लोकसाहित्य हा डॉ. खंदारे यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. या विषयावरची त्यांची 'एका लोककथेचा अभ्यास', 'आराध्यांची लोकगाणी', 'सुंबरान : संकलन आणि शोध', 'लोकसाहित्य : संकलन आणि शोध', 'लोकसाहित्य : शब्द आणि प्रयोग', 'ओळखा बरं', 'लोकनाट्य परंपरा', 'लोकसाहित्याभ्यास' ही ग्रंथसंपदा ह्या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी मानदंड ठरली आहे. याशिवाय 'मराठ्यांचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास', 'बुद्ध जातक भाग १', 'भारतीय कृषिसंस्कृती', 'शेती, शेतकरी आणि शरद पवार' हे ४ मौलिक ग्रंथ त्यांच्या नावावर जमा आहेत. डॉ. साहेब खंदारे यांच्या साहित्य व संशोधनावर ४ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १९ विद्यार्थ्यांनी संशोधन करून विद्यावाचस्पती ही पदवी संपादन केली आहे.
वर्तमानाची मुळे ही इतिहासात गुंतलेली असतात. त्यांचा व्यवस्थित शोध घेऊन, त्या प्रकाशात डोळसपणे वाटचाल केली, तर भविष्याचा मार्ग सुकर होतो. मराठवाड्यातील सांस्कृतिक संचिताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने डॉ. साहेब खंदारे यांनी अतिशय अभ्यासपूर्वक 'मराठवाडा : अमूर्त संस्कृती संचित' हा देखणा ग्रंथ सिद्ध केला आहे. ह्या ग्रंथाच्या सिद्धतेसाठी त्यांनी मराठवाडा हा प्रदेश अक्षरशः पिंजून काढला आहे. लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचा अतिशय आस्थेने अभ्यास केला आहे. आपल्या अभ्यासाची आणि संशोधनाची मांडणी त्यांनी ९ प्रकरणांमध्ये केली आहे. हे काही बंद खोलीत बसून केलेले संशोधन नव्हे, तर यासाठी साहेब खंदारे यांनी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यांतील खेड्यापाड्यांतून पायपीट केली आहे. डाॅ. साहेब खंदारे यांनी आपल्या प्रदेशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा उपयोजनाच्या सूत्रांसह पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठीच हे संशोधन आणि ग्रंथलेखन केले आहे. हा ग्रंथ आपल्याला आपल्या वैभवशाली वारशाकडे पाहण्याची निकोप दृष्टी देतो.
डॉ. साहेब खंदारे यांनी केलेले हे संशोधन कोणत्याही एका विशिष्ट विषयाच्या चौकटीत मावणारे नाही, तर आंतरविद्याशाखीय संशोधनाचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे.
'अमूर्त संस्कृतीच्या इतिहासाचे साक्षीदार' ह्या पहिल्याच प्रकरणात त्यांनी जगप्रसिद्ध अशा वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेण्यांचे वैभव अधोरेखित केले आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगरच्या लेण्या, पितळखोरे येथील लेणीसमूह, धाराशिवच्या लेण्या, घटोत्कच लेणी, अंबाजोगाईच्या लेण्या, तसेच शिऊर, खरोसा आणि माहूर येथील लेणींचे वेगळेपण दाखवून दिले आहे. ह्या लेण्यांमधील चित्रकलेतील सौंदर्यस्थळे फारच बारकाईने टिपली आहेत. अन्वा, सिल्लोड, रहिमाबाद, कडेठाण, पैठण, वडोळी, नवगाव, फुलंब्री, नेरूळ, देवगाव, लासूर, बागाठाण, माणकेश्वर, तेर, गंगाखेड, परभणी, चारठाणा, जांब, लोहरा, जिंतूर, पाथरी, पिंगळी, पूर्णा, पेडगाव, पोखर्णी, बोरी, मंजरथ, मद्गल, राणीसावरगाव, वालूर, अंबड, होट्टल, माहूर इ. ठिकाणच्या मंदिरांची स्थापत्यकला त्यांनी भक्ताच्या नव्हे, तर संशोधकाच्या नजरेने टिपली आहे.
