यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे येत्या 4 ऑक्टोबर रोजी पी एम उषा योजनेअंतर्गत "एम्पॉवरिंग फ्युचर थ्रू केमिस्ट्री" या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.या चर्चासत्रासाठी मुख्य उद्घाटक तथा बीजभाषक म्हणून पद्मश्री डॉक्टर के एन गणेश यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तर, या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व विद्यमान खासदार आदरणीय श्री अशोकराव चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांमध्ये नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा डी पी सावंत, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेशचंद्र शिंदे, शिक्षण सहसंचालक डॉ बाबासाहेब भोसले आदी उपस्थित राहणार आहेत.
पद्मश्री डॉ के एन गणेश हे विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील एक नामांकित असे नाव असून ते पहिल्यांदाच मराठवाड्यात येत आहेत, त्यांना 2023 मध्ये त्यांच्या रसायनशास्त्रातील संशोधनातील कामाबद्दल भारत सरकार तर्फे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते आयसर,तिरुपतीचे त्याच बरोबर आयसर,पुणे येथील संस्थापक संचालक आहेत. डॉ के एन गणेश यांचे संशोधन न्यूक्लिक ॲसिड रसायनशास्त्र यावर केंद्रित आहे.त्यांचे मुख्य संशोधन न्यूक्लिक ऍसिड डी एन ए व आर एन ए या क्षेत्रात असुन डी एन ए च्या रचनात्मक व जैव-रासायनिक पैलूंचा अभ्यास करणे हे आहे.
पी एन ए अनलॉग या विशेष प्रकारच्या डी एन ए एनलॉग च्या डिझाइन व उपयोगावर त्यांनी संशोधन केल आहे, ज्यामुळे पेशीमध्ये प्रवेश करण्याच्या क्षमताही संशोधित करता येतात. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये विज्ञान धोरण, संशोधन मार्गदर्शन समित्या, आणि उपक्रमांसाठी काम केले आहे. त्यांना अनेक
सन्मान व पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला आहे. त्याचबरोबर शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे.ते भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी (INSA), भारतीय शास्त्र अकादमी, आणि भारतीय विज्ञान अकादमी अशा प्रमुख विज्ञान अकादमींचे फेलो आहेत. द वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स चे सदस्य आहेत. त्यांनी सुमारे 170 पेक्षा जास्त संशोधन प्रकाशने प्रकाशित केली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 45 विद्यार्थिनी आपली पीएचडी पदवी प्राप्त केली आहे.
या राष्ट्रीय परिषदेत 'रसायनशास्त्राद्वारे भविष्याचे सशक्तीकरण' हा अत्यंत महत्त्वाचा व प्रासंगिक विषय मांडण्यात येणार आहे. ही परिषद रसायनशास्त्राच्या नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाद्वारे मानवतेच्या भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठीच्या प्रयत्नांवर केंद्रित आहे. यामध्ये शाश्वत उर्जा निर्मिती, पर्यावरण संरक्षण, आरोग्यसेवा व औद्योगिक विकास यासाठी रसायनशास्त्राच्या क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपाययोजनांची चर्चा होणार आहे. देशभरातील प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ, संशोधक, उद्योग प्रतिनिधी आणि धोरणनिर्माते यांच्या सहभागामुळे ही परिषद भविष्यातील दिशेचे मार्गदर्शन करणारी ठरणार आहे.
या कार्यशाळेत दुसऱ्या तज्ञ मार्गदर्शकामध्ये आयआयटी रूपर येथील नरिंदर सिंग,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथील प्रोफेसर बापूसाहेब शिंगटे,राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ एस डी सावंत व हैदराबाद येथील सिंनजन इंटरनॅशनल लिमिटेड या फार्मा कंपनीचे असोसिएट डायरेक्टर डॉ ओमप्रकाश बंडे यांची प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेस भरभरून प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत जवळपास 200 संशोधक,विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत.
सदरील राष्ट्रीय चर्चासत्रास जास्तीत जास्त प्राध्यापक विद्यार्थी तथा संशोधक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन यशवंत महाविद्यालयाचे शिस्तप्रिय प्राचार्य डॉ गणेशचंद्र शिंदे तसेच रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ एम ए बशीर व सर्व प्राध्यापक वृंद यांनी केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा