थकीत रक्कम तत्काळ खात्यावर जमा करण्याची मागणी
हदगाव प्रतिनिधी
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे जानेवारी ते जून या सहा महिन्यांचे कमिशन अद्याप त्यांच्या खात्यावर जमा झाले नसल्याने स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशनच्या वतीने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देण्यात आले आहे. थकीत कमिशनची रक्कम तातडीने दुकानदारांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, शासनाच्या नियमानुसार स्वस्त धान्य दुकानदारांनी लाभार्थ्यांना धान्य वाटपाचे काम नियमितपणे केले आहे. मात्र, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे व जून या सहा महिन्यांचे कमिशन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे दुकानदारांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून, शासनाने तातडीने प्रलंबित कमिशन अदा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच मे २०२१ मध्ये नियमित धान्य पैसे भरण्याबाबत शासनस्तरावर निर्णय झालेला असतानाही संबंधित रकमेबाबत अडचणी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या अभिप्रायानुसार स्वस्त धान्य दुकानदारांना प्रति क्विंटल दहा रुपये वाढ जाहीर करण्यात आली असून, त्यानुसार राज्य शासनाने दुकानदारांना प्रतिक्विंटल तीनशे रुपये वाढ करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
हदगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सहा महिन्यांचे थकीत कमिशन तात्काळ खात्यावर जमा करावे व इतर प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
निवेदनावर असोसिएशनचे अध्यक्ष संपतराव काकडे पाटील, उपाध्यक्ष जयप्रकाश देशमुख व सचिव मिलिंद खंदारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS