वाचनसंस्कृती वाढली, तरच लेखनसंस्कृती वाढेल 'सावाना'च्या जिल्हा साहित्य मेळाव्यात डॉ. सुरेश सावंत यांचे प्रतिपादन



नाशिक : 


लेखकांनी अभिव्यक्त होण्यापूर्वी भरपूर वाचले पाहिजे. जोपर्यंत वाचनसंस्कृती विकसित होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने लेखनसंस्कृती वाढणार नाही. वाचनसंस्कृती जपण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्येक घर हे वाचनकेंद्र बनले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी डॉ. सुरेश सावंत यांनी केले. 'सावना'च्या ५६व्या जिल्हा साहित्य मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

१८५ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या 'सावाना'च्या ५६व्या जिल्हा साहित्य मेळाव्याचे उद्घाटन शनिवारी (दि. २७) डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी  कविसंमेलनाचे अध्यक्ष तुकाराम धांडे, 'सावाना'चे अध्यक्ष दिलीप फडके, वैद्य विक्रांत जाधव, संजय करंजकर, जयप्रकाश जातेगावकर, धर्माजी बोडके, सोमनाथ मुठाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. सुरेश सावंत म्हणाले की, नाशिक हे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे, तर सावाना हे साहित्यिकांचे तीर्थक्षेत्र आहे. केशवसुतांनी नवोदित कवी आनंदीरमण यांना लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देत त्यांनी कवी, लेखकांनी कोणती पथ्ये पाळावीत, ते सांगितले. कवी-लेखकांनी जपून शुद्ध लिहावे. व्याकरणाचे नियम पाळले पाहिजेत. आपल्या कल्पना अभिनव हव्यात. पतंजलीने शब्दानुशासन सांगितले होते. आपणही शब्दांचे अनुशासन, म्हणजे लेखनाची शिस्त पाळली पाहिजे. भराभर आणि भाराभर लिहिण्यापेक्षा मोजकेच, पण जपून शुद्ध आणि चांगले लिहावे, असे आवाहन त्यांनी केले. 

डॉ. सावंत पुढे म्हणाले, की अलीकडच्या काळात वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे. ही वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी शिक्षकांनी आणि साहित्यिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नवोदित साहित्यिकांच्या साहित्यकृतींचे स्वागत करत असताना ज्येष्ठांच्या साहित्याकडेही आपण जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. जुन्या आणि नव्या प्रवाहांची सांगड घालून पुढे चालत असताना विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे. वाचन वाढविल्याशिवाय साहित्याची गुणात्मकता वाढणार नाही. समाजमनावरही त्याचे सकारात्मक परिणाम उमटत नाहीत. उत्तम साहित्यातून सुसंस्कृत समाजाची जडणघडण होत असते. म्हणून लेखकांनी कसदार साहित्य निर्मितीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी  केले.

सध्याच्या शिक्षणाविषयी बोलताना डॉ. सावंत म्हणाले, की शिक्षणाचा खूप विस्तार झाला असला, तरी आपण अपेक्षित गुणवत्ता साधू शकलो नाही. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोनापासून अध्ययनसंकट गडद होत चालले आहे. त्यासाठी शिक्षणप्रक्रिया आनंददायी असण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली. 

वाचनसंस्कृतीच्या आणि लेखनसंस्कृतीच्या विकासासाठी केलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. नाशिकची समृद्ध साहित्य परंपरा आणखी पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. डॉ. सावंत यांच्या भाषणाला नाशिकच्या जाणकार श्रोत्यांनी छान प्रतिसाद दिला. 

राजेंद्र सोमवंशी यांनी डॉ. सावंत यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश गायधनी यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री वाघ यांनी केले. आभार किरण सोनार यांनी मानले.

टिप्पण्या