युवकांनी लोकहितासाठी योग्य व्हिजन घेऊन राजकारणात यावे- आ.हेमंत पाटील

नांदेड ता- नव्या पिढीच्या तरुण तडफदार युवकांनी राजकारणात येताना लोकहिताचे व्हिजन घेऊन यावे जेणेकरून आपल्या विचारातून सामाजिक हित जोपासले जाईल आणि  समाजातील सर्व सामान्य जनतेला न्याय मिळेल असे विचार आमदार हेमंत पाटील यांनी मांडले. पुणे येथे आयोजित 8 व्या युवा संसद कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते आदर्श आमदार पुरस्कार देऊ न आमदार सत्यजित तांबे व आमदार कैलास पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

     पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने ८ व्या युवा संसद  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज ( दि.३१ ) रोजी या कार्यक्रमाच्या अंतर्गत  सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत, या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषद सदस्य तथा मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा(हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील हे होते. यावेळी जाधवर ग्रुपच्या वतीने  आमदार पाटील यांचा पुणेरी पगडी व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सत्यजित तांबे, आमदार, कैलास पाटील, डॉ. सुधाकर जाधवर, मनसे नेते श्री. गजानन काळे, श्री. अजिंक्य सगरे, श्री. शार्दुल जाधवर  यांच्यासह आदी उपस्थित होते.यावेळी आजचा सशक्त युवा आणि राजकारण व आजचा सशक्त भारत या  विषयावर बोलताना आ.पाटील म्हणाले की, मी सुद्धा राजकारणात येताना लोकहिताचे स्वच्छ उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आलो होतो. मी एका सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे.आजपर्यंत सर्वच निवडणुका लढविल्या अनेकदा अपयश आले पण त्यातून खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने तयारी करून यश मिळवत गेलो अशीच जिद्द आपण सुद्धा ठेवायला पाहिजे आणि राजकारणात उतरत असताना लोकहितासाठी काम केले पाहिजे आपण लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजेत,  आपण लोकांसाठी त्यांच्या सुख दुःखात हजर राहिलो तर लोक तुमच्या  पाठीशी भक्कमपणे उभे राहतील याचा अनुभव मला अनेकदा आला आहे.या कार्यक्रमात आमदार हेमंत पाटील यांच्या हस्ते  आमदार सत्यजित तांबे, आमदार कैलास पाटील यांना आदर्श आमदार पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातील युवक -युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या