डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव : समर्पित प्राध्यापिका*


               प्रत्येक व्यक्ती आयुष्यात काही ना काही कार्य, कर्तव्य, सेवा बजावित असतो; मात्र समर्पित भावना, गुणवत्तापूर्णता आणि उत्साहाने कार्य, सेवा करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजता येण्यासारखी झालेली आहे. डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव यांचे नाव बोटावर मोजता येणाऱ्यांच्या संख्येत अग्रक्रमावर आहे.

               यशवंत महाविद्यालय, नांदेड येथील इंग्रजी विभागप्रमुख व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयिका आमच्या भगिनी डॉ.एल.व्ही.पद्माराणी राव यांची एशियन ॲडमैरेबल अचीव्हर:२०२५ च्या खंड- २४ मध्ये शिक्षणतज्ञ आणि भाषातज्ञ म्हणून गौरवास्पद नोंद घेण्यात आली आहे. शैक्षणिक, शिक्षणेतर, शिक्षणपूरक आणि संशोधन क्षेत्रात योगदान देणाऱ्या डॉ. पद्मा राव यांचा गौरव भूषणावह आहे.

               २६ जानेवारी १९६८ मध्ये आंध्र प्रदेशातील कोव्वूर येथे जन्मलेल्या डॉ.पद्मा राव यांनी बी.एससी., एम.ए. इंग्रजी, एम.फील. (भाषाशास्त्र आणि उच्चारशास्त्र) पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे शिक्षण मद्रास, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे पूर्ण झाले असून भाषाशास्त्रात त्या तज्ञ आहेत. दहा पीएच.डी. आणि दहा एम.फिलच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य पूर्ण केलेले आहे. पाच विद्यार्थ्यांचे पीएच.डी. संशोधन कार्य सध्या चालू आहे. त्यांनी तीन संशोधन प्रकल्प पूर्ण केलेले असून आजवर सहा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा सात राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले आहे. ७० पेक्षा जास्त सेमिनार आणि वेबिनारमध्ये संशोधन पेपर सादर केले आहेत. त्यांचे २३ ग्रंथ, ३८ ग्रंथांमध्ये चॅप्टर्स आणि १२१ पेक्षा जास्त संशोधन पेपर प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना आजपर्यंत अकॅडमी एक्सलन्स अवॉर्ड: २०२२,  डिस्टिंगविश प्रोफेसर अवार्ड: २०२२,  डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन रिसर्च एक्सलन्स अवॉर्ड: २०२४, वूमन आयकॉन अवॉर्ड :२०२५ प्राप्त झाले आहेत.

                डॉ.पद्मा राव यांचा स्वभाव शांत, मनमिळावू आणि विभागातील व महाविद्यालयातील सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन कार्य करण्याचा आहे. अत्यंत संयमी, उत्साही आणि सकारात्मक दृष्टीची सोनेरी किनार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला असल्यामुळे प्रत्येक शैक्षणिक आणि संशोधकीय कार्य जीव ओतून, मन लावून करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. क्रोध त्यांच्या आसपासही फिरकत नाही. यदा कदाचित तणावाची परिस्थिती जरी निर्माण झाली तरी संयमाने, शांततेने, सदसदविवेक बुद्धी जागृत ठेवून कार्यरत राहणे, हे जणू त्यांच्या अंगवळणीच पडलेले आहे. 

               क्षमेन विरस्य भूषणम् हे भारतीय संस्कृतीतील महान उदात्त तत्व त्यांच्या ठाई वसलेले आहे. इतरांकडून झालेल्या चुकीला क्षमा करणे तसेच सदैव कार्य करण्याची प्रेरणा देणे, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. शक्यतो सगळे प्रश्न आपल्या बोलण्यातून, शब्दातून निर्माण होतात. ' शस्त्राने केलेला घाव बरा होत असतो; मात्र शब्दाने केलेला घाव बरा होत नाही' हे तत्व म्हणून बऱ्याच जणांना ज्ञात असतानाही शब्दांनी मन दुखावणारे जागोजागी आपल्याला भेटतात; मात्र डॉ.पद्मा राव या संयमी, संतुलित शब्दांनी विद्यार्थी, सहकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधतात. त्यांनी कधीही विसंवाद निर्माण होऊ दिला नाही. मानवी स्वभाव माणसाला महत्तमतेच्या आसनावर आरूढ करतो व चिरकाल स्मरणात देखील ठेवतो.

                डॉ.पद्मा राव या अत्यंत उत्साही मैत्री भावनेने कार्य पूर्ण करणाऱ्या आहेत. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे कर्तव्य माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार त्या अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण करीत आहेत. त्यांच्या समन्वयिका पदाच्या कार्यकालात महाविद्यालयास ए प्लस ग्रेड देखील प्राप्त झालेला आहे. सर्व कार्य स्वतः करणे; किंवा दुसऱ्यावर सर्व कार्य सोपविणे; यातील सुवर्णमध्य त्यांनी जोपासला. प्रत्येकाने आपली जबाबदारी यथायोग्यतेने बजावणे आणि अडचणीच्या वेळी एकमेकास मदत, सहकार्य हे परवलीचे शब्द त्यांच्या आचरणाचा गुणधर्म बनलेले आहे.

                महाविद्यालयातील महिला प्राध्यापिकांचे संघटन, चर्चा, उपक्रमासाठी त्या आग्रही आहेत. मतमतांतरे, वैचारिक विभिन्नता असली तरी मत व विचार मांडण्याचा प्रत्येकाला हक्क; हे तत्व मांडणाऱ्यापैकी त्या एक. डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.मीरा फड, डॉ.मंगल कदम, डॉ.नीता जैस्वाल, डॉ.शबाना दुर्राणी आदी मैत्रिणी सोबतच्या विविध विषयांवरील; विशेषतः महिला सक्षमीकरणावरील चर्चेची आसपास उपस्थित असणाऱ्या श्रोत्यांनाही  वैचारिक मेजवानी लाभत असे. 

               विद्यापीठ परिसर, मराठवाडा आणि केवळ महाराष्ट्रच नाही तर दक्षिण भारतातही आपल्या कर्तृत्वाचा, योगदानाचा प्रभाव पाडणाऱ्या डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव यांची एशियन एडमैरेबल अचिव्हर्सने नोंद घेतल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

                                -डॉ.अजय गव्हाणे,

                        राज्यशास्त्र विभागप्रमुख,

                     यशवंत महाविद्यालय,नांदेड.

टिप्पण्या