राम दातीर
माहूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांचे खंदे समर्थक आणि पक्षाशी सुरुवातीपासून एकनिष्ठ राहिलेले माहूरचे तालुकाप्रमुख गजानन कुलकर्णी यांनी अखेर मनसेला 'जय महाराष्ट्र' ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ जुलै रोजी सारखणी येथे आयोजित भव्य महाआरोग्य शिबिर आणि कार्यकर्ता मेळाव्यात ते शिवसेना (शिंदे गट) पक्षात अधिकृतपणे जाहीर प्रवेश करणार आहेत. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे माहूर तालुक्यातील मनसेला मोठे खिंडार पडले असून, हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
गजानन कुलकर्णी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासूनच पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आणि नेतृत्वाने प्रभावित होऊन पक्षात सक्रिय झाले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी माहूर तालुक्यात मनसेचे संघटन मजबूत करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि कामाचा धडाका पाहून पक्षाने त्यांच्यावर माहूर शहरप्रमुख, तालुकाप्रमुख आणि त्यानंतर विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. आपल्या आक्रमक नेतृत्वाच्या बळावर त्यांनी माहूरच्या राजकीय पटलावर प्रस्थापित पक्षांसमोर मनसेच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय निर्माण केला होता.या संदर्भात पत्रकारांशी बोलताना गजानन कुलकर्णी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,
"पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे हे एक दूरदृष्टी लाभलेले आणि महाराष्ट्राचे सक्षम नेते आहेत, यात शंका नाही. परंतु, पक्षांतर्गत संघटनात्मक नियोजन आणि योग्य समन्वयाच्या अभावामुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर भागाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि जनतेचे प्रलंबित प्रश्न तातडीने सुटावेत, या एकमेव शुद्ध हेतूने मी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
येत्या १ जुलै रोजी सारखणी येथे एका भव्य महाआरोग्य शिबिराचे आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गजानन कुलकर्णी हे आपल्या शेकडो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. कुलकर्णी यांच्या या पक्षप्रवेशामुळे माहूर आणि किनवट विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरणे वेगाने बदलण्याची शक्यता वर्तवली जात असून, शिवसेना शिंदे गटाची ताकद या भागात अधिक मजबूत होणार असल्याचे दिसत आहे.

COMMENTS