विद्या सरपाते यांची 'आतड्यांवरची अक्षरे' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

  द्विपदवीधर असलेल्या विद्या गीता दौलत सरपाते ह्या लोणार तालुक्यातील गुंजखेड ह्या गावी पोलीस पाटील म्हणून काम करतात. यापूर्वी त्यांचे 'स...

 

द्विपदवीधर असलेल्या विद्या गीता दौलत सरपाते ह्या लोणार तालुक्यातील गुंजखेड ह्या गावी पोलीस पाटील म्हणून काम करतात. यापूर्वी त्यांचे 'सोनं मातीतलं वेचताना' आणि 'आम्ही रानातली फुले' हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. 'आतड्यांवरची अक्षरे' हा त्यांचा नवीन कवितासंग्रह सासवडच्या परिस पब्लिकेशनने प्रकाशित केला आहे.

'गारुड्याच्या पाठिंब्यानं नाग झाला राजा

पुंगी वाजवून मुंगसांना पेटा-याची सजा'

अशा काही प्रतीकात्मक कविता ह्या संग्रहात आहेत.

'धार्मिक कावळा-खाटीक पक्ष्यांत 

धंद्यावरून वाद

वणव्यात शांत, समृद्ध जंगल 

जळून झालं बरबाद'

अशा शब्दांत समकालीन परिस्थितीवर भाष्य करणारी ही कविता अतिशय टोकदारपणे व्यक्त होते. 

तीन ग्रह एका सरळ रेषेत आल्यावर चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण होते, हे भौगोलिक सत्य कवयित्रीने सामाजिक संदर्भात फारच मार्मिकपणे सांगितले आहे :

'भूक, पैसा आणि घाम

जेव्हा एका सरळ रेषेत येतात, 

तेव्हा घामावर पैशांची सावली पडते

आणि तो पूर्णच गिळला जातो' 

अशा शब्दांत कवयित्रीने सामाजिक शोषणाचा सिद्धांत मांडला आहे. 

कविवर्य कुसुमाग्रज यांनी 'स्वातंत्र्यदेवीची विनवणी' ह्या कवितेत जशी देशबांधवांना तळमळीने विनंती केली आहे, तशीच विनवणी कवयित्रीने आपल्या समाजबांधवांना केली आहे. 'पुसू नका' ह्या कवितेत त्या लिहितात :

'शब्दांनी पेटून उठतो दगड

अविचारानं तो फेकू नका 

आयुष्याची होईल राख

संस्कारी अक्षरं पुसू नका'. 

पेशाने पोलीस पाटील असलेल्या कवयित्रीची मूळ प्रकृती शिक्षिकेची आहे. कवयित्रीला विद्येचे महत्त्व पटलेले असल्यामुळे शाळेचा मळा फुलावा असे त्यांना वाटते. विद्यार्थी आणि शिक्षकांना आवाहन करताना त्यांनी लिहिले आहे :

'शाळेत फुलावा मळा

टिपतील अक्षरांचे दाणे

झुलत्या फांदीवर बसुनी

गातील प्रगतीचे गाणे'. 

'मळा' ह्या कवितेत शिक्षणाचे महत्त्व जोरकसपणे अधोरेखित केले आहे. 

आपल्या समाजबांधवांचे प्रबोधन करताना कवयित्रीने लिहिले आहे :

'कर तू गुन्हा प्रथा सा-या मोडून टाक

मुखवटे उतरवून मातीत गाडून टाक'. 

'कर तू गुन्हा' ह्या कवितेत कवयित्रीने हिंसेला अहिंसेने प्रत्युत्तर देण्याचे आवाहन केले आहे. सर्व प्रकारचे पिंजरे मोडून टाकण्याचे आवाहन केले आहे. आपल्या स्वप्नातलं गाव समृद्धीशी जोडून टाकण्याचे आवाहन केले आहे. 

कवयित्रीला आपल्या क्षमतांची आणि मर्यादांचीही पुरेपूर जाणीव आहे, म्हणून ती म्हणते :

'मातीवर काट्यांनी कोरलेलं ते माझंच नाव आहे 

दगड-धोंड्यांत वसलेलं माझं आपलं गाव आहे'. 

जरी वादळांनी आपल्याभोवती घेराव घातला असला, तरी आपण न डगमगता लढण्याचा ठराव केला आहे, असे ही कवयित्री ठामपणे सांगते. प्रतिपक्षानं कपटानं केलेल्या प्रत्येक डावावर प्रतिडाव टाकण्याची कवयित्रीची मानसिक तयारी आहे. 'ठराव' ह्या कवितेतून कवयित्रीची ही विजिगीषू मनोवृत्ती दिसून येते. 

याच आशयाची 'शोधते मी' ही आणखी एक कविता ह्या संग्रहात आहे. ह्या कवितेत कवयित्री अतिशय आत्मविश्वासाने लिहिते :

'हजार जखमा अंगावर तरी न थांबता चालते मी

संवेदना जिवंत ठेवणारी नवी वाट शोधते मी'. 

व्यक्तिगत जीवनातील वेदनेला भीक न घालता आपल्या संवेदना जिवंत ठेवणारी ही संवेदनशील कवयित्री आहे. कितीही वादळे आली, तरी वादळात घर बांधण्याचा कवयित्रीचा अट्टाहास कौतुकास्पद आहे. अहिंसा आणि करुणेसाठी कवयित्री बुद्धाशी संवाद साधते. 

कसेतरी जगण्यापेक्षा गुणवत्तापूर्ण जीवनाविषयी ही कवयित्री जागरूक आहे. समतेची बाग फुलविण्याचा ध्यास कवयित्रीने घेतला आहे. 

'जीवन असं जगावं' ह्या कवितेच्या शेवटी ही कवयित्री म्हणते :

'सुख पाहावं, दु:ख साहावं

माणसानं माणूस व्हावं

जीवन असं काही जगावं

मातीत मिसळून सोनं व्हावं' 

असं हे सुंदर आणि समर्पित जगणं कवयित्रीला आवडतं. अशा समर्पित जीवनाची सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली आहे 'सुईण' ह्या कवितेत कवयित्रीने जीवनानुभव मांडला आहे :

'मीच सुईण आणि मीच आई झाले 

स्वतःला पूर्ण हरवून, 

झळा सोसत मी सावली झाले 

उन्हात जळत राहिले 

जोवर देहाचा कोळसा होत नाही, 

तोवर जळतच राहिले'. 

कवयित्रीचा आपल्या शब्दांवर ठाम विश्वास आहे. हा विश्वास पुढील शब्दांतून व्यक्त झाला आहे :

'शब्द माझे मुजोर नाहीत

पण ते सडेतोड आणि बंडखोर आहेत 

दडपणाच्या कोणत्याच साखळदंडात न अडकता

ते निर्भयपणे कागदावर उतरतात'. 

कवयित्रीला आपल्या सडेतोड, बंडखोर आणि निर्भय शब्दांचा अभिमान आहे. हे शब्द जिजाऊ, डॉ. आंबेडकर, महात्मा बुद्ध, जोतिबा, सावित्रीबाई, शाहू महाराज यांच्याविषयी कृतज्ञ आहेत. 

'खुरासंग पेरला मी लेखणीचा कंद आहे 

म्हणून माझ्या शब्दांना शेणामातीचा गंध आहे'

कवयित्रीने कवितेचे बी पेरले नाही, तर कवितेचा कंद पेरला आहे. कंदाला कधीच मरण नसते. 

शेणामातीचा गंध ल्यालेली ही कविता तुकारामांच्या गाथेचा वारसा सांगते आणि संविधानाचा रास्त अभिमान बाळगते. म्हणून कवयित्री म्हणते :

'हाती संविधान आणि डोईवर गाथा आहे 

गाथेपरीच तर आता, माझंही गाणं आहे'.

आपल्या देशात अनेक महापुरुषांनी प्रयत्न केले, तरी विषमतेची दरी अद्याप मिटलेली नाही. सामाजिक समतेची फळे अजून चाखायला मिळत नाहीत. दारिद्र्याची रेषा मिटता मिटत नाही, ही कवयित्रीची खंत आहे. ही खंत व्यक्त करताना कवयित्रीने लिहिले आहे :

'दारिद्र्याची रेषा खोडणारा खोडरबर 

अजूनही कोणत्याच कंपास पेटीत नाही 

कष्ट आणि दारिद्र्याच्या रेषा समांतर चालतात 

एकमेकींना कधीच भेटत नाहीत 

म्हणून दारिद्र्याचा आलेख नेहमी चढता असतो

भाकरीचे प्रमेय 

एका ठरावीक सूत्रानं कधीच सुटत नाही 

घामाचे बिंदू जोडून जोडून

वर्तुळ मात्र काढता येते, पण 

त्याची परिमिती मात्र कधीच काढता येत नाही'.

गणित आणि भूमितीच्या भाषेत मांडलेली ही सामाजिक विसंगती विचारप्रवर्तक आहे. 

ह्या विपरीत परिस्थितीवरची प्रतिक्रिया म्हणून कवयित्री लिहिते :

'मी तुडवत जाते काटे

तळव्यातून टपकती थेंब 

उगवून येतो तयातून

विद्रोहाचा इवला कोंब'

जिथे वेदना असह्य होते, तिथेच विद्रोह जन्माला येणे स्वाभाविक असते. आज इवला असला, तरी इथे विद्रोहाचा कोंब जन्माला येतो आहे, ही मोठी गोष्ट आहे! हाच इवला कोंब यथावकाश वृक्षरूप धारण करणार, हे उघडच आहे. ह्या विद्रोहाला वळण द्यायचे, तर त्याला ज्ञानाचे आणि विज्ञानाचे अधिष्ठान असणे आवश्यक आहे. म्हणून कवयित्री आपल्या माताभगिनींना आवाहन करते आहे :

'पुस्तकाची भक्त हो

अंधश्रद्धा मुक्त हो

विचारांनी पोक्त अन्

विज्ञानानं युक्त हो'. 

अशा प्रकारे ह्या कवितेने ज्ञान आणि विज्ञानाचा ध्यास घेतला आहे. 

विद्या सरपाते यांची कविता म्हणजे कृतकपणे जुळवलेली कृत्रिम अक्षरे नाहीत, तर शीर्षकात म्हटल्याप्रमाणे ही खरोखरच 'आतड्यांवरची अक्षरे' आहेत. आतडी पिळवटल्याशिवाय अशी अक्षरे आकाराला येत नाहीत. ही कविता म्हणजे वेदनेपासून संवेदनेपर्यंतचा लक्षणीय असा प्रवास आहे. ह्या अक्षरांना सामाजिक बांधिलकीची आच आहे. ह्या संग्रहातील 'विद्याधन' ही कविता तर मैलाचा दगड ठरावी. विद्या सरपाते यांची कविता कधी गझलेतून, तर कधी अभंग वृत्तातून, कधी छंदातून, तर कधी मुक्तछंदातून व्यक्त झाली आहे. ह्या कवितेचा रचनाबंध फारसा महत्त्वाचा नसून, ह्या कवितेची आणि कवयित्रीची अपरिहार्यपणे अभिव्यक्त होण्यातली असोशी अधिक महत्त्वाची आहे. ह्या कवयित्रीने आपल्या कवितेतून गावगाड्यातील पोरींच्या भावभावनांना उद्गार दिला आहे. ही शब्दांची शिदोरी कवयित्रीचे जीवन कृतार्थ करील, असा विश्वास वाटतो. 

  • 'आतड्यांवरची अक्षरे' (कवितासंग्रह) 
  • कवयित्री : विद्या गीता दौलत सरपाते 
  • प्रकाशक : परिस पब्लिकेशन, सासवड 
  • मुखपृष्ठ : प्रा. नंदू वानखडे 
  • पृष्ठे : १३४ किंमत रु. १८० 


पुस्तक परिचय :

डॉ. सुरेश सावंत, नांदेड. 

sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group