मराठवाडा ही शूरवीरांची ऐतिहासिक भूमी आहे. हा प्रदेश अनेक लढायांचा साक्षीदार आहे. या प्रदेशातील अजिंठा, अंतूर, उदगीर, औसा, कंधार, दौलताबाद, धर्मपुरी, धारूर, नळदुर्ग आणि परांडा येथील किल्ल्यांचे स्थापत्यवैभव डॉ. खंदारे यांनी जगासमोर आणले आहे. हे किल्ले म्हणजे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंचा वैभवशाली वारसा होय. प्राचीन काळात मराठवाड्यातील बारवा आणि इतर जलसाठे वैशिष्ट्यपूर्ण होते. ह्या बारवा म्हणजे पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधा होत्या. धाराशिव जिल्ह्यातील जागजीचे लक्ष्मीतीर्थ, वेरूळचे शिवालय तीर्थ, वालूर येथील सर्पाकार पाय-यांची बारव, पिंगळी, चारठाणा, पाचेगाव, मुखेड, येवती आणि शेकटा येथील भव्यदिव्य बारवा डॉ. साहेब खंदारे यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्णतेसह उभ्या केल्या आहेत. ग्रंथातील लेणी, मंदिरे, किल्ले आणि बारवांची रंगीबेरंगी चित्रं पाहून वाचक स्तिमित होतो. त्याला आपल्या अमूर्त संस्कृती संचिताचे हे वैभव पाहून अभिमान वाटायला लागतो.मराठवाड्याची मौखिक परंपरा आणि आविष्कार परंपरा' हीदेखील तितकीच वैभवशाली आहे. येथील कृषिसंस्कृतीतील श्रमपरिहाराची लोकगाणी ही लोकमानस उजागर करणारी आहेत. व्हळई रचतानाची, वखरणी करतानाची, मोटेवरची, पेरणीची गाणी, गुराख्यांची गाणी, जात्यावरच्या ओव्या, देवादिकांवरची गाणी, एकादशीची गाणी, संतांविषयीची गाणी, वेगवेगळी कामे करताना स्त्रिया म्हणत ती गाणी, बालकांसाठीची लोकगाणी, फुगडीची गाणी असे विविध प्रकारचे लोकसंचित डॉ. खंदारे यांनी कष्टपूर्वक संकलित केले आहे. लोकभाषेची ही शब्दकळा अतिशय भावस्पर्शी आहे.
एका हाताची फुगडी, दोन हातांची फुगडी, बस फुगडी, दंड फुगडी, जातं फुगडी, नखुल्याची फुगडी, अरिंग मिरिंग, आपडी-थापडी, हाडेल हाप, पाय पाय घसरी ह्या खेळांचा आजच्या मुलामुलींना चक्क विसर पडला आहे. त्यामुळे ह्या खेळांच्या निमित्ताने म्हटली जाणारी गाणीही काळाच्या पोटात गुडूप झाली आहेत. लोककथा तर कुणी सांगत असेल आणि कुणी ऐकत असेल, असे वाटत नाही. त्याचे संकलन डॉ. साहेब खंदारे यांनी केले आहे.
'म्हणी' हा लोकभाषेचा महत्त्वाचा आविष्कार आहे. म्हणूनच म्हणी म्हणजे सोन्याच्या खाणी असे म्हटले जाते. संक्षेप हा म्हणींचा स्थायीभाव असतो. ह्या म्हणींच्या पोटात प्रचंड मोठे विवेचन, विस्तीर्ण विश्लेषण आणि जीवनविषयक अगाध तत्त्वज्ञान दडलेले असते. मराठवाड्यातील अशा कालगतीसूचक म्हणी, परिस्थितीसूचक म्हणी, वस्तुस्थितीनिदर्शक म्हणी, तरतमभावसूचक म्हणी, विषमतादर्शक म्हणी, दिरंगाईदर्शक म्हणी, अतिशयोक्तीसूचक म्हणी, दोषदर्शक म्हणी, लोकव्यवहारदर्शक म्हणी नीतिसूचक म्हणी, व्यंगदर्शक म्हणी, कृषिव्यवहारदर्शक म्हणी, जातिविशेषदर्शक म्हणी, नातेसंबंधित म्हणी, वृत्तिप्रवृत्तिनिदर्शक म्हणी, समाधानदर्शक म्हणी अशा मराठवाड्यातील म्हणींचे भांडार डॉ. साहेब खंदारे यांनी खुले केले आहे.
शिवी हे भावनिक विकारांचे भाषिक विरेचन असते. मराठवाड्यातील लोकांच्या शिव्यांचा विचार केला असता, त्या शिव्या गद्य आणि पद्य अशा दोन्ही स्वरूपात ऐकावयास मिळतात. पुरुषांबरोबर महिलांच्या तोंडीही शिव्या ऐकायला मिळतात. होळीच्या सणाप्रसंगी दिल्या जाणाऱ्या लालित्यपूर्ण आणि गेय शिव्यांचा आढळ मराठवाड्याच्या लोकजीवनात होता. ह्या शिव्या हा मराठवाड्याच्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग होता. वर्तमानात ह्यातील बहुसंख्य शिव्या विस्मरणात गेल्या आहेत. अशा कालबाह्य होत गेलेल्या शिव्या डॉ. साहेब खंदारे यांनी संकलित केल्या आहेत.
कृषिसंस्कृतीशी संबंधित हजारो शब्द आता वापराविना विस्मृतीत जात असल्याबद्दल लेखकाने खंत व्यक्त केली आहे. ही आविष्कार परंपरा वाचताना डॉ. खंदारे यांच्या संशोधन कार्याचा आवाका आपल्या लक्षात येतो.
जी गोष्ट गाण्यांची, तीच लोककथांची मराठवाड्याच्या जनमानसात अनेक लोककथा रूढ झालेल्या आहेत. ज्या काळात ग्रामीण भागात आजच्यासारखी लोकरंजनाची कोणतीच साधने उपलब्ध नव्हती, त्या काळात याच लोकगीतांनी आणि लोककथांनी पिढ्यानपिढ्यांचे भरणपोषण केले आहे. मराठवाड्याच्या मातीत आपल्याला म्हणींचे भांडार पाहायला मिळते. मराठवाडी माणूस आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी संवादात म्हणींचा अगदी सहजपणे वापर करतो. ह्या म्हणींतून जगण्यातील विविधता लक्षात येते. डॉ. साहेब खंदारे यांनी ह्या प्रकरणात मराठवाडी म्हणींचा अक्षरशः खजिनाच खुला केला आहे.
मराठवाड्यात कोडे घालण्याची आणि विविध प्रसंगांच्या निमित्ताने पल्लेदार उखाणे घेण्याची पद्धत आहे. काळाच्या प्रवाहात अस्तंगत होत चाललेले हे सांस्कृतिक संचित डॉ. खंदारे यांनी ग्रंथबद्ध करून ठेवले आहे.
देशातील इतर भागांप्रमाणे मराठवाड्यातही निसर्गपूजा आणि पितरांची पूजा रूढ झाली. यातूनच देवदेवतांचे विश्व निर्माण झाले. डॉ. साहेब खंदारे यांनी 'मराठवाड्याचे दैवत-विश्व' ह्या प्रकरणात कुलदेवता, ग्रामदेवता, कृषिदेवता आणि लौकिकदेवता असे चार वर्ग करून ह्या वर्गांतील देवदेवतांची तपशीलवार माहिती दिली आहे. प्रत्येक कुलानुसार कुलदेवता वेगळ्या. तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका, माळेगावचा खंडोबा, नळदुर्गचा खंडोबा, साताऱ्याचा खंडोबा आणि मराठवाड्यातील इतर कुलदेवतांची त्यांचे स्थानमाहात्म्य आणि आख्यायिकांसह माहिती दिली आहे. काही ठिकाणी प्राचीन ग्रंथांतील संदर्भ दिले आहेत. याशिवाय भवानी, सटवाई, शीतलादेवी, जरीआई-मरीआई, पोचमामाय, वाघामाय, हनुमान, खंडोबा, भैरव, काळभैरव अर्थात भैरवनाथ ह्या काही ग्रामदेवता आहेत. प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेनुसार ह्या देवतांची पूजाअर्चा करत असतो.
मराठवाड्यातील लोकजीवन हे मुख्यतः शेतीवर आधारित असल्यामुळे सात आसरा, मसोबा, बुध्या, लक्ष्म्यां अशा कृषिदेवतांची पूजा केली जात असे, आजही केली जाते. औंढ्याचा नागनाथ, वेरूळचा घृष्णेश्वर, परळीचा वैद्यनाथ आणि अंबाजोगाईची जोगेश्वरी ह्या लौकिकदेवतांनी मराठवाड्याचे श्रद्धाविश्व व्यापलेले आहे. डॉ. साहेब खंदारे यांनी ह्या देवदेवतांची सचित्र माहिती दिली आहे.
