नांदेड : गोदावरी अर्बनच्या मुख्य शाखेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित उद्यमी ग्लोबलचा ‘उद्योगिनी संवाद अभियान’ उत्साहात पार पडले.या...
नांदेड : गोदावरी अर्बनच्या मुख्य शाखेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित उद्यमी ग्लोबलचा ‘उद्योगिनी संवाद अभियान’ उत्साहात पार पडले.यावेळी गोदावरी फाऊंडेशनच्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण, ग्राहकांसाठी स्वंयचलित पासबुक प्रिंट मशीनचे उदघाटन तसेच उद्यमी ग्लोबल फाऊंडेशनच्या महिला सदस्यांना आय-कार्डचे वितरण करण्यात आले. याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यशस्वी उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील होत्या.प्रमुख उपस्थितीत आमदार हेमंत पाटील,व्हाईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, सचिव रविंद्र रगटे, संचालक प्रा.सुरेश कटकमवार, साहेबराव मामिलवाड, वर्षा देशमुख, कमलताई पाटील, नगरसेविका मीनल पाटील,नैन्सनच्या प्रमुख सुमलताराव,उपसरव्यवस्थापक सुरेखा दवे,ए.आर.के. उद्योग समूहाचे अध्यक्ष रितेश जुजाराव, उद्यमी च्या संचालक किर्ती तगडपलेवार, निता कटकमवार, रेवती रगटे, विजया बोरसे, अरुणा पुंड, प्रतिक्षा पतंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात राजश्री पाटील म्हणाल्या, “जोपर्यंत आपण एकत्र येत नाही, तोपर्यंत मोठे कार्य उभे राहत नाही. गोदावरी अर्बनच्या मुख्य शाखेचे आज १३ व्या वर्षात पदार्पण करत असून संस्थेच्या प्रत्येक शाखेचा विस्तार वटवृक्षाप्रमाणे झाला आहे. त्याच धर्तीवर ‘गाव तिथे उद्योजिका’ या संकल्पनेतून उद्यमी ग्लोबल फाऊंडेशन कार्य करणार आहे. राज्यातील प्रत्येक महिलेला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत नाविन्यपूर्ण उद्योग, कौशल्य विकास, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कार्यरत राहील. परिश्रम, जिद्द, निष्ठा आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर प्रत्येक महिला यशस्वी उद्योजिका होऊ शकते.” यावेळी त्यांनी उद्यमी ग्लोबल फाऊंडेशनच्या वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
गोदावरी फाऊंडेशनच्या वेबसाईटच्या लोकार्पणावेळी आमदार हेमंत पाटील म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्याची स्वतःची वैशिष्ट्ये आणि स्थानिक संसाधने असतात. त्या भागातील सहज उपलब्ध कच्च्या मालावर आधारित उद्योगांची निवड केल्यास व्यवसाय अधिक यशस्वी ठरतो. महिलांनी पारंपरिक खाद्यपदार्थ, वाळवण आणि स्थानिक उत्पादनांवर आधारित लघु उद्योग सुरू करावेत. उद्योगासाठी मोठ्या भांडवलापेक्षा योग्य नियोजन,स्थानिक कच्चा माल, बाजारपेठ आणि मेहनत अधिक महत्त्वाची आहे. छोट्या उद्योगातूनही मोठे यश मिळू शकते. उद्यमी ग्लोबल फाऊंडेशनचा हा उपक्रम कौतुकास्पद असून या कार्यासाठी माझे पूर्ण सहकार्य राहील.”
लोकार्पणावेळी संदीप काळे म्हणाले, “राजश्री पाटील यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी जागतिक स्तरावरील व्यासपीठ उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण पुढाकार घेतला आहे. महिलांनी रोजगार शोधणाऱ्या नव्हे, तर रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योजिका बनावे, हा त्यांचा मुख्य हेतू आहे. प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि व्यवसाय विस्ताराचा कृतीशील आराखडा तयार करण्यात आला असून उद्यमी ग्लोबल फाऊंडेशनचे कार्य येत्या काळात भारतासह जगभर विस्तारेल.”
ए.आर.के.उद्योग समूहाचे अध्यक्ष रितेश जुजाराव म्हणाले, “माझ्या उद्योगाची सुरुवात घरातून झाली. लॉकडाऊनच्या काळात नोकरी सोडून व्यवसायाचा विस्तार केला. उद्यमी ग्लोबल फाऊंडेशनच्या माध्यमातून मसाला उत्पादनांच्या मूल्यसाखळीत कारखानदार ते उद्यमी सदस्य असा थेट दुवा निर्माण केला जाईल. त्यामुळे मध्यस्थांची गरज कमी होऊन महिलांना अधिक रोजगार व उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. राजश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना स्वावलंबी बनविण्याचे स्वप्न आपण सर्वांनी मिळून साकार करू.”
व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर म्हणाले, “महिला संघटित, स्वावलंबी आणि उद्योजक व्हाव्यात, या उद्देशाने गोदावरी अर्बनची स्थापना झाली. आज संस्थेने पाच राज्यांतील १०० हून अधिक शाखांच्या माध्यमातून ३,१५० कोटी रुपयांहून अधिक ठेवींचा टप्पा गाठत सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. याच धर्तीवर उद्यमी ग्लोबल फाऊंडेशन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्य करणार असून हे महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरेल.”
कार्यक्रमात प्रणिता धुमाळ, कविता खांडे, शिवकन्या टाले, राजश्री पाथरकर आणि रंजिता पांपटवार या यशस्वी उद्योजिकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविकात उद्यमीच्या संचालिका किर्ती तगडपल्लेवार यांनी, “योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण व भांडवलाच्या अभावामुळे महिला मागे पडतात. त्यांना सक्षम उद्योजिका बनविण्याचे कार्य उद्यमी ग्लोबल फाऊंडेशन करणार आहे,” असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार मुख्य शाखेचे व्यवस्थापक अविनाश बोचरे यांनी मानले.
यावेळी मुख्यालय, मुख्य शाखा, सिडको, चिखलवाडी, वसमत,अर्धापूर, आ.बाळापूर शाखांचे समस्त अधिकारी, कर्मचारी वृंद उपस्थित होते.

COMMENTS