किनवट (नांदेड)दिनांक: २९ मे २०२६आदिवासी बहुल असलेल्या किनवट तालुक्यात रब्बी हंगामातील मका व ज्वारी खरेदीवरून प्रशासनाचा अत्यंत असंवेदनशील आणि संशयास्पद कारभार समोर आला आहे. भरड धान्य नोंदणी यादीत प्रचंड मोठा भ्रष्टाचार आणि घोटाळा झाल्याचा थेट आरोप शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने केला आहे. या घोटाळ्याची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे, गुन्हे दाखल करावेत आणि यादीत दुरुस्ती करून प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा, या मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने उप प्रादेशिक अधिकारी प्रफुल्ल सोयाम यांना थेट निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. प्रशासनाने तात्काळ पावले न उचलल्यास येत्या ५ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता नांदेड-किनवट महामार्गावरील इस्लापूर चौकात तीव्र 'रास्ता रोको' आंदोलन करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
🔴 काय आहे संपूर्ण प्रकरण आणि घोटाळ्याचे मुद्दे?
मुद्दा १: शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांची चांदी!
किनवट तालुक्यात मका व ज्वारीचा पेरा जवळपास १० हजार हेक्टरवर आहे. असे असतानाही खरेदी केंद्रांवर चक्क २५-२५ टनांच्या मोठ्या गाड्या आणून माल उतरवला जात आहे. हा माल शेतकऱ्यांचा नसून खाजगी व्यापाऱ्यांचा आहे. अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांशी हातमिळवणी करून केवळ त्यांचाच माल खरेदी करण्याचा सपाटा लावला असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
मुद्दा २: नोंदणीच्या तारखांमध्ये मोठा फेरफार (बोगस नोंदणी)
प्रशासनाने १३ एप्रिल २०२६ पासून नोंदणी सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी १२ एप्रिलच्या रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. मात्र, अधिकाऱ्यांनी ११ एप्रिललाच मागच्या दाराने बोगस नोंदणी उरकून घेतली. आता समोर आलेल्या यादीत तर धक्कादायक बाब समोर आली असून, चक्क १० एप्रिलपासूनच नोंदणी झाल्याचे दिसत आहे. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि देवाणघेवाण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
मुद्दा ३: जाणीवपूर्वक खरेदीला उशीर, व्यापाऱ्यांना फायदा
१ एप्रिलपासून नोंदणी आणि १ मेपासून खरेदीची आडमुठी भूमिका प्रशासनाने घेतली. प्रत्यक्षात २२ एप्रिलला खरेदी सुरू केली. या विलंबाचा फायदा घेत खाजगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी दरात मका व ज्वारी खरेदी केली. शासकीय यंत्रणा सक्षम नसताना केवळ व्यापाऱ्यांना पूरक भूमिका घेऊन शेतकऱ्यांची कत्तल केली जात आहे, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
📋 शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या:
१. यादीची तात्काळ दुरुस्ती: आधी प्रसिद्ध केलेली अधिकृत यादी गृहीत धरून बोगस नावे वगळावीत आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करावा.
२. खरेदी केंद्रांचा विस्तार: जलधरा, बोधडी, चिखली, किनवट, राजगढ, सारखणी, मांडवी या भागात कृषी उत्पन्न बाजार समितीचे गोडाऊन ताब्यात घेऊन तात्काळ खरेदी सुरू करावी. गरज भासल्यास तेलंगणा सरकारच्या धर्तीवर खाजगी गोडाऊन भाड्याने घ्यावीत.
३. रेल्वे वॅगनची व्यवस्था: या भागातून रेल्वे लाईन उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणावर भोग्या (Wagons) भरून शेतमाल योग्य ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था शासनाने करावी.
४. बचत गटांची मदत: मनुष्यबळाची कमतरता असल्यास तालुक्यातील महिला व पुरुष बचत गटांना या प्रक्रियेत सामील करून घ्यावे, जेणेकरून खरेदी वेगाने होईल.
⚠️ अन्यथा कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाची!
"शेतकऱ्यांच्या हक्काची किमान आधारभूत किंमत (MSP) त्यांच्या पदरात पडलीच पाहिजे. जर प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून व्यापाऱ्यांची खरेदी बंद केली नाही, तर शुक्रवार, ५ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता इस्लापूर चौकात महामार्ग रोखण्यात येईल. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे उप प्रादेशिक कार्यालय आणि प्रशासन जबाबदार असेल," असा कडक इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
निवेदन देणारे अर्जदार / शेतकरी नेते:
रमेश साहेबराव कदम (नांदेड जिल्हाध्यक्ष, युवा), विठ्ठलराव नानू जाधव (तोटंबा), अनिल रणधीर साबळे (थारा), लक्ष्मण चंपती फड (बोधडी खु.), रामराव सखाराम मुंडे, किरण तारुसिंग पडवाळ, देविदास जाधव, गोविंद पडवळ, विकास भाऊसिंग पडवाळ, भगवान सिंग गण्यांसिंग, जवाहर सिंग चौफाडे, गण्यासिंग चौपाडे, कमल फत्तुसिंग पडवाळ, जगदीश साबळे, आणि तिरुपती निवृत्ती फड.
भरड धान्य खरेदीतील या कथित घोटाळ्यामुळे किनवटमधील शेतकरी कमालीचा संतप्त झाला असून, आता ५ जूनच्या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS