरून स्पष्ट होते.
‘रंजकता आणि नादमयतेमुळे डॉ. सावंत यांच्या कविता नाचायला, गायला आणि बागडायला लावतात’ या प्रा. विश्वास वसेकर यांच्या विधानाचा उल्लेख करायलाही समीक्षक विसरलेले नाहीत. विशेष म्हणजे, कवितासंग्रहाचे समीक्षण करताना प्रा. पाचारणे केवळ गोडवे गात नाहीत, तर त्यातील उणिवांवरही बोट ठेवतात. ‘रानफुले’ या कवितासंग्रहात चित्रांचा असलेला अभाव ते अगदी प्रामाणिकपणे नजरेस आणून देतात. मुलांच्या भावना कवीने नेमकेपणाने कशा टिपल्या आहेत, हे त्यांनी अतिशय सोप्या भाषेत विशद केले आहे.
यावरून डॉ. सावंत यांनी बालमानसशास्त्राचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला असल्याचे सिद्ध होते. बालसाहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे, हा विचार हे पुस्तक दृढ करते.
थोडक्यात सांगायचे तर, डॉ. सुरेश सावंत हे मुळात अनेक लहान रोपट्यांना आपल्या मायेच्या छायेत वाढवणारे एक हिरवेगार झाड आहेत; तर समीक्षक म्हणजे त्या झाडाची फळे चाखून ती कशी आहेत हे सांगणारे पक्षी!
प्रा. साईनाथ पाचारणे यांचे ‘डॉ. सुरेश सावंत यांची बालकविता : आशय, शैली आणि समीक्षा’ हे पुस्तक बालसाहित्यिकांसाठी एक अनमोल खजिना आहे. पालकांना 'बालकनीती' आणि बालमन समजून घेण्यासाठी हे पुस्तक घरोघरी असायलाच हवे. बालसाहित्याच्या अभ्यासकांसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.
'डॉ. सुरेश सावंत यांची बालकविता : आशय, शैली आणि समीक्षा' (समीक्षाग्रंथ)
लेखक : प्रा. साईनाथ पाचारणे, खेड, पुणे
प्रकाशक : संगत प्रकाशन, नांदेड.
मुखपृष्ठ : संतोष घोंगडे
पृष्ठे : १७६ किंमत रु. ३५०
पुस्तक परिचय :
विद्या सरपाते, लोणार जि. बुलडाणा.

COMMENTS