वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

प्रतिभा खैरनार यांचा 'वंशावळीच्या प्राचीन सरीतून' हा कवितासंग्रह म्हणजे स्त्रीत्वाची गहन गाथा आहे. ह्या कवितेत सर्वस्तरीय स्त्रीत्वाच्या ठसठशीत मरणकळा ठासून भरलेल्या आहेत. स्त्री बाळंत होते, म्हणजे तिच्या उरातली घुसमट बाळंत होत असते, पिढीदरपिढी. ती नव्या घुसमटीला पुन्हा नव्याने जन्म देत असते.

'निवडुंगाने गच्च मिठी मारावी, तशी तुझी आठवण मला बिलगते अन् माझ्या कित्येक रात्री रक्तबंबाळ होतात' ही प्रतिक्रिया आहे कवितागत अभिसारिकेची.

'तुला आठवतं? तू मला भेटलास आणि त्यानंतर मी मला कधीच भेटले नाही' अशी तिची अवस्था झालेली. किंबहुना ती त्याच्यात विरघळून गेलेली. इतकी अनन्यता सोडली तर बाकी सावलीतही ऊन पोळण्याचे दाहक अनुभवच अधिक आहेत ह्या कवितेत.

'पाळीचे चार दिवस बाजूला बसून आज ती पडली होती उंब-याबाहेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पथनाट्यासाठी' अशी विसंगतीही कवयित्रीने टिपली आहे.

'तुझ्या गाव वाटेवर

किती अत्तराचे डोह

जीव झालाय सुगंधी

त्याला गंधण्याचा मोह'

अशा मोहक शब्दांत ही कविता वाचकमनात दीर्घकाळ दरवळत राहते.

'मोहापायी पाळंमुळं

घट्ट रोवून घेऊ नये

जमिनीने स्वतःमध्ये

वडाच्या पारंब्यांना

प्रेमाच्या भ्रमात ठेवून'

इतकी समंजस जाण ह्या कवितेला आहे.

'जन्मोजन्मी मागतेय

बाई प्रसव वेदना

वांझपणाच्या कपाळी

मातृत्वाचा परगणा'

हा बाई'पणाचा भोगवटा पिढीदरपिढी चालूच आहे. 

कवयित्रीच्याच शब्दांत सांगायचे तर हा कवितासंग्रह म्हणजे आपलीच लिपी वापरून आपल्याच मातृभाषेत केलेला स्त्रीच्या हरएक प्रतिबिंबाचा हा अनुवाद आहे. 

कवयित्रीने बाईची आणि चुलीची फारच छान तुलना केली आहे. काही तरी शिजविण्यासाठी, कोणाचे तरी भरणपोषण करण्यासाठी जन्मभर चूल धुपत असते आणि तिच्या जोडीने जन्मभर बाईही संसारात धुपत असते, धुमसत असते. दोघीही आपल्या आत वास्तव आणि विस्तव दडवून ठेवतात. बाई आणि चूल जणू एकाच गर्भातून आलेल्या जुळ्या बहिणी आहेत, असे कवयित्रीला वाटते. 

'बाई जीवनाच्या कॅनव्हासवर 

नैतिकतेने रंग उधळत असते

स्वतःला ब्लॅक अँड व्हाईट करून'

हे कडवट वास्तव ही कविता मोठ्या धीटपणे मांडते. 


देवीला सोन्याचा मुकूट अर्पण केल्याची बातमी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर आणि एका मुलीवर बलात्कार झाल्याची बातमी शेवटच्या पानावर, हा माध्यमांचा पक्षपाती प्राधान्यक्रम पाहिल्यावर कोणाही संवेदनशील माणसाला संताप आल्यावाचून राहणार नाही. आपला हा संताप कवयित्रीने अतिशय संयतपणे व्यक्त केला आहे. 

भुई आणि बाई यांच्यातील साम्य कवयित्रीने फारच चित्रदर्शी शब्दांत अभिव्यक्त केले आहे. भुईवरच्या नांगराच्या रेघा आणि बाईच्या ओटीपोटावरच्या रेघा कवयित्रीला सारख्याच वाटतात. जगाची भूक भागविण्यासाठी दोघीही अंगावर ओरखडे ओढून घेत असतात. हे कवयित्रीने अतिशय काव्यमय शब्दांत अधोरेखित केले आहे. 

रंगारूपाने आकर्षक असलेली बाई सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते, पण 'बाईच्या आतली बाई' जाणून घेण्याची तसदी कधीच कोणीही घेत नाही. कशी आहे बाईच्या आतली बाई? प्रसंगी ती विहिरीइतकी खोल आहे. सागराइतकी अथांग आहे. कुंकवाइतकी लालभडक आहे. विधवेच्या साडीसारखी पांढरीशुभ्र आहे. प्रसंगी कापसासारखी मऊ आहे आणि दगडासारखी टणकही आहे. आतली अन् बाहेरची बाई जशा एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या दोन सावत्र मुली. असे स्वच्छ आकलन आहे कवयित्रीचे. 

ह्या आतल्या बाईची तहान पुरुषी वासनेचा अख्खा समुद्र गिळंकृत करूनही तहानलेली असते थेंबभर प्रेमासाठी आयुष्यभर. 

ऑफिसमध्ये काम करणारी बाई आणि रस्त्यावर खडी फोडणारी बाई यांच्यासाठी कवयित्रीने वापरलेली मंदिरातील पितळी घंटीची प्रतिमा मोठीच अन्वर्थक आहे. 

कवयित्रीने चाळिशीच्या उंबरठ्यावर आलेल्या बाईच्या भावावस्थेचे फारच छान वर्णन केले आहे :

'झिजलेले दोन पाय

उनाड पैंजण पायात घालून

घरभर नाचत असतात 

अन्

गजबजलेल्या वेळेत

जेरबंद स्वप्न 

मनाच्या उंबरठ्यावर 

घुटमळत असतात'. 

जेरबंद स्वप्न घेऊन जगणारी ही बाई मोठीच केविलवाणी आहे. 

सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आपल्याला स्वातंत्र्य आणि गुलामगिरीची व्याख्या समजली. स्वतःच्या अस्तित्वाच्या आखीवरेखीव सुरेख रेघोट्या मारता आल्या. बाई'पणाचा अर्थ उमगत गेला. याबद्दल कवयित्रीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. 


'बाई एकान्तात स्पर्शाची बाराखडी गिरवत असते. भूतकाळ आणि भविष्याची गणितं सोडवत असते. अपेक्षांचे छाटलेले पंख लावून गोंदवून घेते मनावर अस्वस्थ क्षणांचे डंख 

बाई आणि एकान्त एकटे नसतात कधी... '

बाई पुरुषासोबत किती एकरूप झालेली असते याचे वर्णन करताना कवयित्रीने लिहिले आहे :

'पुरुषाच्या आयुष्यात 

साखरेसारखी अन् मिठासारखी

विरघळलेली असते बाई

त्यांच्याही नकळत त्यांच्यामध्येच

वावरत असते बाई'. 

किंवा 

'पोटुशी बाईनं

जपून टाकलेल्या 

पावलासारखंच असतं

प्रत्येक विधवेचं पाऊल' 

यातील प्रत्येक शब्दाची अर्थगर्भता वाखाणण्यासारखी आहे. 


'रांडव' हे कवितेचे शीर्षक म्हणजे केवळ 'विधवा' ह्या शब्दासाठीचा प्रतिशब्द नसून तो ग्रामीणतेचा अस्सल निदर्शक आहे. ह्या कवितेत कवयित्रीने रांडव स्त्रीच्या आयुष्यातून काय काय वजा होत जाते, याची केवळ जंत्री दिली नसून परिणामस्वरूप त्या पोकळीच्या आवर्तात, अभावचित्रात वाचकही भोवंडून जातो. 

परंपरेने 'बाई'पणाच्या चौकटीत बाईला कसे बंदिस्त करून टाकले आहे, याचे चित्र 'ब बाईचा' ह्या कवितेत कवयित्रीने उभे केले आहे. 


'एक दिवस माझ्यातून 

झिरपून ओघळत येईल 

एक कवितेची ओळ 

तुझ्यापर्यंत 

फक्त तू वाट अडवू नकोस तिची

मुरू दे तुझ्यात नखशिखांत 

ती तुझी होईपर्यंत'. 

कवयित्रीने रसिक वाचकाला केलेले हे आवाहन किती लोभसवाणे आहे! यातून कवयित्रीचा आपल्या कवितेवरचा ठाम विश्वास व्यक्त झाला आहे. 


ह्या कवितेत कवयित्रीने स्त्रीत्वाच्या परंपरागत घुसमटीला ठाम उद्गार दिला आहे. बाईच्या आतल्या बाईचा निष्ठेने शोध घेतला आहे. गल्लीबोळातून कानावर येणाऱ्या किंकाळ्या शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. बाईपणाचे वेगवेगळे पदर उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. पाळी आणि बाई यांच्यातील सनातन नात्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्रीत्वाच्या टिंबांच्या रंगहीन रांगोळीत आपल्या परीने रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे. वेगवेगळ्या स्तरांतील स्त्रियांच्या आयुष्याचा पसारा आपल्या कवितेच्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला आहे. स्त्रीच्या आयुष्याचा गुंता सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. बाईपणाच्या अस्तित्वाचा साकल्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या प्रयत्नात कवयित्री खूपच यशस्वी झालेली आहे. त्यामुळे ह्या कवितेच्या पानापानांतून झिरपत आलेली बाईपणाची तळमळ, तडफड आणि तगमग संवेदनशील वाचकाच्या काळजाला भिडते. त्याला विचार करायला भाग पाडते. 


'वंशावळीच्या प्राचीन सरीतून' (कवितासंग्रह) 

कवयित्री : प्रतिभा खैरनार 

प्रकाशक : परिस पब्लिकेशन्स, सासवड, पुणे 

मुखपृष्ठ : अरविंद शेलार 

पृष्ठे ११२ किंमत रु. १८०


पुस्तक परिचय :

डॉ. सुरेश सावंत, 

मथुरेश बंगला, क्र. १. १९. २२०, 

राज मॉलच्या पाठीमागे, 

आनंदनगरजवळ, 

शितलादेवीच्या मंदिरासमोर, 

शाहूनगर, नांदेड ४३१ ६०२. 

भ्र. ९४२२१७०६८९, ८८०६३८८५३५. 

sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या
Popular posts
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
नांदेड : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड यांची राज्य कमिटीच्या सचिव मंडळ सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे.
इमेज
माहूर शहरात क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती विवीध ठिकाणी साजरी.
इमेज
वेतन करारात मान्य केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी गोदी कामगारांची सरकारविरोधात तीव्र निदर्शने*
इमेज
मँगलोर येथे “सागर में योग” व्यवस्थापन शिक्षण उपक्रमाचे लोकार्पण*
इमेज