नायगाव बाजारच्या शिरपेचात मानाचा तुरा टपाल कार्यालयाची नूतन इमारत जनतेच्या सेवेत रुजू


नायगाव  तालुक्यातील मुख्य असलेल्या येथील टपाल कार्यालयास स्वतःची इमारत नसल्याने गेल्या अनेक दशकापासून हे कार्यालय एका ठिकाणाहून दुसरे ठिकाणी असा  प्रवास करीत भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू होते. जागेची कमतरता व इतर कारणामुळे ग्राहकांना होणारा त्रास लक्षात घेता इमारतीसाठी स्वतःची जागा असावी म्हणून काहींनी दान स्वरूपात टपाल खात्यास जागा उपलब्ध करून दिली परंतु काही ना काही कारणाने या इमारतीचे बांधकाम होत नव्हते. लोकमतचे  पत्रकार वहाबोद्दीन शेख यांनी हा विषय लावून धरल्याने कार्यालयाचे स्थलांतर  थांबले आणि जागा उपलब्ध झाली व इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन ती इमारत जनतेच्या सेवेत रुजू झाली.  

                    नायगाव चे टपाल कार्यालय तसे फार जुनेच. जुन्या गावांमध्ये मेडेवार यांच्या इमारतीमध्ये भाड्याने हे कार्यालय  सुरू झाले. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तालुक्यातील नरसी, धानोरा, घुंगराळा, कहाळा, कोकलेगाव, कुंटूर, कुष्णूर, देगाव, मनुर, पाटोदा, सांगवी, सुजलेगाव, रुई,वाकाआदी ठिकाणचे शाखा कार्यालय येतात.जुन्या गावात हे कार्यालय असताना गावच्या  विकासासंदर्भात विविध मागण्यांसाठी जेव्हा-केव्हा आंदोलने होत होती त्यावेळेस कार्यकर्ते आपला राग याच कार्यालयावर काढून  नासधूस करणेअसे प्रकार घडत गेल्याने वरिष्ठांनी हे कार्यालय या ठिकाणी नको म्हणून काही महिने बंद ठेवून बाहेरगावी त्याचे  स्थलांतर करीत असताना सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून  लोकमतचे  पत्रकार वहाबुद्दीन शेख यांनी पुढाकार घेऊन  हे टपाल कार्यालय येथे असणे किती गरजेचे आहे याची जाणीव संबंधितांना  करून देते ते पुन्हा येथे चालू करण्यास भाग पाडले. जुन्या गावातील इमारतीमधून त्याचे ग्रा.पं.च्या इमारतीमध्ये स्थलांतरित करून ते पूर्ववत सुरू झाले .हे करत असताना तत्कालीन पोस्टमास्टर ऑफ जनरल (पीएमजी)बबन मोडक यांनी जागा उपलब्ध करून दिल्यास आपण इमारतीचे बांधकाम करून असा शब्द दिल्याने त्यांच्या शब्दाचा मान राखत स्वर्गीय खासदार वसंतराव चव्हाण यांनी पुढाकार घेत ग्रा.पं.च्या मालकी हक्काची लाखो रुपयांची  जागा दान स्वरूपात इमारतीच्या बांधकामासाठी 2003 मध्ये उपलब्ध करून दिली. यावेळेस तत्कालीन सरपंच माधवराव बेळगे यांनी देखील खूप सहकार्य केले.  पीएमजी मोडक यांची बदली झाल्याने हा प्रश्न रेंगाळला नंतर  तत्कालीन डाक अधीक्षक मझहर आली  यांनी बांधकाम संदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा केला. याच काळात भाड्याने ग्रा.पं.च्या इमारती मध्ये असलेले या कार्यालयाचे पुन्हा वसंतनगर मधील एका खाजगी इमारतीत  स्थलांतर झाले. जागा उपलब्ध असूनही बांधकाम होत  नसल्याचे पाहून वहाबोद्दीन शेख यांनी  आपला पाठपुरावा चालूच ठेवल्याने  बांधकामास परवानगी मिळाली आणि सर्वसोयुक्त सुंदर अशी इमारत तयार झाली. या इमारतीचा लोकार्पण सोहळा खा. रवींद्र चव्हाण, खा.डॉ.अजित गोपछडे, नगराध्यक्षा अर्चना चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, माजी जि.प. सदस्य माधवराव बेळगे, तालुका संघाचे अध्यक्ष श्रीनिवास चव्हाण, तहसीलदार डॉ.धम्मप्रिया गायकवाड,डाक अधीक्षक मोहम्मद खदीर आदी मान्यवरांच्या उपस्थित पार पडला आणि जनसेवेत ही इमारत रुजू झाली.तब्बल अडीच दशकापासून सातत्याने पाठपुरावा केल्याने हा प्रश्न मार्गी लागला आणि टपाल कार्यालयाला कायम स्वरुपी स्वतःची इमारत मिळाली व नायगावच्या वैभवात भर पडली.

टिप्पण्या