भारतातील सर्व सण आणि उत्सव कृषिसंस्कृतीच्या परंपरेतून आलेले आहेत. मराठवाडा ही भूमीही त्याला अपवाद नाही. गुढीपाडवा, हनुमान जयंती, चातुर्मास, नागपंचमी, पोळा, महालक्ष्मी, हिंगोलीचा दसरा महोत्सव, दिवाळी, सटी नागदिवे, येळामोशा किंवा येळावस, मकरसंक्रांत, होळी इ. सण आणि उत्सव कसे साजरे केले जातात, याचे शब्दचित्र फारच छान उभे केले आहे.
लोकधर्म आणि अमूर्त लोकमानस' ह्या ५२ पृष्ठांच्या दीर्घ प्रकरणात मराठवाड्यातील लोकधर्माचे विविध पैलू अधोरेखित केले आहेत.
आराधी, वाघ्या मुरळी ह्या लोकधर्मी संस्था, मराठवाड्यातील शक्तिपीठे, वाघ्या मुरळीच्या जागरणाचे स्वरूप, डहाका किंवा डाका, त्यांची गाणी, मरीमायचा पोतराज, पोतराजाची गाणी, वासुदेव आणि त्याची गाणी, बोहाड्याची नृत्यनाट्ये आणि कीर्तन परंपरेचा सखोल आढावा घेतला आहे.
संत एकनाथ, संत नामदेव, संत दासगणू महाराज, भगवान बाबा, धुंडा महाराज देगलूरकर, मारोतराव महाराज दस्तापूरकर, बंकटस्वामी बीडकर, जगन्नाथ महाराज पोखर्णीकर ह्या मराठवाड्यातील संतांनी महाराष्ट्राची संतपरंपरा समृद्ध केली आहे. ह्या संतांनी आपल्या कीर्तनातून समाजाचे प्रबोधन केले. समाजाला दिशा दिली. या संतपरंपरेचा आढावा डॉ. खंदारे यांनी घेतला आहे.
पांगूळ, कुडमुडे जोशी, नंदीबैलवाला, मसणजोगी, किंगरीवाला, नाथपंथी गोसावी, मोर नाचविणारे डक्कलवार ह्या लोकभिक्षेच्या हक्कदारांनी वेगवेगळी गाणी गाऊन मराठवाड्याच्या लोकजीवनात आपले स्थान निर्माण केले होते. त्या सगळ्यांचा आढावा डॉ. खंदारे यांनी अतिशय बारकाईने घेतला आहे.
मराठवाड्यात नवस बोलणे, पाळणा वाहणे, डोळे वाहणे, निशाण (झेंडा) लावणे, कळस वाहणे, गावजेवण देणे, सवाष्णी जेवू घालणे, कुमारिका जेवण, मुंजा जेवण, दर्ग्यावर चादर चढविणे, कंदुरी, घोडा-मलिदा, श्रावण सोमवारचे व्रत, सत्यनारायण कथाव्रत, मंगळागौर, हरितालिका, पुशाईतवार इ. विधी आणि व्रतवैकल्ये केली जातात. डॉ. खंदारे यांनी त्यावर संशोधनपूर्वक प्रकाश टाकला आहे.
मराठवाड्याच्या ग्रामीण लोकजीवनात दृष्ट लागणे, दृष्ट काढणे, पायरेव होणे, सटी-सोयनी, सुट्रं किंवा फिसके, पाणी भारून देणे, शकून पाहणे, गोटा फिरणे, मंत्र-तंत्र, विंचू उतरवणे, नागबा-याची भजने, सापाचा वटा-अनुष्ठान, करणीधरणी, जादूटोणा, यंत्र-तंत्र, मरीआईचा गाडा, गावबांधणी, बोणं चढवणं इ. लोकविधींना महत्त्वाचे स्थान होते आणि काही प्रमाणात आजही आहेच. यामागच्या समजुतींचा डॉ. खंदारे यांनी फार छान परामर्श घेतला आहे.
मराठवाड्याची लोकरंगभूमी अगदी प्राचीन काळापासून समृद्ध आहे. लोकरंगभूमीसह गायन, वादन, संगीत, नाट्य, विविध पारंपरिक खेळ ह्या प्रयोगशील कला विभागातही मराठवाड्याचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. 'प्रयोगशील कला' ह्या प्रकरणात डॉ. खंदारे यांनी ह्या उज्ज्वल वारशाचा वेध घेतला आहे. आधुनिकतेच्या अट्टाहासापायी हे लोकसमूह विलग होत चालल्याबद्दल लेखकाने खंत व्यक्त केली आहे. त्यातील काही कला आज केवळ सांस्कृतिक संचिताच्या स्वरूपात शिल्लक राहिल्या आहेत. दंडारणं, लळीत अर्थात पंचमीची सोंगे, तमाशा आणि वगनाट्य, लोकनाट्य, सोंगी भजन, पौराणिक देखावे, रामलीला, पोवाडा, फेरावरची नृत्य-गाणी हे ते मराठवाड्याचे सांस्कृतिक संचित होय. ह्या सांस्कृतिक संचिताचा डॉ. खंदारे यांनी फारच नेटकेपणाने वेध घेतला आहे.
पूर्वी मराठवाड्यातील मुले शिवनापाणी, लपणा-छपणी, तळ्यात-मळ्यात, हुतुतू, आट्यापाट्या, लिंगोरच्या, मल्लखांब, विटीदांडू, कडीचा भोवरा, भेंडी, धप्पाकुट्टी, कुस्ती, काचेच्या गोट्या, पखानी गोट्या, सोटमार इ. शारीरिक श्रमाचे पारंपरिक खेळ खेळत. मुली भुलाबाईचा उत्सव, फुगडी, लंगडी, सागरगोटे, दोरीवरच्या उड्या इ. पारंपरिक खेळ खेळत असत. ते खेळ खेळताना त्या खेळासोबत जोडलेली पारंपरिक गाणी म्हणत. आता ते खेळच बंद झाल्यामुळे नवीन पिढीला त्या गाण्यांचाही विसर पडला आहे. मराठवाड्यातील प्रयोगशील कलाप्रकारांची ओळख करून घेण्यासाठी आणि त्याद्वारे शाश्वत विकासाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी अमूर्त संस्कृती घटकांचा हा ठेवा पुरेसा आहे, हे लेखकाचे आग्रही प्रतिपादन आहे.
कुंभार, सुतार, लोहार / घिसाडी, चांभार, मांग पाथरवट / गवंडी, विणकर इ. कारागिरांच्या लोकसंस्थांनी मराठवाड्याचे लोकजीवन समृद्ध केले आहे. मराठवाड्यातील विणकरांची वस्त्रकला भारतभर प्रसिद्ध होती. पैठणच्या पैठणीला लोकमान्यतेबरोबरच राजमान्यता लाभली होती. पितळखोरे आणि अजिंठ्यासह मराठवाड्यातील इतर ठिकाणच्या लेण्यांमधून जी चित्रकला पाहावयास मिळते, तीच मराठवाड्यातील सर्वात जुनी चित्रकला होय. मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमधून मंदिराच्या भिंतींवर स्थानिक कलावंतांनी विविध प्रकारची चित्रे रेखाटली आहेत. ग्रामीण महिला सणासुदीच्या काळात भिंतींच्या देवळ्या आणि खिडक्यांवर सुंदर अशी कलाबतू काढत. या अमूर्त संस्कृती संचिताचा, तसेच आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून मराठवाड्याचा शाश्वत विकास साधता येतो, असा विश्वास डॉ. खंदारे यांनी व्यक्त केला आहे.
मराठवाड्याच्या कृषिसंस्कृतीत निसर्गाकडे पाऊस मागण्यासाठी घड घालण्याचा विधी केला जात असे. त्यावेळी मुले 'धोंडी पाणी दे' अशी गाणी म्हणत. शेतकरी वाफ धावणी, रानसितळाई, खळं पूजन असे विधी करत. जमिनीखालील पाणी शोधण्यासाठी शेतकरी काही आडाखे बांधत. पेरणीसंबंधी शेतकर्यांच्या काही धारणा होत्या. चांगला बैल ओळखण्याची त्यांची लक्षणे ठरलेली होती. शेतकऱ्यांच्या काही पारंपरिक कृषिधारणा होत्या. ह्या सगळ्या गोष्टी डॉ. खंदारे यांनी प्रयत्नपूर्वक संकलित केल्या आहेत. कालबाह्य होत गेलेल्या कृषिसाधनांची शब्दावळ गुंफली आहे. शेतजमीन, जमिनीची मशागत आणि हंगाम याविषयीच्या त्यांच्या काही संकल्पना ठरलेल्या होत्या. पुढच्या पिढीला कदाचित ही शब्दावळ आणि ह्या संकल्पना आठवणारही नाहीत. ह्या गोष्टी वाचत असताना, आधुनिकतेच्या नावाखाली, आम्ही किती मोठ्या सांस्कृतिक संचिताला मुकत चाललो आहोत, याचे शल्य टोचत राहते. डॉ. साहेब खंदारे यांनी ह्या अमूर्त संस्कृती संचिताचे दस्तऐवजीकरण करून अभूतपूर्व असे काम केले आहे.
मराठवाड्याची भौतिक संस्कृती' ह्या समारोपाच्या प्रकरणात मराठवाड्यातील निवारे आणि वास्तूंची माहिती दिली आहे. नवीन पिढीतील लोकांना माडी, माळवद, लादनी, गढी ह्या शब्दांचे अर्थ कितपत समजतील, शंकाच आहे. ह्या प्रकरणात मराठवाडी खाद्यसंस्कृतीचाही आढावा घेतला आहे. स्त्री - पुरुषांची वस्त्रे आणि आभूषणे, धान्य मोजण्याची मोजमापे आणि वाहतुकीची पारंपरिक साधने यांची सचित्र माहिती दिली आहे. वस्तुनिष्ठता आणि सप्रमाणता हा ह्या लेखन-संशोधनाचा स्थायीभाव आहे. प्रस्तुत ग्रंथाला संदर्भमूल्य आहे आणि संशोधनमूल्यही आहे.
आपल्याकडचा इतिहास हा सामान्यतः राजकीय अंगानेच लिहिला जातो. राजेरजवाडे, सरदार, सेनापती, त्यांच्या लढाया, त्यांचे पराक्रम याविषयीच भरभरून लिहिले जाते. त्यात सामान्य माणूस कुठेच दिसत नाही. किती लाख बांगडी फुटली, एवढ्यापुरताच सामान्य माणसाचा निनावी उल्लेख असतो. ह्या इतिहासातून सामान्य माणूस गहाळ झालेला असतो. डॉ. साहेब खंदारे यांनी हा इतिहास सामान्य माणसाला मध्यवर्ती ठेवून लिहिला आहे. यातही राजांचे उल्लेख आहेत, पण ते तेवढ्यापुरतेच. बाकी हा सामान्य माणसांनी घडविलेला सांस्कृतिक इतिहास आहे.
हा ग्रंथ वाचताना आपण केवढ्या मोठ्या वैभवशाली सांस्कृतिक संचिताला मुकलो आहोत, याची रुखरुख लागते. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव यांनी 'मराठवाड्याची संस्कृती ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची जननी आहे' असे विधान केले होते. प्रस्तुत ग्रंथ वाचत असताना डॉ. देव यांच्या त्या विधानाची प्रतिती येते.
मर्मग्राही संशोधक डॉ. साहेब खंदारे यांनी अतिशय निष्ठेने हे वस्तुनिष्ठ असे संशोधन आणि लेखन केले आहे. मराठवाड्याच्या लोकमानसाचे अंतरंग शोधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणारा हा अनमोल असा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. हा ग्रंथ म्हणजे मराठवाड्याच्या लोककेंद्री इतिहासाची नेटकी साक्ष आहे. मराठवाड्याच्या आणि उर्वरित प्रदेशांच्याही लोकसंस्कृती संचिताच्या अभ्यासाला गती देणारा हा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. ह्या क्षेत्रातले डॉ. साहेब खंदारे यांचे योगदान लक्षणीय आहे. डॉ. खंदारे यांच्या ह्या संशोधनाची नोंद युनेस्कोनेही घेतली आहे. प्रस्तुत ग्रंथाची संपूर्ण आर्ट पेपरवर रंगीत छपाई करून वैभवशाली निर्मिती केली आहे. शिस्तबद्ध संशोधन आणि प्रमाणबद्ध लेखन यामुळे प्रस्तुत ग्रंथाला बृहद्कोशाचे रूप आले आहे. सदर ग्रंथ वाचत असताना डॉ. खंदारे यांची बांधिलकी इथल्या मातीशी आणि माणसांशी असल्याची साक्ष पटते. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे डॉ. साहेब खंदारे यांनी मागील २० वर्षांपासून निष्ठापूर्वक केलेल्या संशोधनाचे फलित आहे.
'मराठवाडा अमूर्त संस्कृती संचित (संशोधन)
संशोधक आणि लेखक : डॉ. साहेब खंदारे
प्रकाशक : लोकविद्या प्रकाशन, परभणी
मुखपृष्ठ : सरदार जाधव
मोठ्या आकारातील रंगीत पृष्ठसंख्या : ३४४
किंमत रु. २०००
ग्रंथपरिचय :
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS