'मुंग्यांना साखर खायला घालणारा व्यापारी
शेण कालवून विकतो गुळात.
रेशनच्या तांदळात
सर्रास मिसळले जातात तांदूळ प्लास्टिकचे'
(थि. मा. ग. पृ. २५)
हे कडवट सत्य ही कविता सांगून जाते.
'जाळी लावली आहेत सर्वत्र
फसव्या शिका-यांनी
देतील हारतुरे आणि आणतील
टप्प्यात तुम्हाला योग्य कार्यक्रम करण्यासाठी'
अशा शब्दांत कवयित्रीने बेसावध असणाऱ्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्याचा काळ हा संभ्रमाचा काळ असून ह्या काळात माणूस पुरता हतबल झाला आहे, याचे चित्र कवयित्रीने अनेक कवितांतून उभे केले आहे.
हल्ली आपल्या सभोवताल आतल्या गाठीच्या माणसांची संख्या फारच वाढली आहे. अशा लोकांचे वर्णन करताना कवयित्रीने लिहिले आहे
'पोटात एक आणि ओठांत एक
अशी दुग्गल नीती त्यांनी
असते अवलंबलेली'
(थि. मा. ग. पृ. २९)
अशा खोडील माणसांपासून चार हात दूर राहावे, असा सल्ला ही कवयित्री देते.
अशा लबाडांची मस्ती, माज आणि उन्माद उतरविण्याची भाषा ह्या कवितेत आली आहे.
आज जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. ह्या वातावरणाचे वर्णन करताना करताना 'कुलूप' ह्या कवितेत कवयित्रीने लिहिले आहे :
'बंद घराचं रक्षण करण्याची जबाबदारी घेणारं
कुलूपच शक्तिहीन झालय आज.
आज रित्या माणसांनी घरं भरली आहेत.
कुलपंही वाढलीत घरात आज
ड्रॉवर, तिजोरी आणि पेटीला
विश्वासच राहिला नाही
कुणाचा कुणावर'.
(थि. मा. ग. पृ. ३२)
सोनिया पाटील यांची कविता अतिशय डोळसपणे जगण्याचे संदर्भ शोधत निघालेली आहे. जगण्याचे संदर्भ शोधत असताना
'पदोपदी पेरून ठेवले आहेत
अडथळ्यांचे डोंगर आणि वाटेवर काटे'
याचा दाहक अनुभव कवयित्रीला येतो.
'मूक आक्रंदन सुरू आहे
देशात विविध घटकांचे
तेव्हा निर्ढावलेले लोक
चवीने वाचतात
वर्तमानपत्रातील बातम्या.
बळीराजाला
जनावराबरोबर ढोरकष्ट उपसूनही
भाकरीचा चंद्रही त्याला गवसत नाही'.
(थि. मा. ग. पृ. ३७)
हे कवयित्रीचे निरीक्षण खोटे आहे, असे कसे म्हणता येईल?
हल्ली रिंगण सोडून बाहेर पडू पाहणाऱ्या माणसाची अवस्था लंगड्या गायीसारखी होते.
दांभिक लोकांचे बेगडी मुखवटे टरकावताना कवयित्रीने लिहिले आहे :
'ओळखले आहेत मी चेहरे
आपलेपणाचे
मुखवटे चढवून येणारे
खोटं सांत्वन करायला.
त्यांनी केलेले सांत्वन असते
केवळ नाटक
खोटा आधार देण्यासाठी
दिखाऊगिरी करण्यासाठी
मनातून विष ओकणारी जमात ही
मी पुरती ओळखून आहे.
त्यांची पोकळ सहानुभूती
नको आहे मला'.
(थि. मा. ग. पृ. ४३ व ४४)
ह्या लोकांचे वाण गाईचे आणि गुण गाढवाचे आहेत, हे सांगायलाही कवयित्री विसरत नाही.
हल्ली माणसं फारच भावनाशून्य झाली आहेत.
'मानवता हाच धर्म
माणुसकी हीच जात
फक्त शिकविले जाते सर्वत्र
प्रत्यक्षात काय?'
(थि. मा. ग. पृ. ४६)
असा रोखठोक सवाल ही कवयित्री उपस्थित करते.
हल्ली गुन्हेगारी रोखण्यासाठी जागोजाग नाकाबंदी केली जाते. अशा परिस्थितीत कवयित्रीला प्रश्न पडतो :
'नाकाबंदी करून
थांबणार आहे का गुन्हेगारी?
ही कसली नाकाबंदी
रस्ते अडवून आडवाटा खुल्या सोडणारी
न्हाणीला बोळा अन्
दरवाजा उघडा'.
(थि. मा. ग. पृ. ४७)
ह्या कवितेत कवयित्रीने ग्रामीण लोकोक्तीचा फारच छान वापर केला आहे.
नीती अनीतीच्या द्वंद्वात
अनीती शिरजोर होताना
वाटते की
डोळे घट्ट मिटून घ्यावेत'
ही सामान्य माणसाची हतबलता आहे.
'अनीतीलाच नीती समजून
खोटं खरं म्हणून मिरवत आहे
अन्यायानं न्यायाचा बुरखा पांघरून
पदयात्राच काढली आहे'.
(थि. मा. ग. पृ. ७७)
अशीच परिस्थिती राहिली, तर न्यायावरचा विश्वास उडायला वेळ लागणार नाही.
उगवतीला वंदन करण्याच्या प्रवृत्तीमुळे
'अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे
पाहत नाही कुणीच ढुंकून'
हे सार्वकालिक सत्य कवयित्रीने अधोरेखित केले आहे.
वर्तमानाचे भयकारी चित्र रेखाटणारी 'भयकाल' ही ह्या संग्रहातली एक अप्रतिम अशी कविता आहे. यात कवयित्रीने लिहिले आहे :
'अनामिक भीतीने पोखरले आहे समाजाला
हतबल झाले आहेत इथले जीव
तोडली जात आहेत माणसं
एकमेकांपासून सतत
अन् कालवले जात आहे विष
त्यांच्या मनात विद्वेषाचे.
निष्प्रभ झाले आहेत मानवी मेंदू
माणसे सहज बळी पडतात अपप्रचाराला.
भारत माझा देश आहे
सारे भारतीय माझे बांधव आहेत
प्रतिज्ञा फक्त पुस्तकात, वागतात शत्रूराष्ट्रासारखे
अनामिक भीतीचा हा भयकाल
कुरतडतोय आपल्या अस्तित्वाला'.
(थि. मा. ग. पृ. ५४ व ५५)
एकेकाळी आपल्या देशात विविध विचारसरणींचे गट-तट होते. परस्परविरोधी मतप्रवाह होते. विरोध असला, तरी एकमेकांच्या मताचा आदर केला जात असे. पण तो काळ आता इतिहासजमा झाला आहे. आता जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत 'टोळकी' तयार झाली आहेत. ही टोळकी नंदीबैलांसारखी वागू लागली आहेत.
'टोळक्यात टाळक्यांचीच
गर्दी वाढू लागली
टाळक्यांच्या टोळक्यात
गुणवत्ता मरू लागली'.
(थि. मा. ग. पृ. ५६)
टाळक्यांच्या आणि टोळक्यांच्या भाऊगर्दीत आता सुष्ट आणि दुष्ट यातील ओळखच पुसली गेली आहे.
महागाईच्या काळात कष्टकऱ्यांच्या हातातोंडाशी गाठ पडणेही अवघड झाले आहे. ही परिस्थिती पाहिल्यावर कवयित्री लिहिते:
'आवक-जावक हिशेबाचा
मेळ काही लागत नाही
काही केल्या घडामोडींचा
ताळेबंद जुळत नाही'.
(थि. मा. ग. पृ. ६०)
समाजातील शोषक आणि शोषितांची साखळी कवयित्रीला अस्वस्थ करते आहे. राबणाऱ्यांचं, खपणा-यांचं आयुष्य चिपाडासारखं झालं आहे, हे कवयित्रीचं शल्य आहे. म्हणून कवयित्री लिहिते :
'आपण फक्त राबायचं
घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं
आणि फिरत राहायचं आयुष्याच्या खुंट्याभोवती
बाकी रस पिणारा पिऊन जातो
अन् घाणा ओढून मरतो
ऊस पिकवूनही आपण तिष्ठत राहतो'.
ही कविता म्हणजे कष्टकऱ्यांच्या व्यथावेदनेचा आणि श्रमाघामाचा हिशेब मांडणारी ऊर्जस्वल कविता आहे.
आता ही व्यवस्था इतकी सडली आहे, की ह्या व्यवस्थेवर भाष्य करताना कवयित्री लिहिते :
'व्यवस्थेचा दर्प
होत नाही सहन
उग्र कुबट वासाने
माणुसकीच जात आहे गुदमरून.
गरज आहे आता
व्यवस्थेच्याच शुद्धीकरणाची
करावी लागणार आहे फवारणी
दुर्गुणांच्या निर्जंतुकीकरणासाठी'.
(थि. मा. ग. पृ. ६६)
आपल्या देशाची आजची परिस्थिती पाहता कवयित्रीने त्यासाठी वापरलेली 'वाळवीने पोखरलेले झाड' ही प्रतिमा अतिशय अन्वर्थक आहे.
आपल्या भोवताल वावरणारे अस्तनीतले निखारेही कमालीचे बेइमान आहेत, कारण कृतघ्नतेची बीजं पेरली होती त्यांच्या रक्तात, हे कवयित्रीचे निरीक्षण आहे.
आजच्या आभासी जगात आम्ही खूप प्रगती केली असली, तरी सगळ्यात उपेक्षित राहिला आहे तो कास्तकार. त्याच्या कष्टाची कदर कोणालाही नाही. त्याने पिकविलेल्या शेतीमालाला मोल नाही. शेतकऱ्यांच्या वंचनेला उद्गार देताना 'ब्रॅण्डेड पारख' ह्या कवितेत कवयित्री लिहिते :
'का हे असं होतं बळीचं?
तर झगमगीत मॉल नाही
किंमतीचं लेबल नाही
बारकोड स्टिकर नाही
हल्ली भुलतात माणसं
वरकरणी झगमगाटाला'.
(थि. मा. ग. पृ. ७२)
कृषक आणि कृषिक्षेत्राच्या उपेक्षेची कवयित्रीने केलेली मीमांसा शतप्रतिशत पटण्यासारखीच आहे.
हल्ली राजकारणात वापरा आणि फेका हे सूत्र अवलंबिले जाते आहे. ह्या स्वार्थी सूत्रावर,
'सोहळा' ह्या कवितेत कवयित्रीने सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी अतिशय परखड आणि टोकदार भाष्य केले आहे.
'आता पक्षांना पक्षाघात होतो आहे
पक्ष फुटतात, मने तुटतात
इकडून तिकडे, तिकडून इकडे
बेडूकउड्या मारल्या जातात.
निकाल लागताच सोहळा संपन्न होतो.
सोहळ्याचा मुख्य घटक असलेला मतदार
पुन्हा पाच वर्षांसाठी उपेक्षित होतो'.
(थि. मा. ग. पृ. ९५)
हे भाष्य आमच्या लोकशाहीचे चरित्र आणि चारित्र्य उजागर करून जाते.
हल्ली बेगडी माणसांचा काळ आला आहे. टिकाऊपेक्षा दिखाऊ गोष्टींवर भर दिला जात आहे. काम कणभर आणि दंभ मणभर अशी आजची एकूण परिस्थिती आहे. या चमकोगिरीवर कडवट भाष्य करताना कवयित्रीने लिहिले आहे :
'आडातच नसेल, तर मग
पोह-यात कुठून येणार?
गाढवाला आयाळ बांधली
तरी सिंह थोडाच होणार?'
हा बेगडी व्यवस्थेला निरुत्तर करणारा सडेतोड सवाल कवयित्रीने उपस्थित केला आहे.
परिस्थिती इतकी प्रतिकूल असली, तरी कवयित्री निराशावादी नाही. ती कमालीची आशावादी आहे. अखेर सत्याचाच विजय होईल, असा दुर्दम्य विश्वास कवयित्री बाळगून आहे. दुराचारी लोकांच्या अंताविषयी ती लिहिते :
'एक दिन अंत त्यांचा
नक्कीच आहे होणार
कर्माची फळे त्यांना
निश्चितच आहे भोवणार'.
हा विश्वाससुद्धा काळ्याकुट्ट अंधारातही प्रकाशाचा एक किरण दाखवून जातो.
आपल्या ह्या विश्वासाला प्रार्थनेची पुष्टी देताना कवयित्री म्हणते :
'देवा सूर्यनारायणा,
तू असाच प्रकाशपेरणी कर
अंधाराला हरविण्यासाठी
उजेडाचं वाण धर'.
(थि. मा. ग. पृ. १२६)
कवयित्रीसारख्या समविचारी तरुण पिढीने निग्रहाने उजेडाचे वाण धरले, अशक्यही शक्य होऊ शकते, हा तो विश्वास आहे.
ह्या व्यवस्थेच्या विरोधात निर्धाराने, एकाकी लढण्याची कवयित्रीची मानसिक तयारी आहे. म्हणून ती ठामपणे म्हणते :
'आत्मविश्वासाने लावतेय धार
शब्दशस्त्रांना
खात्री आहे पक्की
शब्दच देतील मला न्याय
आणून ठेवतील बोट धरून
यशाच्या वाटेवर'.
कवयित्रीने व्यक्त केलेला स्वतःवरचा आणि शब्दांवरचा विश्वास सार्थ ठरावा, यासाठी आपण शुभेच्छा तर नक्कीच देऊ शकतो.
सोनिया पाटील यांची ही कविता केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय विषयांनाही आपल्या कवेत घेते. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे पडसाद ह्या कवितेत उमटले आहेत. ही केवळ दोन देशांतली लढाई नसून ही वर्चस्ववादाची लढाई आहे. या लढाईमुळे शस्त्रांचा बाजार तेजीत आहे. आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सामान्य माणसाला वेठीस धरले जात आहे. यावर भाष्य करताना कवयित्रीने लिहिले आहे :
'इथे कुणालाच पडत नाही फरक
मारणारे मारतात, मरणारे मरतात
शस्त्रांचा बाजार फुलण्यासाठी
युद्ध लांबतेच आहे
का मुद्दाम लांबवले जात आहे?
काहीच कळत नाही
या वर्चस्वाच्या लढाईत'.
(थि. मा. ग. पृ. १०९)
समकालीन समाजातील माणुसकी थिजली आहे आणि तिला खोटाखोटा गहिवर आणला जातो आहे. ह्या अर्थाने कवितासंग्रहाला कवयित्रीने दिलेले 'थिजलेल्या माणुसकीचा गहिवर' हे शीर्षक अतिशय समर्पक, अर्थपूर्ण आणि अर्थवाही आहे. ह्या संग्रहाला डॉ. पी. विठ्ठल यांची विवेचक प्रस्तावना लाभली असून दा. गो. काळे यांनी ह्या संग्रहाची पाठराखण केली आहे.
आजची युवापिढी जगाबद्दल आणि जीवनाबद्दल फारसा गंभीरपणे विचार करत नाही, असे एक विधान अधूनमधून ऐकायला मिळते. सोनिया पाटील यांची ही रसरशीत कविता वाचल्यानंतर आणि त्यातील बहुमुखी चिंतन पाहिल्यानंतर वरील विधानातील फोलपणा जाणवतो. सोनिया पाटील यांची ही कविता म्हणजे आजच्या युवापिढीचा सामूहिक स्वर आहे, प्रतिकूल परिस्थितीवरची प्रतिक्रिया आहे, असे मला वाटते.
थिजलेल्या माणुसकीचा गहिवर (कवितासंग्रह)
कवयित्री : सोनिया मनोज पाटील
प्रकाशक : संस्कृती प्रकाशन, पुणे.
मुखपृष्ठ व आतील रेखाटने : नंदू वानखडे
पृष्ठे : १७६ किंमत रु. २००
पुस्तक परिचय :
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS