तलाठी लाच घेताना रंगेहात पकडला; नायगाव तालुक्यात लाचलुचपत विभागाची यशस्वी सापळा कारवाई

 


नायगाव प्रतीनीधी:
     नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील तलाठी अशोक दिगंबर गिरी (वय 46) यास आज, गुरुवारी (दि. 9 ऑक्टोबर 2025) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांनी 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. साईप्रकाश चन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
       तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची वडिलोपार्जित शेती मौजे कृष्णूर, ता. नायगाव येथे गट क्रमांक 116, 146 आणि 407 मध्ये असून एकूण क्षेत्रफळ 2 हेक्टर 21 आर आहे. या शेतीची नोंद त्यांच्या वडिलांच्या नावावर वारसा हक्काने 7/12 वर करण्यासाठी आरोपी तलाठी अशोक गिरी यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार 6 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत विभागाकडे दाखल करण्यात आली होती.
       तक्रारीची पडताळणी 9 ऑक्टोबर रोजी सकाळी करण्यात आली. त्यावेळी तहसील कार्यालय नायगाव समोर आरोपीने पंचासमक्ष 20 हजारांवरून तडजोडीने 10 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर दुपारी 1.42 वाजता सज्जा कार्यालय, नायगाव येथे आरोपी तलाठ्याने तक्रारदाराकडून 10 हजार रुपये लाच स्वीकारताच लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.
         कारवाईदरम्यान आरोपीकडून 1,660 रुपये नगदी, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला असून मोबाईल तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
        या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीस अटक करण्याची तजवीज करण्यात आली आहे.
        ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. साईप्रकाश चन्ना यांच्या नेतृत्वाखाली, उपअधीक्षक श्री. प्रशांत पवार यांच्या पर्यवेक्षणाखाली व तपास अधिकारी उपअधीक्षक श्री. राहुल तरकसे यांच्या देखरेखीखाली पार पडली.
       लाचलुचपत विभागाच्या या यशस्वी कारवाईमुळे पुन्हा एकदा भ्रष्टाचाराविरुद्ध जनतेत विश्वास निर्माण झाला आहे.
टिप्पण्या